पुणे जमीन घोटाळाप्रकरणात नवा ट्विस्ट; वादग्रस्त जागेचा व्यवहार रद्द करायचाय तर 42 कोटींची नोटीस
पुणे : पुण्यातील वादग्रस्त जमिनीच्या खरेदी व्यवहारावर गैरप्रकाराचे आरोप झाल्यानंतर पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीने तो व्यवहार रद्द केला होता. मात्र, या कंपनीने बुडवलेले मुद्रांक शुल्क आणि दंड या स्वरूपात 42 कोटी रुपयांची वसुली करण्याचे आदेश मुद्रांक शुल्क विभागाने दिले होते. या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी मुंढवा येथील वादग्रस्त जागेचा व्यवहार रद्द करायचा आहे, तर ४२ कोटी रुपयांची नोटीस का दिली? असा सवाल उपस्थित केला. बावनकुळे यांनी आपल्या खात्यातीलच अधिकाऱ्यांच्या कृतीवर अविश्वास व्यक्त केल्याने प्रशासनात आणि राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
Chandrashekhar Bawankule: आपण नोंदणी महानिरीक्षकांकडून माहिती घेणार
मुंढवा येथील वादग्रस्त जागेचा व्यवहार रद्द करायचा आहे, मग ४२ कोटींची नोटीस का दिली? असा सवाल महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केला असून, याबाबत आपण नोंदणी महानिरीक्षकांकडून माहिती घेणार असल्याचे त्यांनी काल (बुधवारी, ता १२) प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. दरम्यान त्यांनी या प्रकरणाचा तपास देखील निष्पक्ष होईल, असा विश्वासही व्यक्त केला आहे. व्यवहार रद्दकरण्यासाठी भरावयाच्या रकमेची माहिती खुद्द महसूलमंत्र्यांनाच नसल्याने आता आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
काल(बुधवारी, ता१२) महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे पुणे दौऱ्यावरती होते, भाजपच्या बैठकीसाठी बावनकुळे बुधवारी (दि.१२) पक्ष कार्यालयात आले होते. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी बोलताना ते म्हणाले, मुंढव्यातील सरकारी जमिनीच्या खरेदी-विक्रीत प्रथमदर्शनी दोषी दिसतात, त्यांच्यावर तत्काळ कारवाई केली आहे. तपासासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती नेमली आहे. या समितीला एका महिन्यात अहवाल देण्याच्या सूचना केल्या आहेत. महसूल विभागाचे आयुक्त विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली आहे. त्यामुळे योग्य कारवाई होईल, असेही त्यांनी सांगितले आहे. अहवाल आल्यानंतर सर्व गोष्टी स्पष्ट होतील. यामध्ये आणखी कोणी दोषी आढळले, तर त्यांच्यावरही कारवाई होईल. अहवाल येण्यापूर्वी त्यावर भाष्य करणे म्हणजे तपासाला बाधा पोहोचवण्यासारखे आहे.
Chandrashekhar Bawankule: पार्थ यांच्या सह्या नाहीत
बोपोडी येथील जमीन खरेदी प्रकरणामध्ये लिहून देणार किंवा लिहून घेणार म्हणून पार्थ पवार यांच्या कुठेही सह्या नाहीत. चौकशी महसूल आणि पोलिस विभाग स्वतंत्र करत आहेत. चौकशीमध्ये पक्षपात होणार नाही, शेवटी कागदपत्रे आहेत, असंही महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.शीतल तेजवाणी न्यायालयात गेल्याच्या प्रश्नावरती उत्तर देताना बावनकुळे म्हणाले, सरकारी प्रॉपर्टी खरेदी-विक्री आहे, सरकार न्यायालयात योग्य ती बाजू मांडेल.
आता या प्रकरणावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर हल्लाबोल केलाय.
Ambadas Danve on Chandrashekhar Bawankule: नेमकं काय म्हणाले अंबादास दानवे?
अंबादास दानवे ‘एक्स’वर पोस्ट करत म्हणाले की, तुमच्या विभागाचे अधिकारी दुप्पट दंड भरा म्हणून सांगतात, आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तुम्ही म्हणता की ‘तपासावे’ लागेल! अधिकाऱ्यांचा बळी द्यायचा होता तेव्हा तासाभरात निलंबनाची कागदे थेट बाजारात आणली गेली. आता पार्थ पावरांशी निगडित निर्णय घ्यायची वेळ आली की यांचा ‘अभ्यास’ सुरू झाला. ‘काका मला वाचवा’, या हाकेला ओ दिला आहे बावनकुळे यांनी. अजित दादांचा राजीनामा घेणे तर दूरच. आता त्यांच्या सुपुत्राच्या खिशाला चटका बसणार नाही, याची जबाबदारी मेवाभाऊंनी बावनकुळेंना दिलेली आहे. महाराष्ट्र आता थांबणार नाही, असा हल्लाबोल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर केलाय.
आणखी वाचा
Comments are closed.