संतापजनक! स्पर्धा परीक्षेची तयारी करताना ओळख; PSI कडून कॅफेत नेऊन तरुणीवर अत्याचार, खासगी फोटो


छत्रपती संभाजीनगर गुन्हा: छत्रपती संभाजीनगरमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणीवर प्रशिक्षणार्थी उपनिरीक्षकाने (PSI) लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. (Crime News) पीडित महिला गर्भवती राहिल्यानंतर आरोपीने तिचे खाजगी फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे, तसेच बळजबरीने गर्भपात घडवून आणल्याचे समोर आले आहे. पीडित महिलेच्या फिर्यादीवरून क्रांती चौक पोलिसांनी आरोपी PSI विरुद्ध बलात्कार आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. आरोपीचे वडील आणि बहीण यांच्यावरही सहआरोपी म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.

Crime News: नेमके प्रकरण काय?

पीडित महिला आणि आरोपी भागवत ज्ञानोबा मुलगीर हे दोघेही परभणी जिल्ह्यातील आहेत. शहरात स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी दोघे आले होते. एकाच जिल्ह्यातील असल्याने ओळख झाली, आणि नंतर ही ओळख प्रेमसंबंधात बदलली. पीडित महिलेच्या सांगण्यानुसार, आरोपीने 2024 च्या फेब्रुवारीत तिला अजबनगर परिसरातील एमएच-20 नावाच्या कॅफेत नेले आणि तिथे तिच्यावर शारीरिक संबंधांसाठी दबाव टाकत अत्याचार केला.

या संबंधातून पीडित महिला गर्भवती राहिली. तेव्हा आरोपीने तिचे आणि त्याचे खाजगी फोटो व्हायरल करण्याची भीती दाखवत तिला जबरदस्ती गर्भपाताच्या गोळ्या घेण्यास भाग पाडले. गोळ्यांमुळे गर्भपात झाल्यानंतर आरोपीने पीडितेला पूर्णपणे दूर केले आणि तिला ब्लॉकही केले. त्याचदरम्यान आरोपी PSI पदाची परीक्षा उत्तीर्ण झाला.

प्रकरण उघड केल्यानंतर पीडित महिलेने आरोपीच्या वडिलांशी आणि बहिणीशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनीही “तुला जे करायचे ते कर” असे म्हणत धमकावल्याचा आरोप महिलेने केला आहे. अखेर मानसिक छळ, धमक्या आणि झालेल्या अत्याचारामुळे पीडित महिला क्रांती चौक पोलीस ठाण्यात पोहोचली.

PSI सह कुटुंबीयांचा शोध सुरू

तक्रार मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त सागर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी एमएच-20 कॅफेत घटनास्थळाचा पंचनामा केला. पंचनाम्यादरम्यान मिळालेल्या माहितीवरून प्रकरणाची गंभीरता अधिक स्पष्ट झाली. पोलिसांनी सुरुवातीला ही माहिती माध्यमांसमोर येऊ नये म्हणून गोपनीयता पाळली, मात्र नंतर प्रकरण उघड झाले.आता आरोपी PSI आणि त्याच्या कुटुंबीयांचा शोध सुरू असून, अत्याचाराच्या या घटनेने संपूर्ण राज्यात संताप व्यक्त केला जात आहे.

आणखी वाचा

Comments are closed.