Video: अशोक सराफांसमोरच निवेदिता सराफ म्हणाल्या मी कट्टर बीजेपी; आमदार संजय केळकर म्हणाले..


मुंबई : दिवाळी सणाच्या उत्सवाहात काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक महेश कोठारे यांनी मी मोदीभक्त आहे, असे म्हणत मुंबई महापालिकेवर भाजपचे कमळ खुलेल असा दावा केला होता. त्यानंतर, सोशल मीडियातून महेश कोठारे यांना ट्रोलही करण्यात आली. तर, भाजप समर्थकांनी त्यांच्या बाजुने खिंड लढवल्याचं पाहायला मिळालं. आता, अभिनेत्री निवेदिता सराफ यांनीही, मी कट्टर बीजेपी असल्याचं म्हटलं आहे. त्यावर, ठाण्यातील आमदार संजय केळकर यांनी त्यांचे आभार मानत देश भाजपा (भाजप) करायचा असल्याचं म्हटलं. यंदाचा गंधार गौरव पुरस्कार हिंदी, मराठी चित्रपट आणि मालिका सृष्टीतील चतुरस्त्र अभिनेत्री निवेदिता जोशी सराफ यांना त्यांचेच पती आणि ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री अशोक सराफ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. बालदिनाचे औचित्य साधून 14 नोव्हेंबर रोजी रात्री ठाण्यातील (Thane) गडकरी रंगायतन येथे हा पुरस्कार सोहळा पार पडला. येथे कलाकार आणि राजकीयन नेतेमंडळी यांची चांगलीच फटकेबाजी पाहायला मिळाली.

गंधार गौरव पुरस्कार सोहळ्यात शाल, श्रीफळ सन्मानचिन्ह आणि 11 हजार 111 रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप होते. गायन क्षेत्रातील स्वरा जोशी हिला गंधार बाल कलाकार पुरस्कार देण्यात आला. याप्रसंगी संगितकार अशोक पत्की, आमदार संजय केळकर, अभिनेते विजय पाटकर, मंगेश देसाई, ज्येष्ठ साहित्यिक प्रा.प्रदीप ढवळ, गंधारचे मंदार टिल्लू आणि विलास ठुसे आदी मान्यवर उपस्थित होते. गंधार या बालनाट्य संस्थेच्यावतीने दरवर्षी गंधार गौरव सोहळ्याचे यंदाचे हे 10 वे वर्ष आहे.

याप्रसंगी बोलताना निवेदिता सराफ म्हणाल्या की, आज जी मी काही आहे ते माझे गुरु, माझे पती अशोक सराफ यांच्यामुळेच आहे, आज त्यांच्या हस्ते मला पुरस्कार मिळाल्याचा विशेष आनंद होत आहे. आमदार संजय केळकर यांचे बिहार विजयासाठी अभिनंदन. मी कट्टर बीजेपी असल्याने मला खूप आनंद झाला, असे म्हणत आपण राजकीय भूमिकेतून भाजपच्या समर्थक असल्याचं निवेदिता सराफ यांनी जाहीरच करुन टाकलं. माझ्या आयुष्यात अभिनयाची सुरुवात बालरंगभूमी पासून झाली. सुधा करमरकर माझ्या गुरू, त्यांच्या संस्थेत अनेक बालनाट्य केलं. मला स्टेजवर उभे राहायला कोणी शिकवले तर ते सुधाताईंनी. त्या काळात रत्नाकर मतकरी, सुधाताई हे सातत्याने बालनाट्य करत, महाराष्ट्रभर दौरे करत अशी आठवण त्यांनी सांगितली. बालनाट्य करणे कठीण पण काळाची गरज आहे, बालनाट्यात आपण उद्याचे चांगले प्रेक्षक घडवत असतो. नाटक कसे बघितले पाहिजे याचे प्रशिक्षण दिले जाते, चांगले प्रेक्षक बनतात. सभा धीटपणा येतो. त्यामुळे बालनाट्य शिबिरे घेतली पाहिजे. माझी वाटचाल बाल रंगभूमीपासून झाल्यामुळे मला हा माहेरचा पुरस्कार मिळाला आहे, असे वाटत असल्याचंही निवेदिता सराफ यांनी म्हटलं.

तिकडे बिहार इकडे भी ‘हार’ – पानसे

याठिकाणी गंधार गौरव पुरस्कार सोहळ्याऐवजी मंदार गौरव सोहळा केला पाहिजे, असे म्हणत अभिजीत पानसे यांनी मंदार यांचं कौतुक केलं. या राज्यात यांच्यासोबत बसण्याची आमची योग्यता नाही. इथे सम्राट अशोकानंतर ज्यांनी राज्य केलं ते दोन अशोक या ठिकाणी बसले आहेत. त्यांचं राज्य संपलं. पण, या दोघांचं राज्य आमच्या मनातून कधीही संपणार नाही, असे अभिजीत पानसे यांनी म्हटले. आज आमदार संजय केळकर खुशीने या ठिकाणी बसलेले आहेत. ‘बिहार’चा अर्थ आमच्यासाठी वेगळा आहे. तिकडे ‘बिहार’ इकडे भी ‘हार’.. अशा कुशीत आम्ही कधी बसणार ह्याचाच विचार करतो, असे म्हणत अभिजीत पानसेंनी बिहारच्या विजयाबद्दल अभिनंदनही केलं.

इतिहासाच्या पुस्तकात शिवाजी महाराजांचा प्रदीर्घ अभ्यासक्रमक असावा- पानसे

मी घाशीराम कोतवाल हिंदीमध्ये करत आहे, मंदार तुझा बालनाट्याचा प्रवास असाच सुरू राहू दे. डॉक्टर प्रदीप ढवळ यांचे शिवबा नाटक आपण पाहिले पाहिजे. शंभरहून अधिक प्रयोग त्यांनी बसवलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणणारी पिढी आता संपत चालली आहे, अशी खेदही पानसेंनी व्यक्त केली. आमदार बसले आहेत इथे, राज्यही त्यांचं आहे. आयसीआयसी,सीबीएससी, आणि बोर्डाच्या पुस्तकात, इतिहासाचा पुस्तकात महाराज एकाच पॅरेग्राफमध्ये संपताना आम्हाला अजूनही वाईट वाटत आहे. केळकर साहेब, तुम्ही त्या ठिकाणी चांगला प्रश्नांचा आवाज उठवता आणि याबाबत देखील उठवा. पहिला अभिनंदनाचा बॅनर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अभिजीत पानसे लावल्याशिवाय राहणार नाही, असे पानसे यांनी म्हटले. तेव्हा महाराजांवर बालपणापासून जे संस्कार घडत गेले ते आता लहान मुलांच्या मनामध्ये बिंबवणे आपल्या हातात आणि मोबाईलच्या जगात कितपत शक्य आहे, ते मला माहित नाही. शिवबा आणि गंधारसारखी संस्था टिकली पाहिजे, ते केवळ नाट्य निर्मितीसाठी नाही, कलेसाठी नाही तर महाराष्ट्रातल्या मातीच्या संस्कारासाठी ह्याच माझ्या शुभेच्छा, असेही पानसे यांनी म्हटले.

निवेदिता सराफ यांचे धन्यवाद – केळकर

महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी हे ठाणे शहर झालेलं आहे. आपल्या निवेदिता ताईंनी कबूल केलेलं आहे, बिहारच काय संपूर्ण देशामध्ये भाजपमय झालं पाहिजे. त्या भाजपच्या समर्थक आहे, त्यांना मी धन्यवाद देतो, असेही आमदार संजय केळकर यांनी निवेदिता सराफ यांच्याबद्दल म्हटले.

बिहारमध्ये डबल सेंच्युरी मारली

येथील कार्यक्रमात आमदार संजय केळकर यांना उद्देशून दिग्दर्शक आणि शिंदेंच्या शिवसेनेचे मंगेश देसाई म्हणाले, आपली युती कायम राहणार आहे.त्यानंतर, आमदार संजय केळकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मंदारच्या गंधार दशपूर्ती टीमचे मी अभिनंदन करतो. या संस्थेने दहा वर्षात अनेकांना पुरस्कार दिले, अशी ही चळवळ आहे. या चळवळीचा पतंग उंच भरारी मारत आहे. ठाणे कलावंतांची खाण आहे, अनेक कलाकार या सांस्कृतिक शहराला साजेल असे प्रेक्षक आणि श्रोते आहेत. या शहराने मला 4 वेळा निवडून दिले आहे. अशोक मामा महाराष्ट्राचे, जनतेचे पद्मविभूषण आहेत. त्यांच्या योगदानाला ही एकप्रकारची कृतज्ञता व्यक्त करत आहोत, असे केळकर यांनी म्हटले. बिहारमध्ये तुमच्या आशीर्वादाने डबल सेंच्युरी मारली. त्यामुळे डबल इंजिन सरकार किती चांगले असते हे जनतेने दाखवून दिले. व्यासपीठावर सिने नाट्य सृष्टीत असलेले हे डबल इंजिन इथे बसले आहेत, मी दोघांना सदिच्छा देतो असेही आमदार केळकर यांनी म्हटले.

किमान एकदातरी गड किल्ल्यावर गेलं पाहिजे

अभिजित जाता-जाता अनेक सूचना करून जातो, तो देखील ठाण्यातला आहे ना. छत्रपती शिवाजी महाराज यांचा मी एक दुर्गसेवक आहे. अभिजीतने जी काही सूचना केली, ती विधिमंडळात घेईन. परंतु, मी त्याच्याही पलीकडे सांगेल हे सगळं पुस्तकात देखील आलं पाहिजे. आम्ही चायना बॉर्डरपासून 100 मिटर अंतरावर छत्रपती शिवरायांचा अश्वारुढ पुतळा उभारत आहोत, अशी माहितीही आमदार केळकर यांनी दिली. आमच्या सह्याद्री प्रतिष्ठानचे कायमच आवाहन असतं की, महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणांनी वर्षातून किमान एकदा कुठल्याही गडावर जाऊन महाराजांच्या किल्ल्याची माती कपाळाला लावावी. छत्रपती शिवाजी महाराज यांचा विचार जगात पोहचला आहे. आमच्या सरकारच्या माध्यमातून 12 किल्ले युनिसेफने मान्य केलेले आहेत. आमचे देव आमचे महाराज आहेत, त्यांचं शौर्य जगात पोहचले आहे, असे म्हणत अभिजीत पानसेंच्या सूचनेवर आमदार केळकर यांनी प्रतिक्रिया दिली.

माझी सुरुवातही बालनाट्यापासूनच – अशोक सराफ

तुम्ही मोठ्या समारंभाला मला आवर्जून बोलावले माझा सत्कार केला, त्यासाठी मी तुमचा आभारी आहे. बालनाट्यापासून निवेदिता बाईने सुरुवात केली, आज त्यांनी एक उंची गाठली आहे. त्यांना भविष्यात अजून वेगळी उंची गाठायची आहे. निश्चित त्या गाठतील तेव्हा तुम्ही पुन्हा त्यांचा सत्कार कराल, असे अशोक सराफ यांनी यावेळी बोलताना म्हटले. बालनाट्यात त्यांनी किती प्राविण्य मिळवले हे मला माहीत आहे. तुम्ही तिची दखल घेतली ही फार मोठी गोष्ट आहे. गडकरी रंगायतनचे स्टेज माझे अत्यंत आवडते आहे. महाराष्ट्रातील सुंदर आणि रसिक प्रेक्षकांनी भरलेले हे स्टेज आहे. आम्ही ठाण्याला प्रयोग करताना नेहमी आनंदात असतो. ठाण्याचा प्रयोग नेहमी डोक्यावर घेतला आहे, आमच्या यशात तुमचाही सहभाग आहे, असे म्हणत संयोजकांचे कौतुकही अशोक मामांनी केले. माझीपण बालनाट्यपासूनच सुरुवात झाली पण मी इथे सांगितले नाही म्हणून आज माझा इथे सत्कार झाला नाही. हिने वयाच्या दहाव्या वर्षी सुरुवात केली, मी वयाच्या सातव्या वर्षी सुरुवात केली. त्यावेळी मी एकांकिका केली, त्या स्पर्धेत पहिले बक्षीस नट म्हणून मिळाले होते. त्यानंतर मला मला बक्षीस मिळवण्याची वाईट सुरुवात झाली,अशी मिश्कील टिपण्णी अशोक सराफ यांनी केली. त्यामुळे, माझा प्रवास पण बालनाट्य पासून आहे पण माझा हा प्रवास कोणी कॅन्सिडर करत नाहीत, असेही ते म्हणाले.

ठाण्याच्या प्रेक्षकांनी निवेदिताचा सत्कार करावा ही हृदय आनंदीत करणारी गोष्ट आहे, ती नशिबवान आहे. सत्कार खूप होतात पण कोण सत्कार करते हे कलाकार यांच्यासाठी महत्वाचे. तिला आनंद झाला आहे, पण मला अधिक आनंद झाला. तिने अविश्रांत मेहनत घेतली आहे. प्रत्येक रोलसाठी मेहनत घेऊन काहीतरी वेगळे देण्याचा प्रयत्न तिने केला आहे, तो तुम्ही रजिस्टर केलाल ही फार मोठी गोष्ट आहे. ठाण्याच्या प्रेक्षकांकडून सत्कार होतो हे फार महत्वाचे आहे, मी अनुभव घेतला आहे. या ठिकाणी प्रेक्षकांकडून माझा झालेले कौतुक मी विसरू शकत नाही. तुम्ही तिच्यावर नजर ठेवून आहात. तुमच्या कृपेची पाठिंब्याची तिला गरज आहे, या क्षणाला तुम्ही सुवर्णक्षण बनवला,आज मीच जास्त आनंदित आहे, असेही अशोक सराफ यांनी म्हटलं.

अशोक मामा आमच्या गुरुस्थानी – देसाई

आत्ताच या ठिकाणी टोलेबाजी करुन गेलेले अभिजीत पानसे ज्यांनी आज माझा आधार घेतला. मंदार ते गंधार, गंधार ते मंदार गेली दहा वर्षापासून हे समीकरण राहिलं आहे. गंधारमधल्या शिबिराची संख्या नेहमीच वाढत जाते. विद्यार्थी चांगल्या प्रकारे गंधारमधून घडत चालले आहेत, असे  दिग्दर्शक मंगेश देसाई यांनी म्हटलं. विद्यार्थ्यांना अनेक ठिकाणी संधी मिळाली आहे. अशोक मामा आणि निवेदिता ताईला दीर्घायुष्य मिळू दे, त्यांची छान छान काम आम्हाला बघायला मिळू दे. ज्यामधून आम्हालाही काही शिकायला मिळेल. हे आमचे गुरुस्थानी आहेत, गुरुस्थानी राहतील यामध्ये काही वादच नाही, असेही देसाई यांनी म्हटले.

हेही वाचा

Mumbai Municipal Corporation Election 2025: काँग्रेस मुंबई महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढणार, मुंबईतील शिबिरात मोठी घोषणा

Comments are closed.