ईडब्ल्यूएस, एसईबीसी अन् आता ओबीसी; एका समाजाला किती ठिकाणी आरक्षण देणार? लक्ष्मण हाकेंचा सवाल,
बीड: राज्यात सध्या मराठा आरक्षणासह ओबीसी आरक्षणाच्या विषयावरून वातावरण तापल्याचं चित्र आहे. अशातच ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी राज्यभरात ओबीसी जोडो अभियान यात्रा काढणार असल्याचं सांगितलं आहे, तर ईडब्ल्यूएस, एसईबीसी आणि आता ओबीसी ( EWS, SEBC and now OBC) एका समाजाला किती ठिकाणी आरक्षण देणार असा सवाल लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केला आहे. आगामी काळात महाराष्ट्रभर ओबीसी जोडो अभियान यात्रा काढली जाणार आहे. सध्या पावसाच्या कचाट्यात शेतकरी अडकल्याने आम्ही थांबलो आहेत. मात्र ओबीसीच्या न्याय हक्क अधिकाराची लढाई नांदेड जिल्ह्यातून सुरू होऊन चार ते पाच टप्प्यात ओबीसी अभियान कार्यक्रम होणार असल्याचं ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी बीडमधून जाहीर केले आहे.
Laxman Hake: आजही उठाव होत नाही अशी खंत
मराठा समाजाला राज्य सरकारने एसईबीसी आणि केंद्र सरकारने शिक्षणात 10% आरक्षण दिले आहे. त्यामुळे ईडब्ल्यूएस मधून घ्यायचे एसईबीसी मधूनही घ्यायचे आणि पुन्हा ओबीसीतून आरक्षण घ्यायचे एका समाजाला किती ठिकाणी आरक्षण देणार आहात? असा प्रश्न हाके यांनी उपस्थित केला. ओबीसीच्या आरक्षणातून गावगाड्यातील घटक सरपंच, नगरसेवक, महापौर होत होते. यापुढे ते होणार नाहीत. कारण ओबीसीचे आरक्षण संपलेले आहे. आजही उठाव होत नाही अशी खंत हाके यांनी बोलून दाखवली. त्यामुळे आगामी काळात पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी लक्ष्मण हाके ओबीसी जोडो अभियान यात्रा काढणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
Laxman Hake: एका समाजाला तुम्ही किती ठिकाणी आरक्षण देणार
याबाबत बोलताना ओबीसी नेते लक्ष्मण हाके म्हणाले, एसईबीसीचं आरक्षण ऑलरेडी मराठा बांधवाना महाराष्टॅ शासनाने दिलं आहे. त्याचबरोबर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनादुरूस्ती करून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (Economically Weaker Sections)मध्ये दहा टक्के आरक्षण दिले आहे. म्हणजे ईडब्ल्यूएस पण घ्यायचं, एसईबीसी पण घ्यायचं, आता पुन्हा ओबीसीमधून पण आरक्षण मागायचं म्हणजे घ्यायचं, घेतलंच आहे आता, म्हणजेच एका समाजाला तुम्ही किती ठिकाणी आरक्षण देणार आहात. ईडब्ल्यूएस, एसईबीसीमध्ये, ओबीसीमध्ये आणि ओबीसीमधील आरक्षण गावगाड्यातील जो ओबीसीचा काही घटक सरपंच व्हायला लागला होता, पंचायत समिती मेंबर व्हायला लागला होता, जिल्हा परिषद मेंबर व्हायला लागला होता, नगरसेवक होत होता, एखाद्या शहरांमध्ये महापौर होत होता, तो आता होणार नाही. इथून पुढच्या कालावधीमध्ये ओबीसीचा आरक्षण संपलेलं आहे, अजूनही उठाव होताना दिसून येत नाही महाराष्ट्रामध्ये ही खंत आहे, असं हाकेंनी म्हटलं आहे.
Laxman Hake: ओबीसी समाज कमालीचा एकजूट झालेला दिसेल
पुढे ते म्हणाले, पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही ओबीसी जोडो अभियान ओबीसींची यात्रा आम्ही काढणार आहोत, आता सणाचा काळ आणि पावसाचा काळ गेलेला आहे, पाऊस आला पाऊस गेला, पावसाच्या कचाट्यामध्ये शेतकऱ्यांना मोठ्या त्रास झाला आहे, म्हणून आम्ही काही दिवस थांबलेलो होतो. परंतु ओबीसीच्या या न्याय हक्काची लढाई नांदेड जिल्ह्यापासून सुरु होईल चार-पाच टप्प्यांमध्ये हा ओबीसी जोडो अभियानाचा कार्यक्रम पार पडेल, यानंतर महाराष्ट्रामधील ओबीसी समाज कमालीचा एकजूट झालेला दिसेल असंही पुढे लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे.
आणखी वाचा
Comments are closed.