मराठीवरून सडकून टीका झालेल्या भाजपच्या श्रद्धाराजे भोसलेंच्या निकालाचं काय झालं? सावंतवाडीकरांन

सिंधुदुर्ग : राज्यातील नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुकीचे निकाल आता समोर आलेले आहेत. राज्याचं लक्ष लागलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या श्रद्धाराजे सावंत भोसले (Shraddha Raje Sawant Bhosale) मोठ्या फरकाने विजयी झाल्या आहेत. निवडणुकीआधी त्यांच्या अडखळत मराठी बोलण्यावरून त्या ट्रोल देखील झाल्या होत्या, मात्र त्यांनी निवडणुकीत विजयाचा गुलाल उधळला आहे. सावंतवाडी संस्थानच्या राजघराण्यातील असलेल्या श्रद्धाराजे भोसलेंनी तब्बल 1300 मतांनी बाजी मारली आहे. श्रद्धाराजेंच्या (Shraddha Raje Sawant Bhosale) विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. श्रद्धाराजे भोसले या निवडणुकीआधी माध्यमांशी संवाद साधतानाचा अडखळत मराठी बोलल्याने चांगल्याच चर्चेत आल्या होत्या, सोशल मीडियावर त्यांना ट्रोलिंगलाही सामोरं जावं लागलं होतं.

Who is Shraddha Sawant Bhosale: कोण आहेत श्रद्धा सावंत भोसले?

भाजप उमेदवार श्रद्धा सावंत भोसले यांना सावंतवाडी संस्थानच्या राजघराण्याचा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. त्या सावंतवाडी संस्थानचे शेवटचे राजे व माजी आमदार कै. श्रीमंत शिवरामराजे भोसले यांच्या नातसून आहेत. श्रद्धा भोसले यांचे पती लखम सावंत भोसले हे भाजप युवा मोर्चाचे विद्यमान प्रदेश उपाध्यक्ष आहेत. सावंतवाडी संस्थानचा हा वारसा आणि राजघराण्याची परंपरा लक्षात घेऊन भाजपनं नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी राजघराण्यातील उमेदवार मैदानात उतरवला आहे. त्यामुळे या निवडणुकीला अधिक राजकीय आणि ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.तर सांवतवाडीला जगाच्या नकाशावर दाखवण्यासाठी, विकास करण्यासाठी आपण राजकारणात आलो असल्याचं श्रद्धा सावंत भोसले यांनी सांगितलं आहे.

Shraddha Sawant Bhosale:  श्रद्धा सावंत भोसलेंचा जन्म मुंबईतील शिक्षण अमेरिकेत

श्रद्धा भोसले यांचा जन्म मुंबई झाला, त्या उच्चशिक्षित आहेत. त्यांचे शिक्षण अमेरिकेमध्ये झाले आहे. त्या गुजरातमधील क्षत्रिय समाजातील आहेत. त्यांनी मराठी बोलण्याचा प्रयत्न केला, पण मराठी नीट बोलता येत नसल्यावरुन त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्या मूळ गुजरात येथील असून त्यांचे शिक्षण अमेरिका, लंडन येथे झाले आहे. त्यांचा विवाह 2019 साली राजघराण्यातील तिसरे युवराज लखमराजे भोसले यांच्याशी झाला. दरम्यान, सावंतवाडी नगर परिषदेत नगराध्यक्षपदासाठी दाखल झालेल्या ११ अर्जापैकी ६ अर्ज वैध ठरले आहेत. यामध्ये उबाठा गटाच्या सीमा मठकर, भाजपकडून श्रद्धा सावंत भोसले, अन्नपूर्णा कोरगावकर अपक्ष, निशाद बुराण अपक्ष, शिवसेनेकडून अॅड. निता कविटकर आणि काँग्रेसकडून साक्षी वंजारी यांचे अर्ज वैध ठरले आहेत.

आणखी वाचा

Comments are closed.