‘भाईचा बड्डे, वाजले बारा…’, पुण्यात कुख्यात गुंडांच्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन; एकापेक्षा

पुणे : पुणे शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारीची झलक पाहायला मिळाली आहे. एका ‘भाई’च्या वाढदिवसाच्या पार्टीमुळे (Birthday Party) विमाननगर परिसरात खळबळ उडाली असून, या पार्टीमध्ये अनेक कुख्यात गुन्हेगारांच्या उपस्थितीमुळे ही घटना चर्चेचा विषय बनली आहे. शनिवारी मध्यरात्री विमाननगरमधील दत्त मंदिर चौकाजवळ ‘थ्री मस्केटियर्स’ पबच्या पार्किंगमध्ये तब्बल शंभरहून अधिक युवकांची गर्दी जमली होती. निमित्त होतं कुख्यात गुन्हेगार निखिल कांबळेच्या वाढदिवसाचं. विशेष म्हणजे, निखिल कांबळेवर येरवडा पोलिस ठाण्यात पोलीस कोठडीतून पळून जाण्याचा गंभीर गुन्हा दाखल असून, काही दिवसांपूर्वीच तो कारागृहातून सुटून बाहेर आला आहे. (Pune Crime News)

या पार्टीचे आयोजन विमानतळ पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार फिरोज शेख याने केलं होतं. फिरोजवर सरकारी कर्मचाऱ्याच्या कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल आहे. या कार्यक्रमात ‘MCOCA’ अंतर्गत कारावास भोगून बाहेर आलेला आकाश कंचिले आणि त्याची टोळी देखील सहभागी होती. पार्टीदरम्यान डीजेच्या प्रचंड आवाजामुळे आणि शंभरहून अधिक लोकांच्या गर्दीमुळे परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचं आणि अस्वस्थतेचं वातावरण पसरलं आहे. मात्र या सर्व प्रकारानंतरही पोलिसांनी अद्याप कोणतीही ठोस कारवाई न केल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. यासंबंधीचे वृत्त एका महाराष्ट्र टाईम्स या वृत्तसंस्थेने दिले आहे.(Pune Crime News)

या घटनेने पुण्यातील वाढती गुन्हेगारी आणि पोलिस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. गुन्हेगार खुलेआम पार्टी करत असताना पोलीस केवळ बघ्याची भूमिका निभावतायत का, असा सवाल आता नागरिक विचारत आहेत.(Pune Crime News)

पुण्यात गाड्याची तोडफोड अन् दहशत पसरवण्याचे प्रकार वाढले

पुण्यात मागील महिन्याभरात 8,9 वाहन तोडफोडीच्या घटना समोर आल्या आहेत. महिन्याभराची आकडेवारी, वर्षभरातल्या घटना आणि महत्वाचं म्हणजे यात समाविष्ठ असलेले अल्पवयीन मुलांची टक्केवारी पाहता पुण्यातली गुन्हेगारी सध्या गंभीर वळण घेताना दिसत आहे. वाहन तोडफोडीच्या नवा पॅटर्नने पोलिसांसमोर आव्हान असताना पुणे पोलीस यावर योग्य कारवाई करताना किंवा या घटना थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना करताना फेल ठरत असल्याचं बोललं जात आहे.

पुण्यातल्या एकाच भागातून नाही तर विविध परिसरातून या घटना समोर आल्याने पुणेकरांची मात्र रात्रीची झोप उडाल्याचा पाहायला मिळत आहे. रात्रीच पोलिसिंग होत नाही आणि सोबतच दहशत निर्माण करणाऱ्यांची अरेरावी सहन करावी लागते अशा प्रतिक्रिया पुणेकर देतायेत. मागील काही दिवसांच्या गुन्हेगारीची आकडेवारी बघितली तर या सगळ्या वाहन तोडफोडीत अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याचा समोर आलाय आणि यांची टक्केवारी बघितली तर 35 टक्के अल्पवयीन मुलं कोयता गॅंग, वाहन तोडफोडी आणि सोबतच दहशत पसरवणाऱ्या सगळ्या घटनांमध्ये दिसून येत आहेत.  या अल्पवयीन मुलांना गुन्हेगारीपासून दूर ठेवण पोलिसांसमोर येत्या काळात मोठ आव्हान असणार आहे. त्यामुळे भयमुक्त गणेशोत्सव होइलच मात्र भयमुक्त पुणे कधी होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

आणखी वाचा

Comments are closed.