भाजपने उमेदवारी नाकारल्याच्या चर्चेनं धक्का बसला, सांगलीच्या माजी नगरसेविकेने रक्ताने पत्र लिहल

सांगली: सांगली महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 19 मधून भाजपकडून (BJP) उमेदवारी डावलल्याचे संकेत मिळाल्याने माजी नगरसेविका उषा अशोक पवार यांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रक्ताने पत्र लिहित याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्याकडे त्या तक्रार करणार आहेत. उषा पवार या सांगली महापालिकेत अनेक वेळा नगरसेविका आणि दोन वेळा सभापती म्हणून काम करत होत्या. प्रभाग 19 मध्ये त्यांनी रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज व्यवस्था, महिला सक्षमीकरण उपक्रम आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी सातत्याने विकासकामे राबवली आहेत. “प्रभागात उमेदवारी डावलल्याची चर्चा जोर धरत असल्यामुळे मी हा कठोर निर्णय घेतला आहे. भाजपच्या सर्व्हेत मी आघाडीवर होते, जनतेत माझा स्वीकार जास्त होता. तरीही माझा विचार झाला नाही. पक्षातील अन्याय दूर व्हावा यासाठी मी लाडक्या बहिणीच्या न्यायासाठी स्वतःच्या रक्ताने पत्र मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांना देणार आहे. मला पूर्ण विश्वास आहे की पक्षाचे वरिष्ठ नक्कीच विचार करतील आणि लाडक्या बहिणीला न्याय मिळेल असे उषा पवार यांनी म्हटले आहे.

Sangli Mahangarpalika Election 2026: सांगली महापालिकेच्या जागावाटपात भाजप-शिंदेसेना युतीची चर्चा फिस्कटली?

सांगली महापालिकेच्या जागावाटपात भाजप-शिंदेसेना युतीची चर्चा फिस्कटली असल्याची चर्चा आहे. भाजपची कोअर टीम पुन्हा मुंबईत चर्चा करणार असल्याची माहिती आहे. आज मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर भाजपची अंतिम उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे. सांगली महापालिकेच्या जागावाटपात भाजप आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनामध्ये देखील युतीची चर्चा फिस्कटल्याचे समजते. त्यामुळे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांना स्वतंत्रपणे अर्ज भरण्यास सांगितले जाईल अशी शक्यता आहे. त्यामुळे सांगलीत  महायुतीतून अजित पवार राष्ट्रवादी पाठोपाठ एकनाथ शिंदेंची शिवसेना बाहेर पडण्याची शक्यता आहे. काल रात्री दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये बैठक झाली. पण शिंदेसेनेचे मिरज मधील मोहन वनखंडे यांच्या उमेदवारीला भाजप नेत्यांनी विरोध केला. त्यामुळे भाजप व शिंदेसेनेतही वाद निर्माण झाला होता.

काल (शनिवारी) दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी बैठक घेत चर्चा केली. पण, तोडगा निघाला नाही. त्यामुळे आता शिंदेसेनाही महायुतीतून बाहेर पडणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान  भाजप अंतर्गत उमेदवारीवरून सुरू असलेल्या संघर्ष अद्याप संपलेला नाही. त्यामुळे पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ रात्री मुंबईला रवाना झाले असून,आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेणार आहे. या भेटीनंतर उमेदवार यादी अंतिम केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Sangli Mahangarpalika Election 2026: उमेदवारी जाहीर न होण्यामागची कारणे

भाजपकडे इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यात सांगलीतील तीन ते चार व मिरजेतील एका प्रभागातील उमेदवारीचा विषय वादाचा ठरला आहे.

सांगलीतील गावभागमधील प्रभाग १४ व वखारभागमधील प्रभाग १२ मध्ये शिवप्रतिष्ठानने काही उमेदवारांसाठी आग्रह धरला आहे. त्यासाठी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे आग्रही आहेत. भाजपचे नेते त्यांच्याशी चर्चा करीत आहेत.

दुसरीकडे प्रभाग ९ व १० मध्ये आमदार सुधीर गाडगीळ व जयश्रीताई पाटील समर्थक उमेदवारांत रस्सीखेच सुरू आहे. या दोन्ही प्रभागातील उमेदवाराबाबत एकमत होताना दिसत नाही. त्यामुळे आता या वादाबाबत मुंबईतच निर्णय होण्याची शक्यता आहे

आज मुख्यमंत्री, पालकमंत्री व प्रदेशाध्यक्ष यांच्याशी चर्चा होऊन महापालिका निवडणुकीसाठीची भाजपची उमेदवार यादी अंतिम होण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा

Comments are closed.