पिट्या भाई आणि राज ठाकरेंमध्ये पहिली ठिणगी कुठे पडली? मनसेप्रमुखांचे ‘ते’ शब्द मनात रुतले, अन्
पित्या भाई राज ठाकरे मनसे सोडून भाजपमध्ये दाखल गेल्या काही दिवसांपासून पुण्यातल्या राजकारणात (Pune Politics) एक नाव सर्वाधिक चर्चेत आहे, ते म्हणजे, पिट्या भाई उर्फ अभिनेता रमेश परदेशी (Ramesh Pardeshi). मराठी सिनेसृष्टीतील (Marathi Film Industry) गाजलेला चेहरा, ‘मुळशी पॅटर्न’ फेम अभिनेता रमेश परदेशीनं एक निर्णय घेतला आणि देशाच्या राजकारणात खळबळ माजली. रमेश परदेशी यांनी मनसेची (MNS) साथ सोडून भाजपचं (BJP) कमळ हाती घेतलं आहे. आगामी नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रमेश परदेशीनं घेतलेला निर्णय राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) मनसेसाठी मोठा धक्का असल्याचं बोललं जातंय. धक्कादायक बाब म्हणजे, रमेश परदेशीनं भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्याच्यासोबतच पुण्यातील मनसेच्या चित्रपट सेनेलाही मोठं खिंडार पडलंय. पण, राज ठाकरे आणि पिट्या भाई यांच्यात पहिली ठिणगी नेमकी कुठे पडली?
‘मुळशी पॅटर्न’ फेम अभिनेता रमेश परदेशीनं काही दिवसांपूर्वी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन संघाच्या गणवेशातला एक फोटो पोस्ट केलेला. मी माझ्या विचारांसोबत असा मजकूर त्यानं या फोटोसोबत लिहिलेला. काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असताना अशाच पोस्टवरून त्यांनी रमेश परदेशीला झापलं होतं. त्यानंतर आज पुन्हा रमेश परदेशीनं सूचक पोस्ट केलीये. नव्या जबाबदारीसाठी सज्ज असल्याचं त्यानं आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.
राज ठाकरेंनी रमेश परदेशीला पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत झापलं?
काही दिवसांपूर्वी राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी पण्यात एक पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतलेली. नेमकं याच बैठकीत राज ठाकरेंनी आरएसएसच्या गणवेशावरून रमेश परदेशी यांना सुनावल्याच्या चर्चा होत्या. पण, रमेश यांनी स्पष्टीकरण दिलेलं आणि असं काही घडलं नव्हतं, असंही सांगितलेलं. राज ठाकरे हे आमचे कुटुंबप्रमुख आहेत. ते आमचे कान ओढू शकतात, मी मनसेचा कार्यकर्ता आहे आणि आरएसएसमध्ये लहानपणापासून काम करतो, असं स्पष्टीकरण रमेश परदेशीनं दिलेलं. मी राजसाहेबांचा कार्यकर्ता असल्याचंही त्यानं आवर्जून सांगितलेलं.
राज ठाकरे रमेश परदेशीला नेमकं काय म्हणालेले?
राज ठाकरे यांनी पुण्यात घेतलेल्या पदाधिकारी आढावा बैठकीत आगामी निवडणुकांमध्ये कामात दिरंगाई करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर संतापले होते. याचवेळी त्यांनी रमेश परदेशींना थेट विचारणा केली. राज ठाकरे म्हणाले, “तू छातीठोकपणे सांगतोस, संघाचा कार्यकर्ता आहेस, तर कशाला टाईमपास करतोस? एकाच ठिकाणी कुठे तरी राहा.” एकाच वेळी दोन वेगवेगळ्या विचारधारेसोबत न राहण्याचा स्पष्ट सल्ला राज ठाकरेंनी दिल्यानंतर, बैठकीत थोडा तणाव निर्माण झाला होता.
मनसे सोडण्याचा निर्णय का घेतला?
राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सर्वांसमोरच रमेश परदेशीला झापल्यामुळे मोठा तणाव निर्माण झालेला. बैठकीतून बाहेर आल्यानंतर असं काही घडलं नाही असं सांगणाऱ्या पिट्या भाईच्या जिव्हारी मात्र राज ठाकरेंचे शब्द चांगलेच रुतले होते. त्यामुळे त्यानं तात्काळ भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. भाजप प्रवेशानंतर रमेश परदेशी म्हणाला की, “मी लहानपणापासून संघाचा सदस्य आहे. हा प्रश्न संस्काराचा आहे. संघ माझे संस्कार आहेत आणि संस्कारानं सांगितलंय की, तू सोबत असला पाहिजेस…”
दरम्यान, रमेश परदेशी याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर त्यानं ‘चौक’, ‘सर्किट’, ‘रेगे’, ‘बलोच’, ‘सरसेनापती हंबीरराव’, ‘फत्तेशिख्स्त’, ‘देऊळ बंद’, ‘बेरीज वजाबाकी’ यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलंय.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
आणखी वाचा
Comments are closed.