कोल्हापुरात नागरिकांच्या जीवाशी खेळ, शीतपेय थंड करण्यासाठी वापरतायत चक्क मृतदेहासाठी वापरलेला बर्फ

कोल्हापुरमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शीतपेय विक्रेते नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळत असल्याचं समोर आलं आहे. रुग्णालयातील मृतदेह परगावी घेऊन जाण्यासाठी वापरला जाणारा बर्फ पाणी, ताक आणि शीतपेय थंड करण्यासाठी वापरत असल्याचं उघडकीस आलं आहे. छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयासमोरील हा प्रकार रंगेहाथ पकडण्यात आला.
छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनानंतर रुग्णाला बाहेर घेऊन जाणारा मृतदेह खराब होऊ नये यासाठी रुग्णवाहिकेत बर्फांच्या लादीचा वापर केला जातो. मृतदेह पोहोचवून रुग्णवाहिका परत आल्यानंतर आतील शिल्लक राहिलेल्या बर्फाची लादी आणि तुकडे सीपीआर समोरील परिसरात एका गटारीवर टाकून देण्यात येतो. हाच बर्फ एक विक्रेता गोळा करुन ताक, पाणी आणि शीतपेय थंड करण्यासाठी वापरत असल्याचे समोर आले.
काही कार्यकर्त्यांनी या विक्रेत्यावर पाळत ठेवून त्याला रंगेहाथ पकडले. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याशिवाय कार्यकर्त्यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या दुर्लक्षितपणाकडेही लक्ष वेधले आहे.
Comments are closed.