त्या घटनांनंतर मी निराश; आंदोलनात असेन किंवा नसेनही, हाकेंच्या भावनिक पोस्टनंतर विजय वडेट्टीवार
मुंबई : राज्यात गेल्या काही महिन्यांपासून मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापलेला असून दोन्ही समाजबांधव रस्त्यावर उतरून आंदोलन छेडत आहेत. एकीकडे मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, अशी मागणी होत आहे. तर दुसरीकडे ओबीसी(OBC) आरक्षणात मराठ्यांचा समावेश होऊ नये, यासाठी लक्ष्मण हाके यांच्यासह अनेक ओबीसी नेते आक्रमक पवित्रा घेत आहेत. हाके यांनी केवळ मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावरच नव्हे, तर पवार कुटुंबावरही तीव्र शब्दांत टीका केली आहे. त्यातून त्यांना फोनवरून धमक्या मिळत असल्याचंही समोर आलं आहे. याशिवाय काही ओबीसी नेत्यांकडून त्यांना डावललं जात असल्याचीही चर्चा आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांची नुकतीच केलेली फेसबुक पोस्ट चांगलीच चर्चेत आली असून, ते आंदोलन पुढे नेणार की मागे घेणार, हे लवकरच स्पष्ट होणार आहे. त्यांच्या या पोस्टनंतर आता त्यांनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
Laxman Hake Post: भावनिक पोस्टनंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा फोन
एबीपी माझाशी बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले, गेल्या चार-पाच दिवसांमध्ये ज्या घटना घडल्या त्या घटनावरती मी थोडासा निराश होतो आणि आहे, त्या संदर्भात मी संवाद साधणार आहे. मला राजकारण करायचं नाही, भविष्यात या सामाजिक चळवळीचे रूपांतरण कशात होईल ते मी बोलत नाही, पण आता आज रोजी माझं राजकीय ध्येय नाही. मला माणसं 500 आहेत का हजार आहेत, का 2000 आहेत का पन्नास हजार आहेत, याच्याशी मला देणंघेणं नाही. मला आमचा आवाज महाराष्ट्र शासनापर्यंत कसा पोहोचेल आणि हा जीआर कसा रद्द होईल हे महत्त्वाचं आहे, माझा फोटो ते काढतील पण लोकांच्या मनातून ते हटवू शकणार नाही. मी ओबीसी बांधवांशी आज संवाद साधणार आहे. शत्रूंपासून आणि स्वाकियांपासून देखील त्रास होत आहे. प्रस्थापितांच्या विरोधात मी लढणार आहे. कार्यकर्त्यांवर वार झाले आहेत. त्यांनी केलेल्या भावनिक पोस्टनंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा फोन आल्याचंही यावेळी हाकेंनी सांगितलं, तर छगन भुजबळ यांचा फोन आला नाही का? त्यावर हाके म्हणाले, ते बिझी असतील.
Laxman Hake Post: हाकेंची सोशल मिडीया पोस्ट काय?
लक्ष्मण हाके यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं की, “मी प्रामाणिकपणे भांडतोय, ओबीसी भटके एकत्र आले पाहिजेत म्हणून, आपले हक्क अधिकार टिकले पाहिजेत म्हणून, मी एक मेंढपाळ धनगराचं पोरगं आहे, मी बॅनर छापू शकत नाही, गाडी ला पैसे देऊ शकत नाही, भले मोठे स्टेज लावू शकत नाही, कुणाला चहा पाजू शकत नाही, हे माहित असूनही तुम्ही आजपर्यंत मला साथ दिलीत, उपोषण आंदोलन असो की मोर्चे, एल्गार मेळावे असोत किंवा रॅली, तुम्ही ताकदीने माझ्या पाठीशी उभे राहिलात, मला पाठिंबा देत राहिलात, मी तुमचे आभार मानावेत तेवढे कमी आहेत, मी ओबीसी च्या बाजूने बोलत गेलो, भांडत गेलो, ओबीसीच्या छोट्या छोट्या जात समूहाना जोडत गेलो, लाखो माणसं जोडली पण शत्रू ची संख्या सुद्धा वाढत गेली, हल्ले झाले, झेलले, पण आत्ता सहन होत नाही,
उद्या दैत्यानांदूर ता पाथर्डी जि अहिल्यानगर च्या ओबीसी मेळाव्यानंतर मी माझी भूमिका जाहीर करेन, मी आंदोलनात असेन किंवा नसेनही तुम्ही जेवढी साथ दिलीत त्याबद्दल जाहीर जाहीर आभार मानतो”.
आणखी वाचा
Comments are closed.