बीडच्या परळीत प्रतिष्ठापनेच्या मिरवणुकीत भर चौकात दिला कोंबड्याचा बळी; गुन्हा दाखल

बीड क्राइम न्यूज: बीडच्या परळी शहरातील गजबजलेल्या लक्ष्मीबाई टॉवर चौकात रस्त्याच्या मधोमध हळद कुंकू लिंबू टाकून कोंबड्याचा बळी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शुक्रवारी भर दुपारी ही घटना घडली आहे. प्रतिष्ठापनेच्या मिरवणुकीत हा प्रकार केला गेलाय. या प्रकाराची शहरभर चर्चा झाल्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आक्रमक पवित्रा घेत थेट शहर पोलीस ठाणे गाठलं आणि कारवाईची मागणी केली आहे.

दरम्यान, या ठिकाणी परळीचे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दीपक देशमुख यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून त्यावर पोलिसांनी अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आता या प्रकरणाचा तपास पोलीस करत असून परळीच्या माजी नगराध्यक्षांनीच असा प्रकार केल्याने याची चर्चा सर्वत्र होऊ लागली आहे.

माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल

पुढे आलेल्या माहितीनुसार, देशमुख यांच्याकडून प्रतिष्ठापना निमित्त मिरवणूक आयोजित करण्यात आली होती. या मिरवणुकीमध्ये गोंधळी, तृतीय पंथी, संबळवादक, आरती आदींचा सहभाग होता. या मिरवणुकीत राणी लक्ष्मीबाई टॉवर या सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर हळदी कुंकूवाने चौकोन बनवून त्यावर नारळ, नागवेलीची पाने वापरत मिरवणुकीत सहभागी असलेल्या एकाकडून कोंबड्याचा बळी घेण्यात आला व ते कोंबडे रस्त्यावर फेकून देण्यात आले. यामुळे काही काळा भितीचे वातावरण निर्माण झाले होते. आता या प्रकरणी माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सध्या अधिक तपास करत आहे.

विजयसिंह बांगर यांनी घेतली अपर पोलीस अधीक्षकांची भेट

सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड याच्यावर गंभीर आरोप करणारे विजयसिंह बांगर यांनी अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांची पोलीस अधीक्षक कार्यालयात भेट घेतली. या भेटी दरम्यान बीड शहरातील कोचिंग क्लासेस मध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीच्या छळ प्रकरणातील आरोपींसह त्यांच्याशी संबंधित व्यक्तींवर कारवाई करून नार्को टेस्टची मागणी केली.

तर महादेव मुंडे खून प्रकरणात वाल्मीक कराडसह त्याचा मुलगा सुशील कराड याला आरोपी करून गुन्हा नोंदवावा अशी मागणी केली. दोन दिवसांपूर्वी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून महादेव मुंडे खून प्रकरणात थेट वाल्मीक कराडवर बांगर यांनी आरोप केले होते. आणि याच केलेल्या आरोपाबाबत पोलिसांकडून बांगर यांचा जबाब देखील घेतला जाणार आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Comments are closed.