सोलापूरमध्ये राजकीय भूकंप, फडणवीसांच्या बंगल्यावर रात्री 11.30 वाजताच्या गुप्त बैठकीत नेमकं काय
सोलापूर राजकारण बातम्या: आगामी जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. भाजपकडून (BJP) राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार माजी आमदारांना गळाला लावण्यात यश मिळाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी ही मोहीम फत्ते केली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यातील काही माजी आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली होती. या चर्चेवर आता शिक्कामोर्तब झाले आहे. दोन दिवसांपूर्वी भाजप आमदार प्रशांत परिचारक यांच्या कार्यक्रमासाठी मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे सोलापूरमध्ये आले होते. त्यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून या चार माजी आमदारांच्या पक्षप्रवेशाची यशस्वी बोलणी झाली. यानंतर गुरुवारी रात्री मुंबईतील देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत या माजी आमदारांच्या भाजप प्रवेशावर मंजुरीची मोहोर उमटली. त्यामुळे येत्या चार-पाच दिवसांमध्ये हे माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करतील. सोलापूरमधील आगामी नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. (Solapur News)
सूत्रांच्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री 11.30 वाजता देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर सोलापूरमधील राजकीय भूकंपाची पटकथा रचली गेली. वर्षा बंगल्यावरील या बैठकीला मोहोळचे माजी आमदार राजन पाटील, दिली माने, यशवंत माने आणि बबनदादा शिंदे यांची दोन्ही मुलं रणजित शिंदे आणि विक्रम शिंदे हे दोघेजण उपस्थित होते. बबनदादा शिंदे हे सध्या अमेरिकेत उपचार घेत असल्याने त्यांची मुलं या बैठकीसाठी आली होती. या सगळ्यांनी, ‘आम्हाला तातडीने भाजपमध्ये प्रवेश करायचा आहे’, असा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली. त्यामुळे येत्या चार-पाच दिवसांमध्ये या सर्वांचा भाजप पक्षप्रवेशाचा कार्यक्रम संपन्न होईल, अशी माहिती आहे. या सर्वांसोबत सांगोला आणि पंढरपूरमधील काही पदाधिकारी आणि कार्यकर्तेही भाजपचे कमळ हातात घेणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
BJP in Solapur: सोलापूर जिल्हा परिषदेवर भाजपचं एकहाती वर्चस्व
सोलापूर जिल्ह्यातील या चार माजी आमदारांना गळाला लावल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपची ताकद वाढणार आहे. या पक्षप्रवेशामुळे महानगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांमध्ये भाजपला मोठा फायदा होणार आहे. तसेच सोलापूर जिल्हा परिषदेतही भाजपला स्वबळावर सत्ता आणता येईल. जेणेकरून जिल्हा परिषदेत भाजपचा अध्यक्ष होऊ शकतो. विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यात शरद पवार गटाचे चार आमदार निवडून आले होते. मात्र, आता जयकुमार गोरे यांनी या भागातील माजी आमदार फोडून दाखवले आहेत.
Jaykumar Gore Solapur: जिथे पक्षाची ताकद कमी तिकडे भाजपला बळकट करण्याचा प्रयत्न: जयकुमार गोरे
आगामी जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकांसाठी भाजपकडून जिथे आवश्यकता आहे तिथे पक्षाची ताकद वाढवण्यासाठी
काही पक्षप्रवेश केले जात आहेत. यामध्ये सोलापूर शहरमधील माढ्याचे बबनदादा शिंदे, राजन पाटील यांच्यासह अन्य लोकांचे प्रवेश अपेक्षित आहेत. काल रात्री या लोकांची चर्चा झाली आहे. त्यानुसार चार-पाच दिवसांत या सगळ्यांचे पक्षप्रवेश होतील, अशी माहिती सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.
सोलापूर जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही महायुती म्हणूनच लढणार आहोत. मात्र, सोलापूर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचा झाला पाहिजे, ही मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे. या पक्षप्रवेशामुळे निष्ठावंतांवर अन्याय होणार नाही. जिथे पक्षाची ताकद कमी आहे, तिकडे पक्ष मजबूत करण्याचा हा प्रयत्न आहे. सोलापूर शहरचा विचार केला तर तिकडे कधीही भाजपचा उमेदवार निवडून आला नाही. तिकडे काही लोकांना पक्षात घेतले जात आहे. स्थानिक नेतृत्त्वाशी चर्चा करुन मुख्यमंत्री पुढील निर्णय घेतील, असेही जयकुमार गोरे यांनी सांगितले.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.