आयुष कोमकर हत्या प्रकरणी पुणे पोलिसांची मोठी कारवाई, 4 आरोपींना गुजरातमधून अटक, नावंही आली समोर

पुणे : नाना पेठेत झालेल्या गँगवॉरमधून घडलेल्या आयुष उर्फ गोविंदा कोमकर हत्या प्रकरणात नवीन घडामोड झाली आहे. पोलिसांनी थेट गुजरातमध्ये धाड टाकत आंदेकर कुटुंबातील आणखी चार जणांना ताब्यात घेतले आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये शिवम आंदेकर, शिवराज आंदेकर, अभिषेक आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांचा समावेश आहे. या चौघांना पुणे पोलिसांनी कोमकर हत्या प्रकरणाच्या तपासात मोठी कारवाई करत पकडलं आहे.

आयुष कोमकर हत्या प्रकरणी पोलिसांनी आधी 8 जणांना बेड्या ठोकल्या ताब्यात घेतलं होतं. यामध्ये आंदेकर टोळीचा मुख्य बंडूअण्णा राणोजी आंदेकर (वय 64), तुषार वाडेकर (वय 24), स्वराज वाडेकर (वय 21), वृंदावनी वाडेकर (वय 40), तसेच अमन युसूफ पठाण उर्फ खान (वय 22, सर्व राहणार नानापेठ), सुजल मेरगू (वय 23) यांना बुलढाणा परिसरातून अटक करण्यात आली होती. तर अमित पाटोळे (वय 19), यश पाटील (वय 19) या दोघांना पोलिसांनी हत्येच्या दुसऱ्या दिवशी ताब्यात घेतलं होतं. अमन पठाण आणि यश पाटील या दोघांनी आयुषवर गोळ्या झाडल्या होत्या, या घटनेत आयुषचा मृत्यू झाला होता.

पार्किंगमध्ये लहान भावासमोरच आयुषवर फायरिंग

वर्षभरापूर्वी आंदेकर आणि कोमकर या दोन कुटुंबांमध्ये टोळी युद्धाची ठिणगी तेव्हा पडली, जेव्हा राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक नवराज आंदेकर यांची 1 सप्टेंबर 2024 रोजी पुण्यातील नाना पेठ येथे त्यांच्या राहत्या घराजवळच गोळ्या घालून आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली होती. या हत्येचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीकडून थेट कोमकर कुटुंबावर वार करण्यात आला. त्यात या प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश कोमकरचा मुलगा, 19 वर्षीय आयुष उर्फ गोविंदा कोमकर, याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

नाना पेठेतील लक्ष्मी कॉम्प्लेक्समध्ये कोमकर कुटुंब वास्तव्यास असून, 5 सप्टेंबर 2025 रोजी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास आयुष आपल्या धाकट्या भावाला अर्णवला क्लासमधून घेऊन परतला. इमारतीच्या बेसमेंटमध्ये पोहोचल्यावर अर्णव गाडीतून खाली उतरला, तर आयुष गाडी पार्क करत होता. त्याच वेळी आधीपासूनच दबा धरून बसलेले अमन पठाण आणि यश पाटील हे दोघे समोर आले आणि त्यांनी आयुषवर तब्बल 12 राऊंड फायर केले. त्यापैकी 9 गोळ्या लागल्याने आयुष घटनास्थळीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. गोळीबारानंतर आरोपींनी “इथे फक्त बंडू आंदेकर आणि कृष्णा आंदेकर” असं ओरडल्याचं आयुषच्या भावाने सांगितलं. त्यानंतर ते घटनास्थळावरून पसार झाले. या भीषण हत्याकांडामुळे पुण्यात गँगवॉर पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

1 सप्टेंबर 2024 रोजी नाना पेठमध्ये राष्ट्रवादीचा माजी नगरसेवक वनराज आंदेकर याची हत्या झाली. या प्रकरणात गणेश कोमकर, संजीवनी कोमकर, जयंत कोमकर आणि इतरांसह 21 आरोपींना अटक करण्यात आली. आयुष कोमकरचा वनराज आंदेकरच्या हत्या प्रकरणात त्याचा कोणताही संबंध नसल्याचं पोलीस तपासातून उघड झालं.

वनराज आंदेकरच्या हत्येनंतर संतापलेल्या आंदेकर टोळीच्या सदस्यांनी त्याच्या अंत्यविधीवेळी शस्त्रपूजन करून बदला घेण्याची शपथ घेतली होती. त्याचाच एक भाग म्हणून 1 सप्टेंबर रोजी प्लॅनही आखला होता. वनराज आंदेकरच्या हत्या प्रकरणातील आरोपींची रेकी करण्यात आली होती. पण पोलिसांना याची माहिती मिळाली आणि हा प्लॅन उधळला.गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी आरती झाल्यानंतर नाना पेठेमध्ये गोळ्यांचा आवाज झाला. एकीकडे एका गणेश मंडळामध्ये डीजे सुरू होता, त्यामध्ये ‘टपका रे टपका, एक ओर टपका’ हे गाणं सुरू होतं. त्याचवेळी दुसरीकडे आयुष कोमकरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने त्यांच्या भाच्याला म्हणजे आयुष कोमकरला ठार केलं. या घटनेनंतर पोलीस कारवाई सुरू आहे.

आणखी वाचा

Comments are closed.