‘अमेरिकेतील लोकही विचारतायत, अनगर कुठेय, राजन पाटील कोण आहेत??’ जयकुमार गोरेंकडून राजन पाटलांच
सोलापूर: मोहोळ नगराध्यक्ष पदाच्या भाजप उमेदवार शीतल क्षीरसागर यांच्या प्रचाराला सुरुवात झाली. पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्या उपस्थितीत शीतल क्षीरसागर यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला, मोहोळ शहरातून बाईक रॅली काढत आणि सभा घेत प्रचाराची सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी मोहोळ माजी आमदार राजन पाटील यांच्या बाबतीत अमेरिकेत ही चर्चा सुरु असल्याचे म्हटलं आहे. अनगर नगरपंचायत नगराध्यक्ष पदावरून राजन पाटील यांच नाव गेल्या आठ ते दहा दिवसापासून माध्यमात चर्चेत आलं आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी हाच मुद्दा पकडत राजन पाटील यांची चर्चा महाराष्ट्र ते दिल्ली आणि दिल्लीपासून अमेरिकेपर्यंत सुरु आहे असं म्हटलं आहे.
‘अमेरिकेतले लोकही म्हणतात, अनगर कोठे आहे आणि राजन पाटील कोण आहेत??’ असं जयकुमार गोरेंनी म्हटलं. यावर व्यासपीठावर बसलेल्या राजन पाटील यांनी ‘किती शिव्या खातोय’ असं म्हणताच ‘पाटील जे शिव्या खातात तेच मोठे होतात’ असं प्रतिउत्तर पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) दिलं आहे.
Angar Nagarpanchayat Jaykumar Gore: नेमकं काय म्हणालेत पालकमंत्री जयकुमार गोरे?
सगळे उमेदवार आणि खास करून या शहराच्या भावी नगराध्यक्ष शितलताई शिरसागर यांच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांचा आराध्य दैवत नागनाथ महाराजांचं दर्शन घेतलं. छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेतलं, अण्णाभाऊ साठेंचे दर्शन घेतलं. अहिल्याबाईंचं दर्शन घेतलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे दर्शन घेतले या सगळ्यांचे दर्शन घेऊन भारतीय जनता पक्षाच्या या सर्व उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभाचा नारळ आज आपण फोडलेला आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष, या भागाचे, या जिल्ह्यातले एक प्रभावी नेतृत्व, प्रभावी नेते आणि ज्यांचा गेल्या दहा दिवसापासून महाराष्ट्रापासून दिल्ली पासून अमेरिकेपर्यंत नाव झाले, अमेरिकेतले लोक सुद्धा म्हणत आहेत ते अनगर कुठे आहे? राजन पाटील कोण आहेत? असं म्हणताच व्यासपीठावरून राजन पाटील यांनी ‘किती शिव्या खातोय’ असं म्हटलं, पाटील जो शिव्या खातो तोच मोठा होतो, राजन पाटील मालक यांच्यातील प्रचंड ऊर्जा ताकद कार्यकर्त्यांमध्ये आली आहे, असं सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी म्हटले आहे.
Who is Rajan Patil: राजन पाटील हे कोण?
राजन पाटील हे मोहोळ–वैराग मतदारसंघाचे तीन वेळा आमदार राहिलेले आहेत, सोलापुरसह राज्याच्या राजकारणातील ते ज्येष्ठ राजकारणी आहेत. ते शेतकरी कामगार पक्षाचे स्वातंत्र्यानंतरचे पहिले आमदार लोकनेते (स्व.) बाबुराव अण्णा पाटील अनगरकर यांचे चिरंजीव असल्याने राजकीय परंपरेचा मजबूत पाया मिळाला. 1994 ते 2004 या सलग तीन पंचवार्षिक काळात त्यांनी एकदा काँग्रेस (आय) तर दोन वेळा राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदारपद भूषविले. मोहोळ तालुक्यातील जनतेशी मजबूत जनसंपर्क, काटकसरी आर्थिक धोरण आणि प्रामाणिक काम करण्याची शैली यामुळे ते स्थानिक राजकारणातील लोकप्रिय आणि प्रभावशाली नेतृत्व म्हणून ओळखले जातात. ते जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे तीनवेळा अध्यक्ष राहिले आहेत.
Who is Rajan Patil: सरपंचपदापासून सुरूवात
राजन पाटील यांची राजकीय कारकीर्द अनगर ग्रामपंचायतीच्या बिनविरोध निवडलेल्या सरपंचपदापासून सुरू झाली. 1992 मध्ये अनगर गटातून बिनविरोध जिल्हा परिषद सदस्य झाले आणि जिल्हा परिषदेतही महत्त्वपूर्ण कामगिरी केली. पंचायत राज समितीचे दोन वेळा अध्यक्ष म्हणून त्यांनी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची पारदर्शक तपासणी केली आणि विकासप्रक्रियेला योग्य दिशा देण्याचे काम केले. राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांच्या कार्यकाळात अनेक सहकारी संस्थांमध्ये शिस्तबद्धता आणि पारदर्शकता वाढली. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सोडल्यानंतर नुकताच त्यांनी भाजपात प्रवेश करून नवा राजकीय अध्याय सुरू केला आहे.
आणखी वाचा
Comments are closed.