मी नाभिक समाजाची माफी मागतो, बोलण्याच्या ओघात बोलून गेलो; जयंत पाटलांकडून जाहीरपणे दिलगिरी
सांगली : राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेची वेळ आणि तारीख जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पत्रकार परिषदेतून निवडणूक आयोगाला लक्ष्य केलं. निवडणूक आयोगाकडून (Election) आज महापालिका निवडणुकांची घोषणा होणार आहे. मात्र, नगरपालिका निवडणुकांचा निकाल येण्यापूर्वीच ही घोषणा होत असेल तर हे चुकीचं असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं. तसेच, विधानसभेत पोलिसांसाठी वापरण्यात आलेल्या हजामत शब्दावरूनही त्यांनी संपूर्ण नाभिक समाजाची जाहीरपणे माफी मागितली. हजामत ही शब्द बोलण्याची चूक घडली आहे, बोलण्याच्या ओघात मी बोलून गेलो. मात्र, मी नाभिक समाजाची माफी मागतो, असेही जयंत पाटील यांनी म्हटले.
विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना जयंत पाटलांनी गृहखात्यावर जोरदार टीका केली होती. बीड जिल्ह्यातील राम खाडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या संदर्भाने सभागृहात निवेदन देताना, पोलीस काय हजामत करतात का? असा शब्दप्रयोग जयंत पाटील यांनी केला होता. त्यावरुन, सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी हजामत शब्दाला आक्षेप घेतल्याने खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं. आता, जयंत पाटील यांनी हजामत शब्दावरुन नाभिक समाजाची माफी मागितली आहे. बोलण्याच्या ओघात मी बोलून गेलो. मी संपूर्ण नाभिक समाजाची दिलगिरी व्यक्त करतो, अशी चूक व्हायला नको होती, ती झाली. त्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करतो, असे जयंत पाटील पत्रकार परिषदेतून म्हटले.
महापालिका निवडणुकांचे नेतृत्व विशाल पाटील करतील
विशाल पाटील यांचा डीएनए काँग्रेस आहे, त्यामुळे ते आमच्यासोबत राहतील. महापालिका निवडणुकाचे नेतृत्व विशाल पाटील यांच्याकडे असेल. जंगले कमी झाली म्हणून बिबट्या शहरात वाढू लागले आहेत. त्यामुळे झाडे तोडून सरकारने त्या झाडाच्या जागांवर कोणताही नवीन प्रकल्प राबवू नये, असेही जयंत पाटील यांनी म्हटले.
सभागृहात नेमकं काय म्हणाले होते जयंत पाटील
अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेत बोलताना जयंत पाटील यांनी बीडमधील राम खाडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेचा उल्लेख केला. खाडे यांना झालेल्या मारहाणीत त्यांचा एक पाय, एक हात तुटला. 15 दिवसांपूर्वी नगर जिह्यात त्यांच्यावर हल्ला झाला. मेला समजून माणसांनी त्यांना सोडून दिले. दहा-बारा जणांनी एकाचवेळी हल्ला केला. जवळपास मेलेला होता, पण कसाबसा तो वाचला. आता तो शुद्धीवर आला आहे. मात्र, 15 दिवस होऊनही एक माणूस सापडला नाही, मग पोलीस काय हजामती करतात की काय? मला आश्चर्य वाटत आहे, असा संताप जयंत पाटलांनी पोलिसांच्या तपासावरुन सभागृहात व्यक्त केला होता.
हेही वाचा
मी किती अधिकाऱ्यांना जेलमध्ये टाकतो, याचा रेकॉर्ड करायचाय; नितीन गडकरींचा सनदी अधिकाऱ्यांना इशारा
आणखी वाचा
Comments are closed.