15 रुपयांमध्ये डिजिटल सातबारा डाऊनलोड कसा करायचा? स्टेप बाय स्टेप जाणून घ्या
मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागानं डिजिटल सातबारा, 8-अ आणि फेरफार उताऱ्यांना कायदेशीर मान्यता दिली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं. राज्य सरकारच्या या निर्णयामुळं सातबारा उतारा, 8 अ उतारा आणि फेरफार यासाठी तलाठी किंवा ग्रामसेवक यांच्याकडे जावं लागणार नाही. महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या वेबसाईट वरुन डिजिटल सातबारा डाऊनलोड करता येईल जो सर्व सरकारी, निमसरकारी आणि बँकिंग आणि न्यायालयीन कामासाठी पूर्णपणे वैध असेल. आपण डिजिटल सातबारा कसा डाऊनलोड करायचा हे जाणून घेणार आहोत.
Digital Satbara : डिजिटल सातबाऱ्यासंदर्भात नेमका निर्णय काय?
डिजिटल 7/12, 8-अ आणि फेरफार उतारे कायदेशीरदृष्ट्या वैध ठरवण्याचा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.या निर्णयामुळे डिजिटल 7/12 ला अधिकृत मान्यता मिळेल. यासाठी फक्त 15 रुपये मध्ये शुल्क भरावं लागेल. डिजिटल सातबाऱ्यामुळं तलाठ्याच्या सही-स्टॅम्पची गरज संपली आहे. डिजिटल स्वाक्षरी, QR कोड, आणि 16 अंकी पडताळणी क्रमांक असलेले 7/12, 8-अ व फेरफार उतारे आता सर्व सरकारी, निमसरकारी, बँकिंग व न्यायालयीन कामांसाठी पूर्णपणे वैध मानले जाणार आहेत. हा निर्णय शेतकरी, जमीनधारक आणि सामान्य नागरिकांसाठी फायदेशीर ठरणार आहे.
डिजिटल सातबारा, 8 अ आणि फेरफार कसा डाऊनलोड करायचा?
पायरी 1: महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या महाभूमीच्या https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/ या वेबसाईटला भेट द्या.
स्टेप 2 : ओटीपी बेस्ड लॉगीन पर्याय निवडून मोबाईल क्रमांक नोंदवा, त्यानंतर ओटीपी फोनवर येईल. तो नोंदवून लॉगीन करा.
स्टेप 3: जिल्हा, तालुका, गाव निवडा. अंकित सातबारा की अक्षरी सातबारा पर्याय निवडा.
स्टेप 4: सर्वे नंबर किंवा गट क्रमांक शोधा त्यानंतर सर्वे नंबर किंवा गट नंबर निवडा. पीक पाहणीचा डाटा आवश्यक असल्यास त्याबाबतचा पर्याय निवडा.
स्टेप 5 : एका उताऱ्यासाठी आवश्यक असणारी 15 रुपयांच्या रकमेनं ऑनलाईन पेमेंट द्वारे रिचार्ज करा. रिचार्च केल्यानंतर ऑनलाईन सातबारा डाऊनलोड करण्याचा पर्याय उपलब्ध होईल. हा सातबारा पीडीएफ स्वरुपात असेल.
डिजीटल सातबारा डाऊनलोड करण्याचा दुसरा पर्याय
नवीन यूजर नोंदणी पर्यायावर तुमचं नाव, जन्मतारीख, मोबईल क्रमांक, ई मेल आयडी, पत्ता, जिल्हा, अशी सर्म माहिती भरावी लागेल. त्यानंतर लॉगीन आयडी नोंदवा, तो उपलब्ध असल्यास तुम्हाला मिळेल. त्यानंतर लॉगीन केल्यास वरील स्टेपचा वापर करुन सातबारा, 8 अ उतारा आणि फेरफार डाऊनलोड करता येईल.
आणखी वाचा
Comments are closed.