अनगरच्या ‘बाळाने’ उडता तीर अंगावर घेतलाय, लवकरच झुकतील गर्विष्ठ माना; अजित पवारांना अद्वातद्वा
राजन पाटील आणि सूरज चव्हाण सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगपंचायतीमध्ये उज्ज्वला थिटे (Ujjwala Thite) यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरल्यानंतर राजन पाटील यांचे सुपुत्र बाळराजे पाटील यांनी जोरदार आनंद साजरा केला होता. यावेळी बाळराजे पाटील (Balraje Patil) यांनी अजित पवार यांना उद्देशून एक वक्तव्य केले होते. ‘अजित पवार तुम्ही सगळ्यांचा नाद करा, पण अनगरकरांचा नाही’, असे वाक्य बाळराजे पाटील यांनी बोट दाखवत म्हटले. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी पुन्हा आपल्या भाषेत प्रत्युत्तर दिले आहे.
सूरज चव्हाण : आधी लाकूड भरले
सुरज चव्हाण यांनी त्यांच्या सोशल मिडीया एक्सवरती पोस्ट लिहून राजन पाटील यांचे सुपुत्र बाळराजे पाटील यांच्यावर हल्लाबोल करत म्हटलंय की, गल्लीच्या राजकारणात पण रडीचा डाव खेळून जिंकलो जिंकलो असा माज करणाऱ्या लिंबूटिंबू ‘बाळा’ने अजितदादांवर बरळणे म्हणजे ‘इतभर लाकूड अन हातभर ढलपी’ असा प्रकार आहे. विजयाचा उन्माद करताना अनगरच्या “बाळानी”उड़ता तीर अंगावर घेतला आहे. लवकरच …. झुकतील गर्विष्ठ माना!!, असंही पुढे सुरज चव्हाण यांनी म्हटलं आहे.
Rohit Pawar: ज्या सत्तेच्या जीवावर अंगात मस्ती येते ती सत्ता…
राजन पाटील यांचे सुपुत्र बाळराजे पाटील यांच्या वक्तव्यावरती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी देखील भाष्य केलं आहे. रोहित पवारांनी देखील त्यांच्या सोशल मिडीया एक्स अकाऊंटवरती पोस्ट करत म्हटलं की, “आदरणीय राजन पाटील साहेब, आपण जेष्ठ नेते आहात, आपला नेहमीच आदर आहे, परंतु काल आपल्या चिरंजीवांचा अजितदादांवर एकेरी भाषेत टीका करणारा व्हिडिओ बघून मात्र अत्यंत वाईट वाटले. आपण स्वतः एकत्रित राष्ट्रवादीत सत्तेत असताना सुद्धा कधी अशी भाषा विरोधकांविरोधात वापरली नाही.”
“ज्या सत्तेच्या जीवावर अंगात मस्ती येते ती सत्ता येत जात असते हे आपल्या चिरंजीवांना कदाचित माहीत नसेल. मतचोरीच्या जीवावर भाजपचे उभे राहिलेले सत्तेचे इमले कधी कोसळतील सांगता येत नाही, त्यामुळे त्यांना म्हणावं थोडं दमाने घ्या. असो, भाजपच्या नादी लागल्यावर राजकीय संस्कृती आणि #महाराष्ट्र_धर्माचा विसर पडतोच! आपण त्यांना योग्य ती समज द्याल ही अपेक्षा..!”.
Amol Mitkari: अमोल मिटकरी काय म्हणाले?
राजन पाटील आणि त्यांची दोन्ही वाया गेलेली मोकाट कार्टी यांना सत्तेचा अतिमाज आला आहे. ज्यांच्या तुकड्यावर जगलात त्यांच्याबद्दल केलेली मस्तीची भाषा याला प्रसंगी योग्य उत्तर देऊच. पण तूर्तास या औलादींच्या मस्तीच्या वागण्याने “मालकाला” भिकारी बनवेल.. तुर्तास इतकेच, असंही पुढे अमोल मिटकरींनी म्हटलं आहे.
Rajan Patil : नेमकं काय घडलेलं?
सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगपंचायतीची निवडणूक गेल्या काही दिवसांपासून मोठ्या चर्चेचा विषय ठरत आहे. अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये गेलेल्या राजन पाटील यांची गेल्या अनेक वर्षांपासून अनगरमध्ये अनभिषिक्त सत्ता आहे. मात्र, यंदा अजित पवारांनी अनगर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उज्ज्वला थिटे यांना रिंगणात उतरवून राजन पाटील यांच्या सूनेसमोर आव्हान उभे केले होते. अनगर नगरपंचायतीमधील राजन पाटील यांच्या पॅनेलच्या 17 जागा समोर कोणीही उमेदवारच उभा नसल्याने बिनविरोध निवडून आल्या होत्या. मात्र, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उज्ज्वला थिटे यांनी शड्डू ठोकल्याने राजन पाटील यांची काहीशी कोंडी झाली होती. मात्र, मंगळवारी उमेदवारी अर्जांच्या छाननीत उज्ज्वला थिटे यांचा उमेदवार अर्ज नाट्यमयरित्या बाद ठरवण्यात आला. त्यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून कोणाचीही सही नव्हती. हे तांत्रिक कारण देत निवडणूक अधिकाऱ्यांनी उज्ज्वला थिटे यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरवला होता. यानंतर राजन पाटील यांच्या समर्थकांनी अनगर नगपंचायतीच्यााबाहेर एकच जल्लोष केला होता.
अनगर नगरपंचायतीच्याबाहेर राजन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत निवडणुकीत विजय मिळाल्याप्रमाणेच जोरदार जल्लोष केला. यामध्ये राजन पाटील यांचे थोरले चिरंजीव विक्रांत ऊर्फ बाळराजे पाटील आघाडीवर होते. त्यांनी प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यांकडे पाहत अजित पवार यांना थेट आव्हान दिले. ‘अजित पवार तुम्ही सगळ्यांचा नाद करा, पण अनगरकरांचा नाही’, असे म्हटले. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओची सध्या सोलापूर जिल्ह्यात चांगलीच चर्चा रंगली आहे
आणखी वाचा
Comments are closed.