अकोला महापालिकेचा महायुतीचा संभाव्य फॉर्म्युला समोर, भाजप, शिवसेना अन् राष्ट्रवादीला किती जागा?
अकोला : विदर्भातल्या चारही महानगरपालिकांमध्ये ‘महायुती’ एकत्र निवडणूक लढण्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. काल नागपुरात झालेल्या भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या बैठकीत निर्णय हा निर्णय झाला. अजित पवारांच्या राष्ट्रवादीलाही सोबत घेतलं जाणार असल्याची माहिती आहे.. अकोला महापालिकेतील महायुतीतील तिन्ही पक्षांचा जागा वाटपाचा संभाव्य फॉर्म्युला ‘एबीपी माझा’ च्या हाती आला आहे. 2017 मध्ये जिंकलेल्या आणि सध्या तिन्ही पक्षांच्या ताब्यात असलेल्या जागा राहणार त्यात पक्षांच्या ताब्यात राहणार आहेत.
Akola Municipal Corporation : महायुतीत अकोल्यात कोणाला किती जागा?
अकोला महापालिकेत 2017 मधील 80 पैकी 48 जागा एकट्या भाजपकडे होत्या तर शिवसेनेला 8 जागा मिळाल्या होत्या. तर, राष्ट्रवादी काँग्रेसला 5 ठिकाणी विजय मिळाला होता. त्यामुळे तिन्ही पक्षांच्या ताब्यात असलेल्या 61 जागा सोडून उर्वरीत 19 जागांचे तिन्ही पक्षांत वाटप होणार आहे. या 18 पैकी 7 ते 8 जागा शिंदेंच्या शिवसेनेला मिळतील. तर, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 5 ते 6 जागा मिळणार आहेत. भाजपला 55, शिंदेंची शिवसेना 15 आणि राष्ट्रवादी 10 असं फायनल जागा वाटप होण्याची शक्यता आहे. उद्या किंवा परवापर्यंत अकोल्यातील अंतिम जागा वाटप जाहीर होणार असल्याची माहिती आहे.
काही जागांवर तिढा
भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रभाग क्रमांक 17 वरुन जोरदार तिढा आहे. या प्रभागात नुकतेच ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केलेले शिंदेंचे महानगरप्रमुख राजेश मिश्रांच्या प्रभागात मैत्रीपूर्ण लढतीवर भाजप ठाम आहे. 2017 मध्ये या प्रभागात स्वत: राजेश मिश्रा, त्यांची पत्नी आणि दोन्ही समर्थक विजयी झाले होते. या सर्वांनी नुकताच शिंदे गटात प्रवेश केला. मात्र, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत राजेश मिश्रा यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करीत 2500 मतं घेतली होती. राजेश मिश्रा यांनी हिंदुत्वादी मते घेतल्याने भाजप उमेदवार विजय अग्रवालांचा 1283 मतांनी पराभव झाला होता. त्यामुळे भाजप कोणत्याही परिस्थितीत राजेश मिश्रांसोबत हातमिळवणी करण्यास अनुत्सुक आहे.
दरम्यान, विदर्भात महायुतीमध्ये निवडणुकीबाबत एकवाक्यता असल्याचं दिसून येतं.
महायुतीतील संभाव्य जागा वाटप :
भाजप : 55
शिंदे सेना : १५
अजित राष्ट्रवादी : १०
अकोला महापालिकेतील 2017 चे पक्षीय बलाबल :
एकूण जागा : 80
भाजप : 48
काँग्रेस : 13
शिवसेना : 08
राष्ट्रवादी : 05
वंचित बहूजन आघाडी : 03
एमआयएम : 01
अपक्ष : 02
अकोला महापालिका निवडणूक कार्यक्रम
नामनिर्देशनपत्र स्वीकारणे: 23 डिसेंबर 2025 ते 30 डिसेंबर 2025
नामनिर्देशनपत्रांची छाननी: 31 डिसेंबर 2025
उमेदवारी माघारीची अंतिम मुदत : 02 जानेवारी 2026
निवडणूक चिन्ह वाटप : 03 जानेवारी 2026
अंतिम उमेदवारांची यादी- 03 जानेवारी 2026
मतदानाचा दिनांक : 15 जानेवारी 2026
मतमोजणीचा दिनांक : 16 जानेवारी 2026
आणखी वाचा
Comments are closed.