बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी वनमंत्री गणेश नाईकांची क्लृप्ती, सरकार जंगलात बकऱ्या-शेळ्या सोडणार
गणेश नाईक यांच्यावर बिबट्याचा हल्ला राज्यभरात अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये माणसांवर बिबट्यांचे हल्ले वाढल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर आता महायुती सरकारकडून बिबट्यांनी (Leopard attack) खाण्याच्या शोधात जंगलाबाहेर (Forest) येऊ नये, यासाठी जंगलातच शेळ्या किंवा बकऱ्या (Goats) सोडण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकृतरित्या या निर्णयावर मंजुरीची मोहोर उमटली नसली तरी पुण्यातील काही भागांमध्ये बिबट्यांना खाण्यासाठी शेळ्या किंवा बकऱ्या सोडण्यात आल्या आहेत, अशी माहिती राज्याचे वनमंत्री गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी दिली. ते मंगळवारी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (Maharashtra Leopard attack)
बिबट्यांच्या मानवी वस्तीतील वाढत्या हल्ल्यांविषयी वनमंत्री गणेश नाईक यांना विचारणा करण्यात आली. यावर प्रतिक्रिया देताना गणेश नाईक यांनी म्हटले की, हिंस्त्र प्राण्यांना जे भक्ष्य पाहिजे ते भक्ष्य जंगलात उपलब्ध राहिलेले नाही. प्रत्येक जिल्ह्यामध्ये बिबट्यांना खाण्यासाठी शेळ्या किंवा बकऱ्या गळ्यात टॅग घालून सोडण्याचा आमचा विचार आहे. जसा प्रत्येक गावात एक नंदी असतो, तशाचप्रकारे या शेळ्या-बकऱ्या असतील. तुमच्या मुलाबाळांना आणि कुटुंबाच्या सदस्यांना बिबट्याचा धोका होऊ नये म्हणून काही ठिकाणी वनखात्याने या शेळ्या सोडल्या आहेत. त्यांचं रक्षण तुम्ही करा, असे आवाहन गणेश नाईक यांनी नागरिकांना केले.
बिबट्या हा पूर्वी वन्यजीव होता. आता तो ऊसातील जीव झाला आहे. जंगलापेक्षा ऊसाच्या फडात बिबट्यांची पैदास होत आहे. त्यामुळे बिबट्यांची संख्या वाढली आहे. बिबट्या हा शेड्यूल 1 मध्ये येणारा प्राणी आहे. त्याचा समावेश आता शेड्यूल 2 मध्ये करण्यात यावा, यासाठी आम्ही केंद्रीय वनखात्याला प्रस्ताव पाठवला आहे. बिबटे जंगलात नसतील तर त्यांची गणना वन्यजीव म्हणून करु नये, असेही आम्ही वनाखात्याला सांगितले आहे. तुर्तास बिबट्यांची काहीप्रमाणात नसबंदी करण्याची परवानगी आम्हाला केंद्रीय वनखात्याकडून मिळाली आहे. राज्य सरकारकडून प्रत्येक जंगलात बिबटे सम प्रमाणात राहावेत, यादृष्टीने नियोजन केले जात आहे. बिबट्यांना जंगलातच भक्ष्य मिळावे. त्यांनी गावात येऊन कुत्रे आणि माणसांवर हल्ले करु नयेत, यासाठी वनखात्याकडून प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी जंगलात शेळ्या सोडण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. जुन्नर, आंबेगाव, शिरुर तालुक्यात तशी सुरुवातही झाली आहे, असेही गणेश नाईक यांनी म्हटले.
Ganesh Naik news: महाराष्ट्रातील बिबटे आफ्रिकेला आणि वनताराला पाठवणार: गणेश नाईक
राज्यातील ज्या भागांमध्ये जास्त बिबटे आहेत, तेथील बिबटे आफ्रिकेला पाठवण्यासंदर्भातही विचार सुरु असल्याचे गणेश नाईक यांनी सांगितले. आफ्रिकेमध्ये वाघ, सिंह आहेत, पण तिकडे बिबटे नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रातील बिबटे आफ्रिकेला पाठवण्याची मागणी केली तर त्याचा विचार कराल का, अशी विचारणा आम्ही केंद्रीय वनखात्याला केली आहे. त्यांनी आम्हाला लेखी प्रस्ताव पाठवण्यास सांगितले आहे. काही बिबटे वनताराला पाठवले जातील, असे वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.