नाशिक महानगरपालिका : इतिहास, सत्तासमीकरणे आणि वर्चस्ववाद, भाजपचा इतिहास राज-उद्धव ठाकरेंची युत
नाशिक महानगरपालिका: नाशिक महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीने शहराच्या राजकारणात प्रचंड हालचालींना वेग आला आहे. तब्बल साडेतीन वर्षांहून अधिक काळ सुरू असलेली प्रशासकीय राजवट आता संपुष्टात येणार असून, १५ जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानातून शहराला नवे लोकप्रतिनिधी मिळणार आहेत. ३१ प्रभागांतील 122 जागांसाठी 13 दशलक्ष ५४ हजार मतदार आपला कौल देणार असून, 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे.
नाशिक महानगरपालिका: नाशिक महानगरपालिकेचा इतिहास
नाशिक ही महाराष्ट्रातील प्राचीन, धार्मिक आणि वेगाने विकसित होणारी नगरी आहे. वाढती लोकसंख्या, शहरीकरण आणि प्रशासनाची गरज लक्षात घेऊन नाशिक महानगरपालिकेची स्थापना ७ नोव्हेंबर 1982 रोजी करण्यात आली. महापालिका होण्यापूर्वी नाशिक शहराचा कारभार नाशिक नगरपरिषद आणि त्यानंतर नगरपालिका यांच्यामार्फत चालवला जात होता. शहराचा विस्तार, औद्योगिक वाढ आणि सिंहस्थ कुंभमेळ्यासारख्या भव्य धार्मिक आयोजनांमुळे स्वतंत्र महापालिकेची गरज निर्माण झाली. स्थापनेवेळी नाशिक महापालिकेत 50 नगरसेवक होते. कालांतराने शहराचा विस्तार होत गेला. आज नाशिक महापालिकेत 122 नगरसेवक (प्रभाग) आहेत. नाशिक रोड, पंचवटी, सिडको, सातपूर, देवळाली यांसारख्या भागांचा महापालिकेत समावेश करण्यात आला.
नाशिक महानगरपालिका: राजकीय वर्चस्वाचा इतिहास
काँग्रेसचा प्रभाव (1980-१९९०)
महापालिकेच्या सुरुवातीच्या काळात काँग्रेसचा प्रभाव अधिक होता. शहरातील व्यापारी, मध्यमवर्गीय मतदारांमध्ये काँग्रेसची पकड होती.
शिवसेनेचा उदय
1990 नंतर नाशिकमध्ये शिवसेनेने जोरदार प्रवेश केला. मराठी अस्मिता, स्थानिक प्रश्न आणि संघटनात्मक ताकदीच्या जोरावर शिवसेना अनेक वेळा सत्तेत आली.
भाजपचा विस्तार
2000 नंतर भाजपने शहरात आपली ताकद वाढवली. 2017 च्या महापालिका निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला, मात्र स्पष्ट बहुमत मिळाले नाही.
मनसेची भूमिका
राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेने नाशिकमध्ये स्वतंत्र ओळख निर्माण केली. 2009 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे नाशिक शहरात चारपैकी तीन आमदार निवडून आले. नाशिकच्या नवनिर्माणाचे आश्वासन राज ठाकरेंनी दिल्याने 2012 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत मनसेचे तब्बल 40 नगरसेवक निवडून आले. तर 2017 मध्ये मनसेचे 5 नगरसेवक निवडून आले होते.
नाशिक महानगरपालिका: 2017 ची निवडणूक आणि भाजपचे एकहाती वर्चस्व
2017 साली झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपने इतिहास घडवत एकहाती सत्ता मिळवली होती. 122 सदस्यांच्या सभागृहात भाजपचे ६६ नगरसेवक निवडून आले होते. शिवसेनेचे 35राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे प्रत्येकी 6मनसेचे ५अपक्ष 4 नगरसेवक होते. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या पक्षाला एवढे मोठे यश मिळाले होते. त्या वेळी भाजपचे सतीश कुलकर्णी हे अखेरचे महापौर ठरले.
नाशिक महानगरपालिका: प्रशासकीय राजवट
महापालिकेची मुदत संपल्यानंतर 13 मार्च 2022 रोजी नाशिक महापालिकेत प्रशासकीय राजवट लागू झाली. तेव्हापासून लोकप्रतिनिधींशिवाय कारभार सुरू असून, ही स्थिती आता निवडणुकीमुळे बदलणार आहे.
नाशिक महानगरपालिका: प्रभाग रचना व निवडणूक तयारी
नाशिक महापालिकेसाठी प्रभाग रचना आधीच जाहीर झाली आहे. 2017 प्रमाणेच चार सदस्यांचा प्रभाग पद्धती कायम ठेवण्यात आली असून, 29 प्रभागांत चार तर दोन प्रभागांत तीन नगरसेवक निवडले जाणार आहेत. ऑक्टोबरमध्ये अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध झाली, 11 नोव्हेंबर रोजी प्रभाग आरक्षणाची सोडत काढण्यात आली. 3 डिसेंबरला स्वरूप मतदार यादीवर हरकती मागवण्यात आल्या, 10 डिसेंबरला अंतिम मतदार यादी जाहीर झाली आहे.
नाशिक महानगरपालिका: राजकीय समीकरणे तापली
या निवडणुकीत राजकीय समीकरणे अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत. भाजप पुन्हा एकदा महापालिका काबीज करण्यासाठी जोरदार तयारी करत आहे. भाजप आणि शिंदे गटाची शिवसेना यांच्यात युती होण्याची दाट शक्यता आहे. दुसरीकडे अजित पवार गट स्वतंत्र लढणार की शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत युती करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर उद्धव ठाकरे गट आणि मनसे यांची युती होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. विशेषतः शिवसेना फुटीनंतर ठाकरे गटासाठी ही निवडणूक अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. केवळ चार-पाच माजी नगरसेवकच पक्षात शिल्लक असून, बहुसंख्य माजी नगरसेवकांनी भाजप किंवा शिंदे सेनेत प्रवेश केला आहे.
नाशिक महानगरपालिका: उमेदवारीसाठी प्रचंड चुरस
सध्याच्या परिस्थितीत भाजपकडून उमेदवारी मिळवण्यासाठी मोठी स्पर्धा दिसून येत आहे. त्याखालोखाल शिंदे सेनेकडे इच्छुकांची गर्दी आहे. रिपब्लिकन सेनेची युती आधीच शिंदे सेनेसोबत झाली असून, त्यामुळे काही प्रभागांत मित्र पक्षांमध्येच काट्याची लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
नाशिक महानगरपालिका: निर्णायक ठरणारी निवडणूक
साडेतीन वर्षांनंतर होत असलेली ही महापालिका निवडणूक नाशिकच्या विकासाची दिशा ठरवणारी ठरणार आहे. सत्ताधारी भाजपचे वर्चस्व टिकणार की विरोधक नवी समीकरणे घडवणार, याचा फैसला 16 जानेवारीला होणार आहे.
नाशिक महानगरपालिका: प्रभागरचना आणि नगरसेवकांची क्रमांक
नाशिक महानगरपालिकेत एकूण 122 नगरसेवक आहेत. हे नगरसेवक 31 प्रभागांमधून निवडून येतात. सध्याच्या विभागानुसार बहुसंख्य प्रभाग हे चार सदस्यत्व आहेत.
चार सदस्यत्व प्रभाग : 29
तीन सदस्यत्व प्रभाग : 2
अशा प्रकारे नाशिक महापालिकेतील एकूण प्रभागांची संख्या 31 आहे. ही प्रभागरचना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार तसेच राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेने निश्चित करण्यात आली आहे.
आरक्षण : महिलांना 50 टक्के प्रतिनिधित्व
नाशिक महापालिकेच्या आरक्षण सोडतीनुसार यंदाच्या निवडणुकीत महिलांना मोठी संधी मिळणार आहे. एकूण 122 नगरसेवकांपैकी 61 जागा महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत, म्हणजेच तब्बल 50 टक्के आरक्षण महिलांना मिळणार आहे.
नाशिक महानगरपालिका: आरक्षणाचा तपशील
सर्वसाधारण : 63 जागा
obc : 32 जागा
अनुसूचित जाती : 18 जागा
अनुसूचित जमाती : 9 जागा
त्यामध्ये महिलांसाठी 61 जागांवर आरक्षण लागू असणार आहे.
Comments are closed.