‘पवार कुटुंबाने पोसलेले गुंड, त्यांनी माझ्यावर हल्ला…’, कारवरील हल्ल्यानंतर लक्ष्मण हाकेंनी प


पुणे: ओबीसी आरक्षणासाठी (OBC Reservation) लढा देणारे आंदोलक लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांच्या वाहनावर काल (शनिवारी, ता २७) अज्ञात तरुणांनी हल्ला केल्याची घटना समोर आली होती. ही घटना अहिल्यानगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील आरनगाव बाह्यवळण रस्त्यालगत घडली होती. काल सकाळी लक्ष्मण हाके (Laxman Hake) हे दैत्य नांदूर (ता. पाथर्डी) येथे आयोजित ओबीसी एल्गार सभेसाठी जात होते. प्रवासादरम्यान त्यांनी अहिल्यानगरजवळ नाश्ता करण्यासाठी थांबले. नाश्ता करून पुन्हा प्रवास सुरू करत असतानाच आरनगाव बाह्यवळण रस्त्यावर काही अज्ञात तरुणांनी त्यांच्या गाडीला अडवून अचानक काठ्यांनी हल्ला केला, या हल्ल्यात त्यांच्या वाहनाचे मोठे नुकसान झाले असून, काचा फोडण्यात आल्या आहेत. सुदैवाने हाके यांना शारीरिक इजा झाली नाही,या हल्ल्याबाबत एबीपी माझाशी बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले, माझ्यावर हल्ला करणारा जो दळवी आणि त्याचे सहकारी आहेत यांचे फोटो आता समोर आले आहेत आणि यांचे फोटो शरदचंद्र पवार आणि निलेश लंके यांच्यासोबत देखील आहेत, या सर्व लोकांनी माझ्यावर जाणीवपूर्वक हल्ला केला आहे, असं हाके म्हणालेत. (Laxman Hake)

Laxman Hake: पवार कुटुंबाने असे गुंडे पोसलेले आहेत

माझी आणि या माणसांची काही वैयक्तिक दुश्मनी नाही, पण पवार कुटुंबाने असे गुंडे पोसलेले आहेत. आज त्याच गुंडानी माझ्यावर हल्ला केला. माझ्यावर आजपर्यंत ८ ते ९ हल्ले झाले आहेत, त्यांच्यावर कारवाई होत नाही. हल्लेखोरांवर कारवाई झाली असती तर मला आज संरक्षण द्यायची सुद्धा गरज पडली नसती. पोलिसांचा संरक्षण असताना देखील काल माझ्यावर हल्ला झाला, या लोकांना वर्दीची भीती नसावी, यांना माहिती आहे की हल्ला केल्यावर काहीच होत नाही, अजून अनेकांवर हल्ला करतील. हे आता सांगत आहेत की अंतर्गत विवाहाबद्दल बोललो म्हणून माझ्यावर हल्ला केला, या लोकांना कल्पना नाही की छत्रपती शाहू महाराजांनी शंभर पेक्षा अधिक आंतरजातीय विवाह लावून दिले होते, यांना शाहू महाराज कळायला यांच्या पुढच्या शंभर पिढ्या जातील, असंही पुढे लक्ष्मण हाकेंनी म्हटलं आहे.

महाराष्ट्र ओरबाडून खाण्याचे काम या मंडळींनी केलं आहे. पाहुण्या रावळ्यांचं राज्य या लोकांनी महाराष्ट्रावर आणलं, सहकारी संस्था यांच्या नावावर केल्या. महाराष्ट्र राज्यातला 50 ते 60% ओबीसी समाज हा मुख्य प्रवाहाच्या बाहेर आहे, हा समाज आजही सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेत आहे, असंही पुढे लक्ष्मण हाके म्हणालेत.

Laxman Hake:  रेस्टॉरंटमध्ये नाश्ता करण्यासाठी थांबले तेव्हा…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण हाके हे शनिवारी दुपारी पाथर्डीकडे जात असताना अहिल्यानगर बायपास रोडवरील एका रेस्टॉरंटमध्ये नाश्ता करण्यासाठी थांबले. त्यानंतर परत जात असताना काही इसमांनी त्यांच्या गाडीवर हल्ला चढवला. काठ्यांनी केलेल्या या हल्ल्यात गाडीचे मोठे नुकसान झाले. मात्र, सोबत असलेल्या पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत हाके यांना सुरक्षित बाहेर काढले. या प्रकरणी तिघा हल्लेखोरांना ताब्यात घेण्यात आले असून नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Laxman Hake:  दहा सेकंद उशीर झाला असता तर बांबू थेट आमच्या डोक्यात

दरम्यान, हाके यांनी नुकतीच फेसबुक पोस्ट करत आपले शत्रू वाढत असल्याचे नमूद केले होते. त्यानंतर अवघ्या एका दिवसात झालेल्या या हल्ल्याने खळबळ उडाली आहे. हाके यांनी सांगितले की, हल्ल्यात 10 ते 12 जण सहभागी होते. पोलिसांच्या दोन गाड्या सोबत असूनही हल्लेखोरांनी दोन ते तीन फुटांचे बांबू घेऊन आमच्यावर बेछूट प्रहार केला. “दहा सेकंद उशीर झाला असता तर बांबू थेट आमच्या डोक्यात बसले असते,” असे ते म्हणाले. या हल्ल्यात त्यांच्या एका सहकाऱ्याचे हात-पाय फ्रॅक्चर झाले असून डोक्याला टाके घालावे लागले आहेत.

आणखी वाचा

Comments are closed.