पडक्या घरातच पूरग्रस्त लाडक्या बहिणीनं केलं पालकमंत्र्याचं स्वागत; गोरे म्हणाले घर बांधून देतो
सोलापूर : यंदा दिवाळीपूर्व पावसाने सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील माढा तालुक्यात शेती पिकांचं आणि घरांच मोठं नुकसान केलं. बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला खास नदीच्या पुरातील पाण्यानं हिसकाऊ नेला. ऐन दिवाळीच्या तोंडावर गावकरी, शेतकरी यांच्यावर शिमग्याची वेळ आल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे, काही स्वयंसेवी संस्थांसह शासनानेही मदतीसाठी पुढाकार घेतला होता. त्याच पार्श्वभूमीवर आज जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी माढा तालुक्यातील पूरग्रस्त कुटुंबीयांना दिवाळी किट आणि भाऊबीज भेट वाटप केली. यावेळी, माढा तालुक्यातील केवड गावात एका लाडक्या बहिणीने आपल्या पडलेल्या घरातच पालकमंत्र्यांचं स्वागत करत ओवाळणी केली. तसेच, घर बांधून देण्याची मागणीही केली.
पालकमंत्री गोरे यांनी माढा तालुक्यातील केवड, उंदरगाव आणि वाकाव या गावांना भेटी दिल्या, यावेळी ते बोसत होते. पूरग्रस्त भागातील प्रत्येक कुटुंबासाठी मुख्यमंत्र्यांचे पत्र देत शासन आणि देवा भाऊ तुमच्या पाठीशी आहे, शासनाने जाहीर केलेले पॅकेजची नुकसान भरपाई दिवाळीपूर्वी तुमच्यापर्यंत पोचविण्याचा शासन प्रयत्न करीत असल्याचे या पत्रात म्हटले आहे. याचवेळी, देवाभाऊंची दिवाळी भेट घेऊन माढ्यातील पूरग्रस्त केवड गावांमध्ये पालकमंत्र्यांचे पडक्या घरातच ओवाळून महिलेने स्वागत केले. सीना नदीला आलेल्या महापुरामुळे केवड येथील विद्या भोकरे या महिलेचे संपूर्ण घर पडले होते.
पालकमंत्री आज भेटीसाठी आल्याचे पाहून विद्याताई यांनी पडक्या घरातच त्यांचे स्वागत केले. चारी बाजूंनी पडलेल्या घरात कसे राहावे, आम्हाला घरकुल देण्याची मागणी यावेळी त्यांनी केली. संपूर्ण घरात पाणी शिरल्याने घर तर पडून गेलेच, शिवाय शेतातील पिकेही वाहून गेल्याचे त्यांनी पालकमंत्र्यांना सांगितले. माझ्यासारख्या अनेक गोरगरिबांची घरे पडली असून त्यांनाही घरकुल देण्याची विनंती या ताईनी केली. भोकरे ताई यांच्या डोळ्यातील अश्रू पाहून जयकुमार गोरे यांनी घरकुल बांधून देण्याचे आणि शेतीतील नुकसानीची मदत देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर देवा भाऊंकडून आणलेली मदत गोरे यांनी विद्याताई भोकरे यांना दिली.
मोठ्या दुख:तही आनंदाची दिवाळी
आपली परिस्थिती आणि गावातील इतर लोकांची झालेली अवस्था आपण पालकमंत्र्यांना सांगितल्याचे विद्याताई यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले. पालकमंत्र्यांनी घरकुल देण्याचे आश्वासन दिल्याने त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले होते. दरम्यान, माढा तालुक्यातील उंदरगाव, केवड, वाकाव या गावात डीपीडीसीच्या माध्यमातून बनविण्यात आलेले 18 पदार्थांचे किट आणि भाऊबीज म्हणून लाडक्या बहिणींना साडी आणि पुरुषाला पोशाख याचे वाटप सुरू झाले आहे. सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबासाठी मुख्यमंत्र्यांच्या सहीचे पत्र बाधित कुटुंबाचे नाव टाकून दिले जाणार आहे. याच पत्रात मुख्यमंत्र्यांनी तुमचा देवा भाऊ तुमच्या पाठीशी असल्याचे सांगत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.