पती-वडील नसलेल्या लाडक्या बहिणींसाठी ई-केवायसी वेबसाईटमध्ये बदल, मात्र एक काम करावं लागणार


मुंबई : महायुतीला महाराष्ट्राच्या सत्तेत पुन्हा बसवण्यामध्ये गेमचेंजर ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना ई-केवायसी पूर्ण करावी लागणार आहे. लाडक्या बहिणींना 18 सप्टेंबर ते 18 नोव्हेंबर या कालावधीत ई- केवायसी करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. आता ई-केवायसीची मुदत संपण्यास काही दिवस शिल्लक राहिले आहेत. लाडक्या बहिणींना – ई केवायसी करण्यासाठी पती किंवा वडिलांचं आधार कार्ड प्रमाणित करुन घ्यावं लागते. मात्र,ज्या महिलांच्या वडिलांचं किंवा पतीचं निधन झालं आहे, अशा महिलांना ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येत नव्हती.  या महिलांसाठी वेबसाईटमध्ये तांत्रिक बदल करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र, अशा महिलांना त्यांचा आधार कार्ड क्रमांक प्रमाणित करुन ई केवायसी अपूर्ण ठेवावी लागणार आहे. म्हणजेच अशा लाडक्या बहिणींना आधार कार्ड प्रमाणित करुन अपूर्ण केवायसी करावी लागेल.

Ladki Bahin Yojana : ई – केवायसी कुठं करायची?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करणेसाठी शासनाने https://ladakibahin.maharashtra.gov.in  या वेबसाईटवर ई-केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. राज्य भरातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी आपली ई-केवायसी 18 नोव्हेंबरपर्यंत करणं आवश्यक आहे. ई-केवायसी प्रक्रिया मोबाईलवरुन देखील पूर्ण करता येते.

पती किंवा वडील नसणाऱ्या महिलांनी काय करायचं?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ज्या महिला लाभार्थ्यांच्या पती आणि वडील दोघांचा मृत्यू झाला आहे किंवा ज्या अविवाहित महिलांचे वडील मृत आहेत तसेच विधवा, घटस्पोटीत, परित्यक्त्या महिला यांना ई-केवायसी करताना आधार क्रमांक कोणाचा नोंदवायचा अशी अडचण निर्माण झाली होती. ही अडचण सोडवण्यासाठी वेबसाईटमध्ये तांत्रिक बदल करण्यात येणार आहेत. त्यापूर्वी शा महिलांनी फक्त त्यांचेचे आधार कार्ड प्रमाणित करुन अपूर्ण ई-केवायसी  18 नोव्हेंबर 2025 पर्यंत करुन घेणे आवश्यक आहे.  अपूर्ण ई-केवायसी पूर्ण करुन घेणेबाबत शासनामार्फत स्वतंत्र निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच अशा महिलांनी परस्पर इतर नातेवाईकांचे आधार कार्ड प्रमाणीकरण करु नये, असं सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याची रक्कम देखील महिलांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. ज्या महिला पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या लाभार्थी आहेत त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून दरमहा 500 रुपये दिले जातात.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.