लाडकी बहीण योजना आणणारे 1 नंबरहून 2 वर गेले; विधानसभेत जयंत पाटील अन् शंभुराज देसाईंची जुगलबंदी
मुंबई : विधानसभा निवडणुकांमध्ये आपला करिश्मा दाखवलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची (ladki bahin yojana) अद्यापही चलती आहे. राज्यकर्त्यांकडून प्रत्येक कार्यक्रमात, भाषणात, निवडणूक प्रचारात आणि विधिमंडळात देखील लाडकी बहीण योजनेचा गववा केला जातो. लाडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळेच महायुतीला मोठं यश मिळालं असून लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देत आहेत. तर, विरोधकांकडून या योजनेमुळे सरकारवर होत असलेल्या आर्थिक कर्जावर भाष्य केलं जातं, तसेच या योजनेतील घोषणेप्रमाणे 2100 रुपये बहिणींना कधी मिळणार असा सवालही उपस्थित केला जात आहे. विधिमंडळात आज लाडकी बहीण योजनेवरुन मंत्री शंभुराज देसाई आणि आमदार जयंत पाटील (Jayant patil) चांगलीच जुगलबंदी पाहायला मिळाली.
लाडकी बहिण योजनेवरील चर्चेदरम्यान, विधानसभेत 1 नंबर आणि 2 नंबरहून जयंत पाटील आणि शंभूराज यांच्यात जुगलबंदी रंगल्याचं पाहायला मिळालं. लाडकी बहीण योजना आणणारा व्यक्ती आज 2 नंबरवर आला, असे शिवसेना नेते शंभूराज देसाईंनी म्हटल्याचा उल्लेख जयंत पाटलांनी सभागृहात केला. 1 नंबरचा माणूस इथे नाही म्हणून शंभूराज आता 1 आणि 2 नंबरबाबत बोलत आहेत, असेही पाटील यांनी म्हटले. त्यावर, मी वेगळं काही बोललो नाही, मुख्यमंत्री म्हणाले होते आम्ही आमच्या आमच्यात पद बदलत असतो तेच मी बोललो, असे प्रत्युत्तर शिवसेना नेते तथा मंत्री शंभुराज देसाईंनी दिले. राज्य सरकारला या ‘लाडक्या बहिण योजनेनं फायदा झाला’ मात्र ज्या मुख्यमंत्र्यांनी ही योजना आणली ते 1 चे 2 नंबर झाले, असे जयंत पाटील यांनी म्हटले. त्यावर, एकनाथ शिंदे कायम 2 नंबरचं राहतील असे नाही. पदांची अदलाबदल होत असते, असा पलटवार शंभुराज देसाई यांनी केला.
जयंत पाटलांचे प्रश्न, आदिती तटकरेंचं उत्तर
निवडणुकीत जेव्हा ही योजना झाली, तेव्हा अशा अटी यापूर्वी सांगितल्या होत्या का?, ज्या लोकांनी याचा चुकीचे फायदे घेतले त्यांच्यावर कारवई करणार का? योजना जड जाऊ लागल्याने आता KYC आणि कंडीशन योजनांमध्ये घेतले आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी केली. यावर पहिल्याच शासन निर्णयातच 2 कोटी 63 लाख लोकांची पडताळणी सुरू केली. इतर विभागतही आम्ही डेटा तपासतोय. ई-केव्हायसीचं धोरण आणलं, असं मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या. केवायसीसाठी आता 13 कंडिशन टाकल्या आहेत. याआधी त्या नव्हत्या, असं जयंत पाटील यांनी पुन्हा सभागृहात नमूद केलं. जयंत पाटील यांच्या या आरोपावर मंत्री आदिती तटकरे यांनी प्रत्तुत्तर दिलं. अनेक महिलांचे बँकेत खाते नाही. त्यामुळे त्या महिलांनी या पैशांसाठी घरातील कर्त्या पुरूषाचे खाते दिले आहे. यासाठीच KYC आपण केली अशी माहिती आदिती तटकरेंनी सभागृहात दिली. त्याचप्रमाणे ज्या पुरूषांच्या बँक खात्यांवर पैसे जमा झाले ती खाती तपासली जातील. या योजनेचा फायदा खरचं पुरूष घेत असेल तर नक्कीच कारवाई होईल, असं आश्वासन आदिती तटकरे यांनी दिलं.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.