दिवाळीदिनी अपघाताच्या दोन घटना, 1 ठार 2 जखमी; साताऱ्यात हुल्लडबाज तरुणांची कार पलटी
मुंबई : राज्यात एकीकडे दिवाळीचा (Diwali) उत्साह आणि आनंद साजरा होत असताना राज्यातील दोन जिल्ह्यात अपघाताच्या घटना घडल्या आहेत. सातारा (Satara) आणि विदर्भातील वाशिम जिल्ह्यात अपघाताच्या घटना घडल्या असून या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. तर, दोघे जखमी झाल्याची माहिती आहे. वाशिम जिल्ह्यातील पुसद येथे झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला असून एकजण गंभीर जखमी आहे. यातील जखमीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सातारा जिल्ह्यातील सातारा कास रोडवर रेसिंग कारच्या नादात दोन-चार गाड्यांचा भीषण अपघात झाला. येथील गणेश खिंड परिसरातील ही घटना असून 5 चार चाकी गाड्यांची रेस लागली होती. त्यामध्ये, एक चार चाकी गाडी पलटी झाल्याने इतरही गाड्या त्यास धडकल्याची घटना घडली. हुल्लडबाजी करताना कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. दिवाळीच्या दिवशी अतिउत्साही पर्यटकांची सातारा-कास रोडवर हुल्लडबाजी सुरू होती. त्यावेळी झालेल्या या अपघातात दोन जण जखमी झाले असून त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, हुल्लडबाज पर्यटकांवर पोलिसांकडून कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.
वाशिमध्ये दुचाकी अन् वाहनाची धडक
वाशिम जिल्ह्यातही दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक बसल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील एक जण ठार झाला असून एक गंभीर जखमी आहे. वाशिम ते पुसद मार्गावर एका दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने हा अपघात झाला. त्यामध्ये दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाला असून एक गंभीर जखमी आहे. जखमीला तात्काळ वाशिमच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुचाकीला ट्रॅक्टरने धडक दिल्याची चर्चा असून, दुचाकीला धडक देताच धडक देणारे वाहन अपघात स्थळावरून पसार झाले होते. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चौकशी सुरू केली आहे.
हेही वाचा
प. महाराष्ट्रातील मराठा कुणबी समाजाला जीआरचा फायदा होणार नाही; मंत्री बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं
आणखी वाचा
Comments are closed.