पालकमंत्रीपदाचा तिढा सुरु असतानाच गिरीश महाजनांनी मोठा बॉम्ब फोडला; म्हणाले, नाशिकचा पालकमंत्री
गिरीश महाजन: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी 18 जानेवारी रोजी पालकमंत्र्यांच्या नियुक्तीची घोषणा केली होती. यामध्ये नाशिक जिल्ह्यासाठी भाजप नेते गिरीश महाजन यांची पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, या निर्णयाला शिंदे गटातील नेत्यांकडून विरोध झाल्यामुळे अवघ्या एका दिवसातच नाशिकच्या पालकमंत्रिपदाची घोषणा स्थगित करण्यात आली. यानंतर अद्यापही महायुतीत नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा कायम आहे. आता गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी धुळ्यातील (Dhule) एका कार्यक्रमात मोठा दावा केला आहे. नाशिक जिल्ह्याचा पालकमंत्री मीच होणार, असे त्यांनी म्हटले आहे.
नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी शिवसेना शिंदे गटाचे दादा भुसे (Dada Bhuse), राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) हे प्रबळ दावेदार आहेत. मात्र गिरीश महाजन यांच्याकडून आता थेट दावा करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तर पालकमंत्रीपदावरून सुरू असलेला महायुतीतील (Mahayuti) वाद खरंच मिटला आहे का? असा सवाल आता गिरीश महाजन यांच्या वक्तव्यानंतर उपस्थित होत आहे.
नेमकं काय म्हणाले गिरीश महाजन?
गिरीश महाजन यांनी धुळ्यात दहीहंडीच्या उत्सवात हजेरी लावली होती. यावेळी ते म्हणाले की, पावसाने बऱ्याच दिवसापासून दडी मारली होती. मात्र, आता पावसाच्या आगमन झालेले आहे. पाऊस सुरू असून देखील दहीहंडीच्या उत्सवासाठी तरुणाई रस्त्यावर उतरली आहे. मी दरवर्षी दहीहंडी उत्सवासाठी धुळ्याला येत असतो. नाशिकला देखील मी जात असतो, त्या ठिकाणी मी पालकमंत्री होत आहे, असा दावा त्यांनी केला आहे.
महाजनांच्या दाव्यावर भुजबळांची प्रतिक्रिया
दरम्यान, गिरीश महाजनांच्या दाव्यावर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नाशिकचा पालकमंत्री कोणालाही होऊ द्या. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीला मी नसतो. रायगडमध्ये आमची एक सीट असताना आम्ही पालकमंत्रीपदाचा आग्रह धरला आहे. नाशिक जिल्ह्यात आमचे सात आमदार असताना पालकमंत्रीपदासाठी आमच्या लोकांना आग्रह धरायलाच लागेल. सात आमदार एकच पक्षाचे असतील तर त्या पक्षाला पालकमंत्रीपद मिळाले पाहिजे, असे म्हणत छगन भुजबळ यांनी नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी आग्रह कायम ठेवला आहे. अजितदादा आणि सुनील तटकरेंशी मी बोलेल, एक आमदार असताना आपण पालकमंत्रीपदासाठी आग्रह धरतो तर सात आमदारांसाठी शक्ती लावा, असे देखील छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
https://www.youtube.com/watch?v=nujif-1zghg
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.