ठाकरे बंधू शिवतीर्थवर एकत्र, दोघे एकत्र यावेत म्हणून प्रयत्न केलेल्या नांदगांवकरांची पोस्ट

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव  ठाकरे यांनी आज गणेश चतुर्थीनिमित्त मनसेप्रमुख राजसाहेब ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे उपस्थित होते.  या भेटीच्या वेळी ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचे प्रमुख नेते पदाधिकारी देखील उपस्थित होते. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे गेल्या काही दिवसांमध्ये तीनवेळा एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. आज उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थ वर राज ठाकरेंच्या घरी उपस्थित लावल्यानंतर मनसे नेते बाळा नांदगांवकर यांनी पोस्ट केली आहे. बाळा नांदगांवकर यांनी या भेटीसंदर्भात भावना व्यक्त केल्या आहेत.

उद्धव ठाकरे 22 वर्षानंतर सहकुटुंब राज ठाकरे यांच्या घरी दाखल झाले होते. या भेटीसंदर्भात बाळा नांदगांवकर यांनी त्यांच्या भावना फेसबुक पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केल्या.

बाळा नांदगांवकर यांची पोस्ट जशीच्या तशी

बाप्पा पावला.

आज गणेश चतुर्थी निमित्त सालाबाद प्रमाणे राज ठाकरे यांच्याकडे गणपती बाप्पा विराजमान झाले. तरी यावर्षी या उत्सवाचा आनंद द्विगुणित झाला कारण आज अनेक वर्षानंतर उद्धव साहेब हे सहपरिवार बाप्पाच्या दर्शनाला आले.

मी देखील आज सहपरिवार या सुवर्णक्षणाचा साक्षीदार झालो. यावेळी दोन्ही ठाकरे आणि त्यांच्या परिवार बरोबर माझे कुटुंब एकत्र येऊन टिपलेला हा क्षण म्हणजे जीवनातील परमानंदच.

राजकारण होत राहील पण ठाकरे कुटुंब एकत्र येणे हे माझ्यासारख्या असंख्य ठाकरे प्रेमींना अतिशय आनंद देणारे आहे.

या बद्दल मनात एकच येते की खरच

बाप्पा पावला.

बाळा नांदगांवकर यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावेत म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरु ठेवले होते. त्या प्रयत्नांना यश आल्यानं आणि आजचा प्रसंग प्रत्यक्ष अनुभवल्यानंतर बाळा नांदगांवकर यांनी त्यांच्या भावना फेसबुक पोस्टच्या माध्यमातून मांडल्या.  दोन्ही ठाकरे एकत्र येणं हे माझ्या सारख्या ठाकरे प्रेमींना आनंद देणारं असल्याचं देखील बाळा नांदगांवकर यांनी म्हटलं.

दरम्यान, मनसेचे नेते आणि माजी आमदार राजू पाटील यांनी आजच्या उद्धव ठाकरेंच्या आजच्या भेटीचा संदर्भ देत एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे.  राजू पाटील यांनी आज ओरिजनल शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धवजी ठाकरे यांनी राजसाहेबांच्या शिवतीर्थ या निवास्थानी येऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं… असं म्हटलं.

शाळांमध्ये हिंदी भाषा शिकवण्यासंदर्भातील निर्णय रद्द झाल्यानंतर दोन्ही ठाकरेंनी एकत्र विजयी मेळावा घेतला होता. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाला राज ठाकरे हे मातोश्री निवासस्थान येथे गेले होते. तर, आज उद्धव ठाकरे  यांनी सहकुटुंब राज ठाकरेंच्या शिवतीर्थला भेट दिली.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.