ज्याला वाचवण्यासाठी जितेंद्र आव्हाड पोलिसांच्या गाडीसमोर झोपले तो नितीन हिंदुराव देशमुख कोण?
नितीन देशमुख एनसीपी: राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनावेळी गुरुवारी विधानभवनाच्या आवारात महाराष्ट्राच्या लौकिकाला काळिमा फासणारा प्रकार घडला. गुरुवारी संध्याकाळी भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणमारी झाली. विधानभवनाच्या लॉबीतच हा प्रकार घडला. यावेळी गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाडांचा कट्टर कार्यकर्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नितीन देशमुख (Nitin Deshmukh) याला मारहाण केली. गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते शर्ट फाटेस्तोवर नितीन देशमुख याला मारहाण करतानाचे व्हिडीओ समोर आले आहेत. नितीन देशमुख याचा विधानभवनाच्या पायऱ्यांवर उभे असलेल्या गोपीचंद पडळकर यांच्याशी शाब्दिक वाद झाल्याचे व्हिडीओत दिसत आहे. त्यानंतर पडळकर यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख याच्यावर तुटून पडले.
नितीन देशमुख हा गोपीचंद पडळकर यांच्या तीन-चार कार्यकर्त्यांशी एकटा दोन हात करताना व्हिडीओत दिसत आहे. या झटापटीत नितीन देशमुख यांचा शर्ट फाटायला आला होता. विधानभवनातील सुरक्षारक्षकांनी मध्ये पडत दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना बाजूला केले. मात्र, तरीही नितीन देशमुख आणि गोपीचंद पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न करत होते. पोलिसांनी या दोघांवरही गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, या सगळ्या राड्यानंतर जितेंद्र आव्हाड यांचा कार्यकर्ता असलेल्या नितीन हिंदुराव देशमुख हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मुंबई उपनगरातील विक्रोळी परिसरात वास्तव्याला असणारा नितीन देशमुख हा गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचा कट्टर कार्यकर्ता आहे. त्याच्यावर काही प्रकरणांमध्ये गुन्हेही दाखल आहेत. त्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही पदंही भुषविली आहेत. तो राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा माजी कार्याध्यक्ष आहे. जितेंद्र आव्हाड यांचा कट्टर कार्यकर्ता म्हणून ओळख असलेला नितीन देशमुख हा त्याच्या आक्रमक भाषेसाठी आणि आंदोलनांसाठी प्रसिद्ध आहे. यापूर्वीही नितीन देशमुख याने पवार कुटुंबीयांवर टीका करणाऱ्या गोपीचंद पडळकर यांना अनेकदा शाब्दिक प्रत्युत्तर देऊन अंगावर घेतले होते.
अजित पवार यांनी डिसेंबर 2019 मध्ये अचानक देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत हातमिळवणी करत पहाटे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यावेळी शरद पवार समर्थक प्रचंड संतापले होते. यानंतर नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरबाहेर अजित पवार यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली होती. यामध्ये नितीन देशमुख हा आघाडीवर होता. तेव्हापासून अजित पवार आणि नितीन देशमुख यांच्यात दरी निर्माण झाली होती. त्यामुळे 2021 साली अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या वेळी नितीन देशमुख याने वृत्तपत्रांमध्ये एक जाहिरात दिली होती. ‘दोन हाणा, पण मला आपलं म्हणा. मला माफी, हेच तुमच्या वाढदिवसाचं रिटर्न गिफ्ट’, ही पेपरमधील जाहिरात तेव्हा प्रचंड गाजली होती.
Nitin Deshmukh: नितीन देशमुख यांच्या जाहिरातीत नेमकं काय म्हटलं होतं?
आदरणीय दादा… आम्ही अपराधी अपराधी आम्हा नाही दृढ बुद्धी तरी साहेबी पांघरले माझ्या चुकांवर पांघरुण हात ठेवुनी मस्तकी आता द्यावा आशीर्वाद अन् असावी आम्हावर मायेची पखरण. दादा, तुमच्या वाढदिवसानिमित्त करतो एकच वादा झाली चूक, माफ करा… तुम्हाला दुखवण्याचा बिलकुल नव्हता इरादा 23 नोव्हेंबर 2019 रोजी माझ्या हातून आयुष्यातील सर्वात मोठी चूक घडली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे नको त्या घोषणा दिल्या दादा, मी अपरिपक्व होतो, भावनेच्या भरात माझ्याकडून चूक झाली दोन वर्षे मी स्वतःला पश्चातापाच्या अग्निकुंडात झोकून दिले आहे पण दादा, आता सहन होत नाही संपूर्ण महाराष्ट्र आज तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छारुपी आदरभाव व्यक्त करतोय, मलाही दादा आज मन मोठं करुन आशिर्वादरुपी माफीचं रिटर्न गिफ्ट द्या.. एवढीच माफक अपेक्षा.
आपला कृपाभिलाषी नितीन हिंदुराव देशमुख
https://www.youtube.com/watch?v=E5RHZOZTEEE
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.