मुंबईचा संघ सोडताच जुन्या फॉर्ममध्ये परतला पृथ्वी शॉ, टीकाकारांची तोडं बंद करणारी आणखी एक खेळी

पृथ्वी शॉ बुची बाबू ट्रॉफी 2025: टीम इंडियातून बाहेर असलेला पृथ्वी शॉ सध्या घरगुती क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करत आहे. तमिळनाडूत सुरू असलेल्या बुची बाबू स्पर्धेत (Prithvi Shaw Buchi Babu Tournament) पृथ्वी शॉच्या बॅटतून आखणी एक कडक खेळी आली. आतापर्यंत त्याने तीन डाव खेळले असून, एका डावात शतक, एका डावात केवळ 1 धाव आणि एका डावात अर्धशतक अशी कामगिरी केली आहे.

मुंबईचा संघ सोडताच जुन्या फॉर्ममध्ये परतला पृथ्वी शॉ

गेल्या हंगामात मुंबई संघाकडून खेळताना पृथ्वी शॉसाठी फारस काही खास राहिला नव्हता. बॅटमधून धावा निघत नव्हत्या, फिटनेस आणि शिस्तीच्या मुद्द्यांमुळे त्याला मुंबई संघातून बाहेर पडावे लागले. याशिवाय आयपीएल 2025 मेगा ऑक्शनमध्येही कोणत्याही संघाने त्याला खरेदी केले नाही, ज्यामुळे त्याच्या अडचणी वाढल्या होत्या.

आधी शतक, तर आता ठोकले अर्धशतक

पृथ्वी शॉने स्पर्धेतल्या पहिल्या सामन्यात छत्तीसगडविरुद्ध कठीण खेळपट्टीवर 111 धावांची तुफानी खेळी केली. विशेष म्हणजे त्या डावात त्याच्या संघातील इतर सर्व फलंदाज एकत्र मिळून फक्त 92 धावा करू शकले होते. पुढच्या सामन्यात तो फक्त 1 धाव काढून माघारी परतला. पण नंतर टीएनसीए प्रेसिडेंट्स इलेव्हनविरुद्ध खेळताना शॉ पुन्हा फॉर्मात दिसला.

पहिल्या दिवशी तो 47 धावांवर नाबाद राहिला आणि दुसऱ्या दिवशी फक्त 3 धावा घेताच त्याने अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर हर्षल काटेसोबत 94 धावांची भागीदारी करत महाराष्ट्राची डाव मजबूत केला. अखेर त्याने 96 चेंडूत 66 धावा फटकावल्या आणि सामना बरोबरीत सोडवला. आता मात्र घरगुती क्रिकेटमध्ये तो पुन्हा एकदा स्वतःची चमक दाखवतो आहे आणि टीम इंडियात पुनरागमन करण्यासाठी झटत आहे.

2018 मध्ये केले होते पदार्पण

पृथ्वी शॉने 2018 साली कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि पहिल्याच सामन्यात शतक झळकावून सर्वांना भुरळ घातली होती. मात्र, नंतर त्याच्या कामगिरीत घसरण दिसू लागली. आयपीएलमध्येही त्याला हवा तसा मान मिळाला नाही. फिटनेसच्या कारणावरून शॉला अनेकदा ट्रोल करण्यात आलं आणि बीसीसीआयने देखील त्याच्यावर बारीक लक्ष ठेवले. पण आता शॉ मेहनतीच्या जोरावर दमदार पुनरागमन करण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे.

आयपीएलमध्ये राहिला अनसोल्ड

शॉसाठी 2024-25 हंगाम अत्यंत कठीण ठरला. त्याला केवळ फिटनेसच नव्हे तर शिस्तभंगाच्या प्रश्नांनाही सामोरं जावं लागलं. इतकंच नव्हे तर आयपीएल 2025 च्या लिलावातदेखील कोणत्याही संघाने त्याला खरेदी केले नाही. पण आता त्याच्या खेळीत पुन्हा धार दिसून येत आहे. अवघ्या 25 वर्षांचा असलेला शॉ महाराष्ट्राकडून जबरदस्त फलंदाजी करताना दिसत आहे. पुढचा हंगाम त्याच्यासाठी कसा ठरणार, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.

हे ही वाचा –

Team India Jersey Sponsor : टीम इंडियाची जर्सी की पनवती? ज्यांनी-ज्यांनी नाव दिलं, त्यांच्या कंपनी बंद पडल्या, जाणून घ्या स्पॉन्सरशिपचा इतिहास

आणखी वाचा

Comments are closed.