सोलापूर विमान सेवा शुभारंभाच्या भाजपच्या निमंत्रणपत्रिकेतून रणजितसिंह मोहिते पाटलांना वगळले
सोलापूर : सोलापूर येथील बहुचर्चित विमान सेवेचा उद्घाटन समारंभ सोमवारी 9 जूनला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत आहे. या कार्यक्रमाच्या भाजपच्या निमंत्रण पत्रिकेतून भाजपचे विधान परिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना वगळण्यात आलं आहे. पक्षाच्या निमंत्रण पत्रिकेत आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना स्थान देण्यात आलेले नाही. माढा लोकसभा आणि माळशिरस विधानसभा निवडणुकीत आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पक्षविरोधी काम केल्यामुळे त्यांच्यावर कारवाईची मागणी भाजप जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार आणि माळशिरसचे पराभूत उमेदवार राम सातपुते यांनी पक्षाकडे केली होती. त्यानंतर पक्षाकडून त्यांच्यावर कारवाईला सुरुवात करण्यात आली होती. अशाही परिस्थितीत आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपच्या कार्यक्रमाला हजेरी लावण्याचा प्रयत्न करीत होते.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दौऱ्यातही आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांची उपस्थिती पाहून पत्रकारांनी बावनकुळे यांना यांच्यावर कारवाई कधी करणार असे छेडले होते. सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे व जिल्ह्यातील भाजपचे आमदार यांची नावे निमंत्रण पत्रिकेत टाकली असताना भाजपचे विधान परिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या नावाला मात्र कात्री लावण्यात आलेली आहे.
या निमंत्रण पत्रिकेत केंद्रीय विमान उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, पालकमंत्री जयकुमार गोरे, सोलापूर जिल्ह्यातील भाजपा आमदार सचिन कल्याण शेट्टी, देवेंद्र कोठे , सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख आणि समाधान अवताडे या आमदारांची नावे आहे. याशिवाय पक्षाचे सोलापूर शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, सोलापूर विभाग जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण व दुसरे जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार यांची नावे या पत्रिकेत घेण्यात आलेली आहेत.
भाजप सोलापूर शहर यांच्याकडून काढण्यात आलेल्या पत्रिकेत मात्र भाजपचेच विधानपरिषद आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या नावाला कात्री लावण्यात आलेली आहे. आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचं नाव वगळून भाजपला नेमका काय मेसेज द्यायचा आहे याचा चर्चा सुरु आहेत.
आणखी वाचा
Comments are closed.