बीड हादरलं! साखर कारखाना रोडवरील हॉटेलमध्ये तरुणाला निर्घृणपणे संपवले, नेमकं घडलं काय?
बीड गुन्हा: बीडच्या अंबाजोगाईतील साखर कारखाना रोडवरील हॉटेलमध्ये बसलेल्या तरुणाची डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार करून निघृण हत्या करण्यात आली आहे. ही धक्कादायक घटना मंगळवारी रात्री घडली असून, मृत तरुणाचे नाव अविनाश शंकर देवकर (रा. रायगड नगर, अंबाजोगाई) असे आहे. हल्ल्यानंतर आरोपी पसार झाले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
बीड जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालल्याचे चित्र समोर येत आहे. गेल्या काही दिवसांत हत्या, मारहाण, लूट अशा अनेक घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अंबाजोगाई, परळी, गेवराई, बीड शहर या ठिकाणी सलग घडणाऱ्या खुनांच्या घटना गंभीर प्रश्न निर्माण करत आहेत.
नेमके प्रकरण काय?
अंबाजोगाईतील रायगडनगर येथे राहणारा अविनाश शंकर देवकर याची तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री साखर कारखाना रोडवरील हॉटेल दरबार येथे घडली. अज्ञात आरोपींनी दरबार हॉटेलमध्ये बसलेल्या अविनाशच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने सपासप वार केले. या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी पसार झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. दरम्यान, ही हत्या कोणी आणि कोणत्या कारणास्तव केली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.यानंतर अविनाश देवकर याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी स्वाराती रुग्णालयात पाठवण्यात आला.या घटनेचा तपास अंबाजोगाई शहर पोलीस करत आहेत.
आरोपी फरार
मंगळवारी रात्री अविनाश देवकर हॉटेल दरबारमध्ये बसला असताना ही घटना घडली. साखर कारखाना रोडवरील या हॉटेलमध्ये काही अज्ञात व्यक्ती आले आणि त्यांनी अविनाशवर तीक्ष्ण हत्याराने वार केले. डोक्यावर झालेल्या गंभीर जखमांमुळे अविनाशचा जागीच मृत्यू झाला. हल्ला इतका अचानक आणि निर्दयी होता की हॉटेल परिसरात काही काळ गोंधळ उडाला.अज्ञात आरोपी हल्ला करून तात्काळ फरार झाले.
या हत्येमागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. प्राथमिक चौकशीतून हे स्पष्ट झाले आहे की अविनाशचा काही लोकांशी वाद होता का याची माहिती मिळालेली नाही. पोलीस तपास सुरू करत असून, हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहे. आरोपींची ओळख पटवण्यासाठी पोलिसांचे पथक सक्रिय झाले आहे.या घटनेने अंबाजोगाई शहरासह बीड हादरले असून, नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत.
आणखी वाचा
Comments are closed.