मंत्री इतर कामात व्यस्त राहणार असतील तर मंत्रीपद सोडावे लागेल; अजितदादांचा राष्ट्रवादीच्या मंत्
अजित पवार: राष्ट्रवादीचे मंत्री इतर कामात व्यस्त राहणार असतील तर मंत्रीपद सोडावे लागेल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मंत्र्यांना दिला आहे. तसेच, पालकमंत्र्यांना तीन दिवस मतदारसंघांमध्ये काढावीच लागतील, अशी अट देखील त्यांनी घातली आहे. नागपूर येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून (NCP Ajit Pawar Faction) चिंतन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराला राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री, खासदार, आमदारांसह वरिष्ठ नेते उपस्थित आहेत. या चिंतन शिबिरातून मार्गदर्शन करताना अजित पवार बोलत होते.
अजित पवार म्हणाले की, आपल्या पक्षाच्या वतीने आयोजित राष्ट्रवादी चिंतन शिबिरात तुम्हा सर्वांचे मी सर्वप्रथम स्वागत करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आज माझं मन खूप भरून आलं आहे. या सभागृहात आपले जवळपास पाचशे वरिष्ठ पदाधिकारी, नेते, सहकारी उपस्थित आहेत. मी आजूबाजूला पाहतो तेव्हा मला गर्दी दिसत नाही, मला माझं कुटुंब दिसतं. तुमच्या प्रत्येकाच्या पाठीशी लाखो लोक उभे आहेत, आणि तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमुळे मला नव्या उमेदीने, नव्या आशेने पुढे जाण्याची ताकद मिळते.
हे चिंतन शिबिर केवळ पुढच्या निवडणुकीसाठी नाही
आज आपण राष्ट्रवादी चिंतन शिबिरासाठी एकत्र आलो आहोत. हे चिंतन शिबिर केवळ पुढच्या निवडणुकीसाठी नाही, तर पुढच्या पिढीसाठी आहे. आज फक्त भाषणं करून वेळ घालवायचा नाही. आज प्रामाणिक चर्चा, धाडसी कल्पना आणि ठोस निर्णय घ्यायचे आहेत. आणि आज संध्याकाळपर्यंत आपण सर्व मिळून जो आराखडा ठरवू, त्यालाच आपण Nagpur Declaration (नागपूर डिक्लेरेशन) म्हणून अभिमानाने मांडणार आहोत, असे त्यांनी म्हटले.
तर आपला पक्ष नेहमी लोकांच्या जवळ राहील
अजित पवार पुढे म्हणाले की, मित्रांनो लक्षात ठेवा, संघटना केवळ वरच्या पातळीवरून मजबूत होत नाही, ती तळागाळातून बांधली जाते. म्हणून मी ठामपणे सांगतो, प्रत्येक नेत्याने आणि पदाधिकाऱ्याने काही ठराविक प्रकारचे संवादाचे टचपॉइंट लोकांबरोबर ठेवले पाहिजेत. बुथ-स्तरीय संवाद, प्रभाग सभा, जनसंवाद शिबिरे, राष्ट्रवादी परिवार मिलन, युवक टाउन हॉल, महिला बचतगट बैठक, आणि उद्योग/रोजगार सुविधा शिबिरे… हे आपण वर्षभर शिस्तीने केले, तर आपला पक्ष नेहमी लोकांच्या जवळ राहील. कोणत्याही नागरिकाला असं वाटता कामा नये की राष्ट्रवादीचे नेते केवळ निवडणुकीच्या वेळीच दिसतात.
महाराष्ट्राला स्थिरता, प्रगती आणि ठोस निर्णयाची गरज
तुम्हा सर्वांना ठाऊक आहे की आपण भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्ये जूनियर सहयोगी आहोत. अनेक लोक मला विचारतात हे पाऊल का टाकलं? वैयक्तिक आणि कौटुंबिक नात्यांमध्ये वेदना का स्वीकारल्या? मी तुम्हाला मनापासून सांगतो- ही सत्ता किंवा पदासाठी केलेली पावलं नव्हती. महाराष्ट्राला स्थिरता, प्रगती आणि ठोस निर्णयाची गरज आहे, या माझ्या अंतःकरणाच्या हाकेनं मी हा मार्ग निवडला, असे देखील त्यांनी सांगितले.
हाच माझ्या राजकारणात असण्याचा हेतू
जेव्हा एखाद्या गावाला पाणी मिळतं कारण मी एखादी फाईल पुढे ढकलली, तेव्हा मला समाधान मिळतं. जेव्हा एखादा कारखाना सुरू होतं कारण आपण जमीन किंवा परवानगीचा प्रश्न सोडवला, आणि हजारो तरुणांना रोजगार मिळतो, तेव्हा मला खरी आनंदाची जाणीव होते. प्रत्येक रात्री झोपायच्या आधी मी स्वतःला एकच प्रश्न विचारतो आज मी किती लोकांचे जीवन सुधारले? हाच माझा यशाचा मापदंड आहे. हाच माझ्या राजकारणात असण्याचा हेतू आहे, असेही अजित पवार म्हणाले.
महाराष्ट्राच्या विकासासाठीची सामायिक बांधिलकी
महायुतीसोबतचा आपला सहयोग टिकून आहे. कारण परस्पर सन्मान आणि महाराष्ट्राच्या विकासासाठीची सामायिक बांधिलकी आहे. या समन्वयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मी आभार मानतो. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचेही आभार मानतो. त्यांच्या नेतृत्वाने देशाला स्थैर्य मिळालं आहे आणि महाराष्ट्रासाठी त्यांनी नेहमी मोठं मन दाखवलं आहे. मी कधीही लोकहिताची मागणी मांडली, तर त्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी नकार दिला नाही, असे म्हणत अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.
तर मंत्रीपद सोडावे लागेल
आपण हे विसरू नये की, आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहोत. आपला स्वतःचा इतिहास आहे, आपली स्वतःची ओळख आहे आणि आपली स्वतःची विचारधारा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गावर आपण चालतो. धैर्य पण करुणेसह, कार्यक्षमता पण न्यायासह वागणे हीच आपली कार्यपद्धती आहे. आपण महात्मा गांधी, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, मौलाना आजाद, बिरसा मुंडा, अहिल्यादेवी होळकर, आणि महाराष्ट्राचे पाहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचे अहिंसा, जन सन्मान, समानता, सर्वांना हक्काचे शिक्षण, पुरोगामित्व हे आदर्श जपतो. भारताच्या संविधानावर आपलं राष्ट्रवादाचं पायाभूत मूल्य उभं आहे. आणि संविधान आपल्याला दररोज आठवण करून देतं की भारताची ताकद ही विविधतेतील एकता आहे. निवडणुका येत-जात राहतील. जिंकणं-हरणं हा लोकशाहीचा भाग आहे. पण आपल्या मूलयांसोबत तडजोड होऊ नये, याची सर्वांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांना केले. तर राष्ट्रवादीचे मंत्री इतर कामात व्यस्त राहणार असतील तर मंत्रीपद सोडावे लागेल, असा इशारा अजित पवार यांनी मंत्र्यांना दिला आहे.
https://www.youtube.com/watch?v= -fefst0xrn0
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.