आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा कार्यक्रम नाही; छगन भुजबळांचा थेट अजित पवारांवरच पलटवार


अजित पवार वर छगन भुजबळ: मराठा आंदोलक मनोज जरेंगे पाटील मुंबईतील आझाद मैदानात (Azad Maidan) बेमुदत उपोषण सुरू केलं होतं. यानंतर मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील (Maratha Reservation) आठ मागण्यांपैकी सहा मागण्या राज्य सरकारने (Maharashtra Government) मान्य करत त्यासंदर्भात शासन निर्णय (जीआर) जारी केला. मात्र मराठा आरक्षणाच्या जीआरवर मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आरक्षणाबाबत मोठं वक्तव्य केलं. ज्याला त्याला त्याच्या मागणीप्रमाणे आणि त्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार आरक्षण मिळावे, त्याला आमचा दुमत असण्याचे कारण नाही, असे त्यांनी म्हटले. आता अजित पवार यांच्या वक्तव्याला मंत्री छगन भुजबळ यांनी कडाडून विरोध केलाय.

नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ? (Chhagan Bhujbal on Ajit Pawar)

छगन भुजबळ म्हणाले की, आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. मराठा एक समाज, एक जात आहे. ओबीसी हा वर्ग आहे. यात अनेक जाती आहेत. त्यासाठी हे आरक्षण आहे. ओबीसी सामाजिकदृष्ट्या मागासलेले आहेत. त्यामुळे  आर्थिक दृष्टीने आरक्षण देण्याला आमचा विरोध आहे, असे म्हणत त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वक्तव्याचा विरोध केला आहे.

काय म्हणाले होते अजित पवार? (Ajit Pawar on Reservation)

अजित पवार म्हणाले होते की, “राजकारण करताना मी कधीही जात-पात किंवा नात्याचा विचार करत नाही. मी फक्त माणूस पाहतो आणि मदत करतो. काही लोक जातीचे वेड डोक्यात घालण्याचा प्रयत्न करतात आणि समाजामध्ये तेढ निर्माण करतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केले होते. ज्याला त्याला त्याच्या मागणीप्रमाणे आणि त्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार आरक्षण मिळावे, त्याला आमचा दुमत असण्याचे कारण नाही. जे कोणी यातून राजकारण करत असतील, त्यांना आवर घालण्याची गरज आहे, असे त्यांनी म्हटले होते.

सरकार शेतकऱ्यांच्या पाठीमागे : छगन भुजबळ (Chhagan Bhujbal on Maharashtra Rains)

दरम्यान, मंत्री छगन भुजबळ यांनी येवला तालुक्यातील  गावंडगाव, सुरेगाव, पिंपळ खुटे खुर्द, वाघाळेसह इतर भागात अतिवृष्टी झालेल्या भागांची पाहणी केली. यानंतर माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. कांदा, मका, सोयाबीनचे नुकसान झाले आहे. शेतकरी रडत आहेत. राज्यावर अस्मानी, सुलतानी संकट आले आहे. जेवढी जास्त मदत करता येईल, तेवढी शेतकऱ्यांना करणार आहोत. टोमॅटो, भाजीपाल्याचे देखील काही ठिकाणी नुकसान झाले आहे. खरं म्हणजे येवला तालुक्यात पाऊस फार कमी असतो. पण यंदा तीन-चार फूट पाणी शेतामध्ये साचले आहे. अनेक ठिकाणी वेगवेगळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. पण सरकार अतिशय मजबूतपणे शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभे आहे. काही ठिकाणी जमिनी खरडून गेल्या आहेत. काही ठिकाणी द्राक्ष बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. द्राक्ष बागा पुन्हा उभ्या करण्यासाठी तीन-चार वर्षे जातील. प्राथमिक मदतीला सुरुवात झालेली आहे. ज्या ठिकाणी अन्नधान्य खराब झाले आहे, त्या ठिकाणी दहा किलो तांदूळ दिले जात आहे. काही ठिकाणी पाणी जास्त असल्याने रोगराई होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या पाठीमागे पूर्ण महाराष्ट्राला उभे राहणे आवश्यक आहे, असे त्यांनी म्हटले.

https://www.youtube.com/watch?v=38xd7o9uh38

आणखी वाचा

झक मारली, पवार कुटुंबाला आम्ही निवडून दिलं; बारामतीत लक्ष्मण हाकेंची जीभ घसरली, घणाघाती टीका

आणखी वाचा

Comments are closed.