मुंबईत मातोश्रीवर माजी नगरसेवकांची बैठक; उद्धव ठाकरेंनी मनसेसोबतच्या युतीबाबत स्पष्टच सांगितलं
मुंबई : राज्यात गेल्या काही महिन्यांपासून शिवसेना (Shivsena) व मनसेची युती होणार असल्याची चर्चा जोर धरत आहे. राज ठाकरेंनी साद दिल्यानंतर, उद्धव ठाकरेंनीही (Uddhav Thackeray) प्रतिसाद दिल्याने दोन्ही बाजुने कार्यकर्ते उत्सुक असल्याचं पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईतील (Mumbai) माजी नगरसेवकांची बैठक घेतली. माजी नगरसेवकांसोबत आज झालेल्या बैठकीत आगामी महापालिका निवडणुकांसह विविध विषयांवर चर्चा झाली. तसेच, मनसेसोबत युती करायची का नाही याबाबतही उद्धव ठाकरेंनी विचारणा केली असून, युती केली तर फायदाच होईल, अशी कबुली नगरसेवकांनी दिल्याचे समजते. मुंबईत युती संदर्भात अनुकूल वातावरण असल्याचेही माजी नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंशी बोलताना म्हटले. त्यामुळे, पुढील काळात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतात का ते पाहावे लागले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन शाळेतील हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरुन आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच, हिंदी सक्तीवरुन आपला सरकारसोबत संघर्ष अटळ आहे, आपण हे कदापि खपवून घेणार नाही, असे राज ठाकरेंनी स्पष्ट केले. मात्र, शिवसेना-मनसे युतीसंदर्भात किंवा राजकीय विषयावर बोलणे त्यांनी टाळले. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील माजी नगरसेवकांसोबत निवडणुकांवर चर्चा केली.
मुंबई महानगर पालिकेसाठी आपल्याला ज्या पक्षासोबत युती करायची, त्यासाठी तुम्हाला विश्वासात घेऊन निर्णय घेईन, असा शब्द उद्धव ठाकरेंनी बैठकीतून मुंबईतील माजी नगरसेवकांना दिला. तुम्ही शिवसेनेत सोबत राहिलात, तुम्ही निष्ठावंत आहात, येत्या काळात अनेक बैठका घ्यायच्या आहेत. माजी नगरसेवकांनी शिवसेना भवन येथे येऊन सामान्यांचे प्रश्न सोडवावे. खरंच शिवसेना भवन येथे निवडणूक कार्यालय उघडणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवकांना सांगितले. दरम्यान, येत्या ऑक्टोबर ते नोव्हेंबरपर्यंत निवडणूक लागू शकते, असा अंदाजही या बैठकीतून उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला.
युतीबाबत नगरसेवक अनुकूल
मातोश्रीवर आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत बैठक झाली, ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर निवडणूक लागू शकते असं उद्धव साहेब म्हणाले. त्यामुळे, यंदा महानगरपालिकेवर भगवा फडकवायचा असा निर्धार आमचा झाला आहे. युती संदर्भात आम्हाला विचारणा केली त्यावर आमचं म्हणणं आम्ही सांगितलं. सध्या वातावरण अनुकूल आहे, असं आमचं म्हणणं. कारण, एकत्रित आंदोलन होत आहेत, कार्यकर्ते काम करत आहेत, अशी माहिती माजी नगरसेवक सुरेश पाटील यांनी दिली.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.