टीम इंडियाला सोडून अमोल मुझुमदार वरणभात खायला पार्ल्यातील घरी आले, म्हणाले, फिश फ्राय…


अमोल मुझुमदार विश्वचषक २०२५: भारतीय महिला क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत एकदिवसीय विश्वचषकावर कोरले आहे. रविवारी नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील मैदानात रंगलेल्या सामन्यात भारतीय महिला संघाने ही ऐतिहासिक कामगिरी केली. भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक आणि मुंबईच्या रणजी संघाचा माजी खेळाडू अमोल मुझुमदार (Amol Muzumdar) या विजयामुळे अचानक प्रकाशझोतात आले. भारतीय संघाने पहिल्यांदाच विश्वचषक (World Cup 2025) जिंकल्यानंतर अमोल मुझुमदार यांच्यावर चहुबाजूंनी कौतुकाचा वर्षाव होत आहे. भारतीय महिला संघ मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (पीएम मोदी) यांच्या निवासस्थानी जाणार आहे. तत्पूर्वी सोमवारी अमोल मुझुमदार विशेष परवानगी घेऊन मुंबईच्या पश्चिम उपनगरात असणाऱ्या पार्ले येथील जयविजय सोसायटीतील आपल्या घरी येऊन गेले. यावेळी त्यांनी ‘एबीपी माझा’शी संवाद साधताना विश्वचषक जिंकण्याचा प्रवास उलगडला.

मला आनंद आहे की, हरमनने विश्वचषक उचलला. तेव्हा मनाला खूप समाधान मिळाले. आमची दोन वर्षांची मेहनत पूर्णत्त्वाला गेली. आम्ही सराव करताना 30 ऑक्टोबरची सेमीफायनल नव्हे तर 2 नोव्हेंबरची फायनल खेळण्याच्यादृष्टीने रणनीती आखली होती. 2 नोव्हेंबर हा माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस असेल. याच महिन्यात माझा वाढदिवस आहे. त्यापूर्वीच हरमन आणि तिच्या संघाने मला वाढदिवसाची भेट दिली आहे. यापुढे बरीच लढाई बाकी आहे. मात्र, भारतीय महिला संघाची ही कामगिरी हा एक मैलाचा दगड आहे, असे अमोल मुझुमदार यांनी म्हटले.

माझ्या वडिलांनी मी तरुणपणी खेळत होतो तेव्हा एकच गोष्ट सांगितली होती की, धावा करत राहा, काम करत राहा. भारतीय महिला संघाने विश्वचषक जिंकल्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळेल. उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 338 धावांचा डोंगर उभारला होता. तेव्हा सर्वजण खचले होते. पण मी त्यावेळी ड्रेसिंग रुममधील बोर्डवर ‘We just need one more run for final’, असा मजकूर लिहला. हा संदेश माझ्या मनातून आला होता. त्याप्रमाणे आम्ही खेळलो आणि जिंकलो. गेली दोन वर्षे सर्व खेळाडूंनी अमाप प्रयत्न केल्याचे अमोल मुझुमदार यांनी सांगितले.

Amol Muzumdar Team India: सोशल मिडिया पाहायचो नाही, बायकोलाही सांगून ठेवलं होतं….

यावेळी अमोल मुझुमदार यांनी विश्चचषकाची तयारी सुरु असताना नेमकी कोणती पथ्यं पाळली, याबाबत रंजक माहिती दिली. गेल्या दोन महिन्यांपासून मी सोशल मीडिया पाहिला नाही. एकही अकाऊंट उघडले नाही. तसेच मी बायकोलाही सांगून ठेवले होते की, तिथे काय सुरु आहे, हे मला सांगू नको. या दोन महिन्यांमध्ये मी घरचा वरण भात आणि फिश फ्रायची खूप आठवण यायची. मी आज बायकोला फोन केला आणि म्हणालो, आज घरी येतो, उद्या जायचे आहे. त्यामुळे मी टीम मॅनेजमेंटची विशेष परवानगी घेऊन आलो. आता घरी जाऊन मस्त वरणभात खाईन. जयविजय सोसासटीबद्दल मी काय बोलू. गेली 22 वर्षे मी इथे राहत आहे. मला बरोबर आठवत आहे की, माझ्या लग्नाला 22 वर्षे झाली. जगाच्या पाठीवर मी कुठेही गेलो आणि विचारले की मी सांगतो मी पार्ले येथील जयविजय सोसायटीत राहतो, असेही अमोल मुझुमदार यांनी म्हटले.

आणखी वाचा

टीम इंडियाचा ‘कबीर खान’…कोण आहे भारतीय महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमदार?

आणखी वाचा

Comments are closed.