भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा-तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला

मुंबई : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. राज्यातील 29 महापालिकांमध्ये राष्ट्रवादी ही भाजपसोबत युतीसाठी आग्रही आहे. त्याचसंबंधी कार्यकर्त्यांच्या भावना आणि पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्यात येणार आहे. मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत युतीसाठी आग्रही आहे. अजितदादा आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये तब्बल 40 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शुक्रवारी रात्री उशीरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. येत्या 15 जानेवारी रोजी 29 महापारिकांच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांना देण्यात आला. तसेच महायुती म्हणून लढण्याबाबत कार्यकर्त्यांच्या भावना मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्यात आल्याची माहिती आहे.

बीएमसी निवडणूक: मुंबईमध्ये युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही

मुंबईमध्ये अजितदादांची राष्ट्रवादी नवाब मलिकांच्या नेतृत्वाखाली लढणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीशी युती होऊ शकत नाही अशी भूमिका भाजपने घेतली आहे. पण राष्ट्रवादी मात्र महायुतीसाठी आग्रही असल्याची माहिती आहे. मुंबईत राष्ट्रवादीने 50 जागांवर लढण्याची तयारी केली आहे. तसा अहवाल राष्ट्रवादीच्या नेत्यांना प्राप्त झाला आहे.

ज्या ज्या ठिकाणी महायुती म्हणून लढणं शक्य आहे त्या त्या ठिकाणी युती करण्याची भूमिका महायुतीच्या नेत्यांची आहे. पुणेपिंपरी चिंचवड आणि अमरावतीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी वेगवेगळे लढणार आहेत. पण इतर ठिकाणी युती शक्य आहे. त्यामुळेच या ठिकाणी महायुती म्हणून लढावे अशी राष्ट्रवादीची भूमिका असल्याची माहिती आहे.

माणिकराव कोकाटे प्रकरण: माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यावर चर्चा

राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. उच्च न्यायालयाने तूर्तास त्यांच्या अटकेला स्थगिती दिली असून पुढच्या सुनावणीपर्यंत त्यांची आमदारकीही सुरक्षित आहे. या प्रकरणावरही अजितदादा आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे.

मुंबई राष्ट्रवादी : राष्ट्रवादीची 50 जागांवर तयारी पूर्ण

नवाब मलिकांना भाजपने विरोध केल्यानंतर राष्ट्रवादीने महायुतीसोबत किंवा महायुती शिवाय लढण्याची तयारी ठेवली आहे. मुंबईत किमान 50 जागा लढवण्याची तयारी राष्ट्रवादीने केली असल्याची माहिती आहे. तर महायुतीत राहायचं की नाही याचा निर्णय अजित पवारांकडे सोपवण्यात आल्याची माहिती आहे.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा

Comments are closed.