कोल्हापुरात शिंदेंच्या गळाला मोठा नेता; ठाकरेंचे माजी आमदार उल्हास पाटील शिवसेनेत


कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या (Shivsena) ठाकरे आणि शिंदे गटातील उमेदवारांमध्ये जोरदार लढती झाल्या. मात्र, शिंदे गटाने बाजी मारत 57 आमदार निवडून आणले आहेत. त्यामुळे, यंदाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी सत्तेत असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेत मेगा भरती सुरू असल्याचं दिसून येत आहे. कालच जालन्यातील ठाकरे गटाच्या जिल्हाध्यक्षांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आज कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील मोठा आणि अनुभवी नेता शिंदेंच्या गळाला लागला आहे.

विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यामध्ये ठाकरे गटाच्या वाट्याला अवघ्या दोन जागा वाट्याला आल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजी होती. तर, शिरोळमधील ठाकरे गटाचे माजी आमदार उल्हास दादा पाटील हे स्वगृही म्हणजेच स्वाभीमानी शेतकरी संघटनेत परतले होते. आता, नगरपालिका, महापालिका निवडणुकांपूर्वी त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेचा भगवा हाती घेतला. त्यामुळे, कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाच्या गळाला मोठा नेता लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार राहिलेले उल्हास दादा पाटील यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. सन 2014 साली उल्हास पाटील शिवसेनेकडून शिरोळचे आमदार म्हणून निवडून आले होते, त्यानंतर 2024 सालची विधानसभा निवडणूक त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चिन्हावर विधानसभा लढवली होती. मात्र, त्यांना पराभव पटकरवा लागला होता. येथून आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर विजयी झाले.

उल्हास पाटील कोण? (कोण आहे उल्हास पाटील)

शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या उल्हास पाटील यांनी लहानपणापासूनच शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचे विषय स्वत: अनुभवले आहेत, त्यातून त्यांना शेतकऱ्यांच्या मूलभूत समस्या माहित होत्या. त्यामुळे, शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी लढण्याचा निर्णय घेत त्यांनी शेतकऱ्यांसाठी काम करायला सुरुवात केली. उल्हास पाटील यांनी 1990 च्या दशकात काम सुरू केले. कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी त्यांनी अनेक आंदोलने केली आहेत, राजू शेट्टींच्या स्वाभीमानी शेतकरी संघटनेशी ते जोडले गेले. शिरोळ विधानसभा मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून प्रथम विधानसभेची उमेदवारी लढवली. मात्र, त्यांचा पराभव झाला. त्यानंतर, 2014 मध्ये शिवसेनेकडून निवडणूक लढवली आणि पहिल्यांदाच ते विधानसभेचे सदस्य म्हणून सभागृहात पोहोचले. दरम्यान, शिवसेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये उल्हास दादा पाटील यांचे मोठं काम राहिले आहे. त्यामुळे, त्यांच्या शिवसेना शिंदे गटातील प्रवेशाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

हेही वाचा

पुण्यातील नवले ब्रीज अपघात नेमका कसा घडला, 7 जणांचा मृत्यू; पोलीस अधिकाऱ्याने दिली माहिती

आणखी वाचा

Comments are closed.