मुंबईत खाऊ गल्ल्या बंद ठेवल्यावरुन जरांगे पाटीलही संतापले, आधी रोहित पवारांनी शेअर केली चिठ्ठी

मुंबई : आंदोलनस्थळी आंदोलकांना सुविधा उपलब्ध करून द्यायच्या असतात आणि हेच लोकशाहीचे खरे तत्व आहे. परंतु, राज्य सरकार आंदोलकांची गैरसोय कशी होईल याचे नियोजन करत असेल तर ते हुकुमशाहीचे लक्षण म्हणावे लागेल, असे म्हणत आमदार रोहित पवार यांनी मुंबईतील (Mumbai) खाऊ गल्ल्या आज बंद ठेवल्यावरुन संताप व्यक्त केला आहे. एकीकडे हजारोंच्या संख्येने लाखापेक्षा जास्त मराठा बांधव मुंबईत दाखल झाले असून आझाद मैदान, हायकोर्ट आणि सीएसएमटी परिसरात ठिय्या मांडून आहेत. मुंबईतील आझाद मैदानात 5000 आंदोलकांनाच परवानगी देण्यात आली होती. मात्र, मोठ्या संख्येने मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत. मात्र, त्यांची गैरसोय व्हावी म्हणून खाऊ गल्ल्या बंद ठेवल्याचा आरोप आमदार पवार यांनी केला आहे.  तर, जरांगे पाटील यांनीही आपल्या पत्रकार परिषदेत हॉटेल्स, टपऱ्या बंद ठेवल्यावरुन संताप व्यक्त केला.

मुंबईत आमचे पोरं आले म्हणून तुम्ही टपऱ्या बंद करणार, हॉटेल्स बंद करणार, सगळं पाण्याचं बंद करणार. मग, आम्ही पण तुमच्या सभा आमच्या इथं आल्यावर पाईपलाईनीतून त्या दिवशी पाणी बंद करणार अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला. तुमच्या रेस्ट हाऊसचही पाणी बंद करू, असे म्हणत जरांगे पाटील यांनी मुंबईत हॉटेल्स, खाऊ गल्लीत बंद असलेल्या टपऱ्यांवरुन संताप व्यक्त केला. तत्पूर्वी, रोहित पवार यांनीही ट्विट केलं होतं. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खाऊगल्ल्या बंद ठेवण्याचे अलिखित फतवे गृहविभागाने काढल्याचे समोर येत आहे. खाऊगल्ल्यांना बंद ठेवण्यामागे गृहविभगाचा हेतू काय? मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असेल तर उलट खाऊगल्ल्या सुरु ठेवायला हव्यात. गृहविभागाने आपले अलिखित फतवे मागे घेऊन तत्काळ खाऊगल्ल्या सुरु करण्यासंदर्भात सूचना कराव्यात. तसेच आंदोलकांची मोठ्या प्रमाणात असलेली संख्या बघता आझाद मैदानावर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे यासारख्या कोणत्याच मुलभूत सुविधा सरकारने उपलब्ध करुन दिलेल्या नाहीत, त्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी देखील रोहित पवार यांनी केली आहे. दरम्यान, रोहित पवारांनी एक चिठ्ठीही शेअरे केली असून त्यामध्ये खाऊ गल्ल्या बंद ठेवण्याचे आदेश पोलिसांनी दिल्याचं म्हटलं आहे.

या-ना त्या मार्गाने दगाफटका करण्याचा डाव सरकार आखत असेल तर सरकार मोठी चूक करत आहे, हे गृहमंत्र्यांनी विसरू नये. गृहमंत्री हुशार आहेत, सरकारकडून दुसऱ्यांदा चूक होऊ देणार नाहीत, ही अपेक्षा असे म्हणत रोहित पवार यांनी मनोज जरांगेंच्या पहिल्या आंदोलनाची आठवणही करुन दिली.

मुंबईत मराठा बांधवांसाठी जेवण

दरम्यान, राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने मराठा बांधव मुंबईत दाखल झाले असून आपल्यासोबत भाकरी, चपात्या, भाजी, तिखट गरम पुऱ्या, चिवडा असे पदार्थ सोबत आणले आहेत. तर, काही मराठा बांधवांसाठी मुंबईतील समाजबांधवांनी खाण्या-पिण्याची सोय केली आहे. मात्र, आंदोलनस्थळाजवळ असलेल्या 2-3 खाऊ गल्ल्या बंद ठेवण्यात आल्याने आंदोलकांना हॉटेलमध्ये जाण्याशिवाय पर्याय नाही, तसेच जवळील भागात रस्त्यावरच सहज उपलब्ध होईल, असे अन्नपदार्थ मिळणार नाहीत, हेच दिसून येत आहे.

हेही वाचा

Gunratna Sadavarte: मनोज जरांगेंना तातडीने अटक करा, ठाकरेंवरही कारवाई व्हावी; गुणरत्न सदावर्तेंची पोलिसांत धाव

आणखी वाचा

Comments are closed.