सुभाष देशमुखांच्या विरोधानंतर दिलीप मानेंच्या भाजप प्रवेशाला ब्रेक, सोलापूरमध्ये हालचालींना वेग
सोलापूर राजकारण बातम्या: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूरमध्ये विरोधी गटातील महत्त्वाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना भाजपकडून (BJP) गळाला लावले जात आहे. याच मोहीमेचा एक भाग म्हणून सोलापूर जिल्ह्यातील अनेक बडे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्या पुढाकाराने ही मोहीम राबवली जात आहे. मात्र, भाजपमध्ये होणाऱ्या या इनकमिंगला भाजपचे स्थानिक आमदार सुभाष देशमुख (Subhash Deshmukh) यांनी विरोध दर्शवला होता. या विरोधामुळे काँग्रेसचे माजी आमदार राहिलेल्या दिलीप माने (Dilip Mane) यांच्या पक्षप्रवेशाला तुर्तास ब्रेक लागल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, उर्वरित नेत्यांचे पक्षप्रवेश हे लवकरच पार पडणार आहेत. (Solapur News)
सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील आणि यशवंत माने यांचा बुधवारी भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. मुंबईतील भाजपच्या पक्ष कार्यालयात दुपारी 12 वाजता पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडले. तर माढा मतदारसंघाचे माजी आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे हेदेखील बुधवारी कमळ हातात धरतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काल रविवारी फलटण दौऱ्यावर होते. या कार्यक्रमात माजी आमदार राजन पाटील हे देखील मंचावर पाहायला मिळाले होते. या कार्यक्रमानंतर राजन पाटील आणि यशवंत माने यांच्या भाजप प्रवेशाची तारीख निश्चित झाली.
Solapur News: जयकुमार गोरे हे सोलापूर जिल्ह्यात महायुतीबाबत निर्णय घेणार
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यात भाजपने स्वबळावर लढण्याचे जवळपास निश्चित केले आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष यंदा भाजपचाच असेल, अशी भाषा वारंवार सुरु आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडून स्थानिक पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी इतर पक्षातील नेत्यांना सामावून घेतले जात आहे. जिल्हा पातळीवर युतीबाबतचा अंतिम निर्णय सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे घेणार असल्याचेही कल्याणशेट्टी यांनी स्पष्ट केले होते. “संघटनेचे जे प्रमुख आहेत, ते जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल. पण सध्या आमची तयारी स्वबळावर लढण्याचीच आहे,” असेही त्यांनी सांगितले.
Shivsena Raigad News: रायगड जिल्हा ठाकरे गटाला झटका
रायगड जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाला लागलेली गळती थांबायचं नाव घेत नाही. काही दिवसांपूर्वी रायगड जिल्हा संपर्क प्रमुखपदाचा तडकाफडकी राजीनामा देणारे नागेंद्र राठोड भाजपच्या गळाला लागले आहेत. राठोड यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला असून उद्या 28 ऑक्टोबर रोजी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत ते हातात कमळ घेणार आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी राठोड यांचा प्रवेश भाजपसाठी रायगड मध्ये महत्वाचा ठरणार आहे. पक्षातील अंतर्गत गटबाजीला कंटाळून राठोड यांनी पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष होते. अखेर त्यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.