मुलगी ठाकरे गटाकडून नगराध्यक्षपदाची उमेदवार? वडिलांकडून भाजप जिल्हाध्यक्षांचा राजीनामा
मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा (Election) बिगुल अखेर वाजला असून नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांची घोषणा करण्यात आल आहे. पुढील महिनाभरातच या निवडणुकांचा रणधुमाळी संपुष्टात येणार असल्याने स्थानिक राजकीय पक्षातील नेत्यांची चांगलीच धावपळ उडाली आहे. त्यामुळे, लवकरात लवकर निर्णय घेऊन पुढील रणनीती आखणं क्रमप्राप्त असणार आहे. कोकणात भाजप स्वतंत्र लढणार असल्याचे संकेत यापूर्वी भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी दिले होते. त्यानंतर, आता रत्नागिरी भाजपच्या (BJP) जिल्हाध्यक्षांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, या राजीनाम्यामागे लेकीच्या राजकीय करिअरचं गणित असल्याची चर्चा देखील मतदाराचा धक्का होत आहे.
रत्नागिरीतील भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी तडकाफडकी आपला जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. चिपळूणमधील भाजपच्या एका कार्यक्रमाच त्यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे आपला जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे, अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भाजपमध्ये राजेश सावंत यांच्याकडे दक्षिण रत्नागिरीचा जबाबदारी होती. मात्र, नगरपालिका निवडणुकांपूर्वीच त्यांनी पदाचा राजीनामा दिला असून लेकीसाठी बापाने राजकीय करिअर पाणी सोडल्याची चर्चा मतदारसंघात होत आहे. राजीनाम्याचे कारण अद्याप स्पष्ट नसले तरी मुलीला ठाकरे गटातून नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळणार असल्याने वडिलांनी राजीनामा दिल्याची माहिती आहे.
लेकीसाठी वडिलांचा राजीनामा
राजेश सावंत यांची मुलगी शिवानी माने ही ठाकरे गटाचे कोकणातील अर्थात रत्नागिरीतले नेते बाळ माने यांची सून आहे. येत्या नगरपालिका निवडणुकांमध्ये नगराध्यक्षपदासाठी ती इच्छुक आहे, किंवा ठाकरे गटातून नगराध्यक्षपदाचा चेहरा म्हणून तिच्याकडे पाहिले जात आहे. त्यामुळे, लेकीसाठी वडिलांना आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा होत आहे. कारण, सावंत आणि माने हे व्याही आहेत. विधानसभा निवडणुकीच्यावेळी देखील भाजपाचे जिल्हाध्यक्ष सावंत यांनी व्याही असलेल्या माने यांना मतदानासाठी मदत केल्याची चर्चा झाली होती. दरम्यान, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी किंवा रत्नागिरी नगर परिषद निवडणुकांवेळी सावंत हे आतून आपल्या व्याही यांना मदत करत असल्याचा आरोप होऊ शकतो. त्या पार्श्वभूमीवर हा राजीनामा दिल्याची चर्चाही राजकीय वर्तुळातून होत आहे. मात्र, या राजीनाम्यामुळे स्थानिक राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी स्वीकारला राजीनामा
राजेश सावंत हे चांगले कार्यकर्ते आहेत पण ते सध्या अडचणीत आले. त्यांच्या मुलीचे लग्न झाले आहे, ती सध्या रत्नागिरीतील नगराध्यक्षपदासाठी इच्छुक आहे. त्यामुळे, पक्षाचे काम करताना कुठेही अडचण नको, याचमुळे राजेश सावंत यांनी राजीनामा दिला. त्यांचा राजीनामा मला मिळाला असून मी आणि वरिष्ठ यावरती विचार करू आणि निर्णय घेऊ, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे. चिपळूण येथे राजेश सावंत यांनी चव्हाण यांच्याकडे राजीनामा दिला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर भाजप जिल्हाध्यक्षांनी दिलेला राजीनामा कोकणातल्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चेचा विषय ठरला. त्यावर, आता चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.