मुंबईत भाजपला रोखायचं असेल तर मविआच्या मतांची फाटाफूट नको, संजय राऊतांचा राहुल गांधींना फोन

मुंबई : मुंबईत महाविकास आघाडी एकत्र राहावी यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष अजूनही आग्रही असल्याचं समोर आलं आहे. मुंबईत एकीकडे मनसे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांच्यातील जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. त्याचवेळी शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना फोन केल्याची माहिती समोर आली आहे.

Sanjay Raut Phone Call to Rahul Gandhi : संजय राऊतांचा राहुल गांधींना फोन

मुंबई महापालिकेत भाजपला रोखायचं असेल तर महाविकास आघाडीमध्ये मतांची फाटाफूट होऊ नये यासाठी मविआ एकत्र राहावी यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. आज संजय राऊत आणि राहुल गांधी यांच्यात फोन वरून चर्चा झाली असल्याची माहिती आहे.

मुंबईत महाविकास आघाडी एक राहावी आणि काँग्रेस पक्षानेही सोबत यावं यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रयत्नशील असल्याची माहिती आहे. संजय राऊत यांनी राहुल गांधी यांच्यासोबत आजच चर्चा केली आहे. भाजपला रोखण्यासाठी एकत्र लढूया अशी भूमिका संजय राऊत यांनी भूमिका राहुल गांधी यांच्याकडे मांडल्याची माहिती आहे.

काँग्रेस पक्षाने मुंबईत स्वतंत्र लढण्याचा नारा दिला असला तरी महाविकास आघाडी म्हणून एकत्र या निवडणूका लढल्या गेल्या पाहिजेत यासाठी संजय राऊत यांनी राहुल गांधींसोबत फोनवरून चर्चा केली असल्याची सूत्रांची माहिती आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे युती अंतिम टप्प्यात

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येत मुंबई महापालिका निवडणुकीत लढवणार आहेत. दोन्ही पक्षांमधील जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आलेली आहे. आज किंवा उद्या शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेकडून राजकीय युती जाहीर केली जाऊ शकते. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ठाकरे बंधूंसोबत महापालिका निवडणूक लढवण्यासाठी सकारात्मक आहे. आता अंतिम निर्णय काय होतो ते पाहावं लागेल.

काँग्रेस आणि वंचितची चर्चा

काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला यांनी आगामी मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याचं सांगितलं आहे. मुंबईतील काँग्रेस नेत्यांनी देखील स्वतंत्रपणे महापालिका निवडणूक लढवण्याबाबत घोषणा केलेली आहे. याचवेळी मुंबईत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात आघाडीबाबत चर्चा सुरु आहे.

दरम्यान, संजय राऊत यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मविआ म्हणून निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली आहे. यावर काँग्रेस काय निर्णय घेते ते पाहावं लागेल. मुंबईतील 227 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.

मुंबई महापालिका निवडणूक कार्यक्रम :

नामनिर्देशनपत्र स्वीकारणे: 23 डिसेंबर 2025 ते 30 डिसेंबर 2025
नामनिर्देशनपत्रांची छाननी: 31 डिसेंबर 2025
उमेदवारी माघारीची अंतिम मुदत : 02 जानेवारी 2026
निवडणूक चिन्ह वाटप : 03 जानेवारी 2026
अंतिम उमेदवारांची यादी : 03 जानेवारी 2026
मतदानाचा दिनांक : 15 जानेवारी 2026
मतमोजणीचा दिनांक : 16 जानेवारी 2026

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.