शरणू हांडे अपहरण-मारहाण प्रकरणात रोहित पवारच मास्टरमाईंड, पडळकरांचा आरोप, छातीवर पवारांचा टॅटूच

गोपीचंद पडलकर: सोलापुरात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या कार्यकर्त्याचे फिल्मी स्टाईल अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी हे अपहरण करून हत्या करण्याचा प्रयत्न झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेची माहिती मिळताच सोलापूर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत चार पथकं शोधासाठी रवाना केली. अखेर काल रात्री 10 च्या सुमारास पोलिसांनी आरोपी अमित सुरवसे आणि त्याच्या साथीदारांना ताब्यात घेतले. अपहरण झालेल्या कार्यकर्त्याचे नाव शरणु हांडे (Sharnu Hande) असून तो आमदार गोपीचंद पडळकर यांचा समर्थक आहे. दरम्यान, आरोपी अमित सुरवसे हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा कार्यकर्ता असल्याची माहितीही समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्यांचा कार्यकर्ता शरणु हांडे याची भेट घेतली. या भेटीनंतर पडळकरांनी रोहित पवार यांच्यावर थेट आरोप केलाय. शरणु हांडे अपहरण आणि मारहाण प्रकरणामागे रोहित पवारच मास्टरमाइंड असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

गोपीचंद पडळकर म्हणाले की, माझ्या गाडीवर हल्ला झाला तेव्हा आमचं सरकार नव्हतं.  माझ्या गाडीवर दगड टाकल्यानंतर 307 चा गुन्हा दाखल केला पाहिजे होता.  पण पोलिसांनी त्यावेळी तसं केलं नाही. माझ्या गाडीवर हल्ला करून तो कोणाचा आशीर्वाद घ्यायला गेला? असे म्हणत त्यांनी शरद पवार आणि रोहित पवार यांच्या सोबतचा अमित सुरवसेचा फोटो दाखवला. हे सगळे फोटो एकाचं परिवारातील लोकांशी संबंधित कसे? शरणू हांडे अपहरण-मारहाण प्रकरणात रोहित पवारच मास्टरमाईंड असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

रोहित पवार यांच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे

गोपीचंद पडळकर पुढे म्हणाले की, रोहित पवार यांनी पडळकर यांना टार्गेट करा, अशा सूचना महादेव देवकते याला दिल्या होत्या. तसेच अमित सुरवसे आणि महादेव देवकते याच्या छातीवर शरद पवारांचा टॅटूचा फोटो आहे. 2021 सालच्या प्रकरणात महादेव देवकाते याचे ही स्टेटमेंट पोलिसांनी घेतलं पाहिजे. यवतमध्ये जी घटना घडली त्यावर हे एक शब्द ही बोलत नाहीयेत.  पश्चिम महाराष्ट्रमध्ये हिंदुत्ववादी कार्यकर्ते एकत्रित होतायत, त्यांना हे पटत नाहीये. शरणू म्हणतोय की, त्याला सुरुवातीला मांडीला मारलं, पूर्ण मारण्याचा प्लॅन होता. अमानुष मारून हत्या करून व्हिडीओ करायचा प्लॅन होता.  या प्रकरणातील आरोपीचे मूळ शोधलं पाहिजे. व्हिडीओ कॉल केला होता, तो कोणाला केला? हे अपहरण करणारे मुलं इतकं करू शकत नाही. 2021 च्या प्रकरणाचा पुन्हा तपास केला पाहिजे. जर सहभागी असेल तर रोहित पवार यांच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

मला मारायचं असेल तर सांगा मी बारामतीत येतो

पुण्यातील मुलं सोबत कशी आली? गाडी पुण्यातून भाड्याने कशी मिळाली? ज्यांनी अपहरण केलं त्यांच्यात वाद झाला. काही जणांचा म्हणणं होतं संपवू, काही जणांचा विरोध होता. मला मारायचं असेल तर सांगा मी बारामतीत येतो. लहान कार्यकर्त्यांना कशाला टार्गेट करता. कार्यकर्त्यांना डिवचण्याचे कायम प्रयत्न सुरू आहेत. आम्ही कायद्यावर विश्वास ठेवतो. मुख्यमंत्री यांना मी सविस्तर सांगितलं आहे. कार्यकर्त्यांना आवाहन आहे की, हे सगळं बिथरलेत. तुम्ही काळजीपूर्वक काम केलं पाहिजे, असे त्यांनी म्हटले.

सुरवसेची मजल पुण्यापर्यंत कशी?

यांनतर गोपीचंद पडळकर यांनी अमित सुरवसे आणि रोहित पवार सोबत चालतानाचा एक व्हिडीओ देखील दाखवला. तसेच अपहरण करताना गाडीतले मुलं म्हणाली रोहितदादांना कॉल करायला सांगितलं, असं शरण म्हणत आहे. पोलिसांनी याचा सखोल तपास केला पाहिजे.  सुरवसे हा सोलापूरचा आहे त्याची मजल पुण्यापर्यंत कशी? असा सवाल देखील गोपीचंद पडळकर यांनी उपस्थित केला.

https://www.youtube.com/watch?v=LHPN4ZOEKTW

आणखी वाचा

Sharnu Hande: रोहित पवारांनी व्हिडीओ कॉल केला; जखम पाहिली आणि मला माफी मागायला सांगितली, नंतर म्हणाले तुम्ही…शरणू हांडेंनी पडळकरांसमोर सांगितली आपबिती

आणखी वाचा

Comments are closed.