दररोज 4 ते 5 लाख महिलांची ई-केवायसी, एक कोटी लाडक्या बहिणींची प्रक्रिया पूर्ण, काही दिवस बाकी


मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना ई केवायसी प्रक्रिया 18 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करायची आहे. ही ई केवायसी पूर्ण करण्यासाठी आता 5 दिवसांचा वेळ शिल्लक राहिला आहे. लाडकी बहीण योजना महिला व बालविकास विभागाकडून जुलै 2024  पासून राबवली जाते. या विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी दररोज चार ते पाच लाख महिलांची ई केवायसी प्रक्रिया ही साईटवर पूर्ण होत आहे. आतापर्यंत साधारणपणे 1 कोटी महिलांची ई केवायसी पूर्ण झाली असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली. यासोबतच ज्या महिलांच्या वडिलांचे किंवा पतीचे निधन झालं आहे, त्यांना येत असलेल्या अडचणींवर देखील मार्ग काढला जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

Ladki Bahin E KYC Website Changes : एकल महिलांसाठी वेबसाईटमध्ये तांत्रिक बदल होणार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर ई केवायसी प्रक्रिया सुरु झाल्यानंतर ज्या महिला एकल आहेत किंवा ज्या महिलांच्या वडिलांचं आणि पतीचं निधन झालंय. ज्या महिला घटस्फोटित आहेत, अशा महिलांना ई केवायसी प्रक्रिया करता येत नव्हती. अखेर महिला व बालविकास विभागानं त्याची दखल घेतली आहे. आदिती तटकरे यांनी अशा महिलांसाठी वेबसाईटमध्ये तांत्रिक बदल करणार असल्याचं सांगितलं आहे. ज्यांच्या पतीचं निधन झालं आहे, ज्यांच्या वडिलांचं निधन झालं आहे किंवा घटस्फोटित असतील म्हणजेच एकल महिला असतील त्यांच्यासाठी वेबसाईटवर काम करत आहोत. या महिलांच्या पतीचं किंवा वडिलांचं निधन झालं असेल तर त्याचं मृत्यू प्रमाणपत्र अपलोड करणे आणि घटस्फोटित महिलांसाठी घटस्फोटाचे कागदपत्रं अपलोड करण्यासंदर्भात वेबसाईटवर काही बदल करत आहोत, असं आदिती तटकरे यांनी बुधवारी माध्यमांसोबत बोलताना सांगितलं.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला लाभापासून वंचित राहणार नाहीत यासाठी काम करत आहोत. 18 नोव्हेंबरपर्यंत ई केवायसीची प्रक्रिया करायची आहे. जो मधल्या कालावधीत पाऊस झाला, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली. त्या पुराच्या परिस्थितीत अनेकांना कागदपत्रं गमवावी लागली. त्यासंदर्भातील निर्णय घेणं, मुदतवाढ देणे ते आम्ही निश्चित करणार आहोत. कोणताही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही, याची दक्षता नक्कीच घेणार असल्याचं आदिती तटकरेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याची रक्कम लाभार्थी महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आली आहे. आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांचं लक्ष ई केवायसीच्या मुदतवाढीकडे लागलंय.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.