सोलापुरात भाजपला सोडचिठ्ठी, शिंदेंच्या शिवसेनेची राष्ट्रवादीसोबत युती; फॉर्म्युलाही ठरला

सोलापूर : राज्यातील महापालिका निवडणुकांचे (mahapalika election) वारे वाहत असून युती आणि आघाडी अंतिम टप्प्यात येत आहेत. मात्र, काही महापालिका क्षेत्रात युती आणि आघाड्यांचं गणित बिघडल्याने तिथं वेगळीच युती पाहायाला मिळत आहे. पुणे, पिंपरीच चिंचवडनंतर आता सोलापुरताही (Solapur) भाजप राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना महायुतीचं गणित बिघडलं आहे. सोलापुरात महायुतीची समीकरणं बदलली असून भाजपसोबत सुरु असलेली चर्चा थांबून एकनाथ शिंदेंची शिवसेना (Shivsena) अजित दादांच्या राष्ट्रवादीसोबत जाणार आहे. सोलापूर महापालिकेच्या 102 जागांपैकी 51-51 असा फॉर्म्युला ठरला आहे. दरम्यान, भाजपकडून सन्मानजनक जागा न दिल्याने शिंदेंच्या शिवसेनेनं राष्ट्रवादीसोबत जाणं पसंत केलं.

राष्ट्रवादीचे संपर्क मंत्री दत्तात्रय भरणे आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्यात युतीबाबत चर्चा झाली आहे. सोलापूर महापालिकेसाठी जागा वाटपाच्या मुद्यावरून भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये युतीची बोलणी पुढे सरकत नव्हती. मात्र, काल कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या दौऱ्यानंतर राष्ट्रवादी आणि शिवसेना युतीच्या हालचालींनी वेग पकडला आणि युती निश्चित झालीय. शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची आज बैठक पार पडली. त्यामध्ये युती निश्चित झाली असून शिवसेना नेते सिद्धाराम म्हेत्रे यांनी पत्रकार परिषदेतून याबाबत माहिती दिली. तसेच, शिवसेना-राष्ट्रवादीतील जागावाटपाचा फॉर्म्युलाही त्यांनी सांगितला.

आमच्याकडे शिवसेना-राष्ट्रवादी अशी दोघांची युती झाली आहे, 50% टक्के समान जागा वाटपाचा निर्णय झालाय. महापालिकेच्या 102 जागांपैकी 51-51 जागा दोघांच्या वाट्याला येतील. दोघांचाही महापौर सोलापूर महापालिकेत असेल, राज्याच्या सत्तेत दखील आम्ही सोबत आहोत. याशिवाय नगरविकास आणि अर्थ खाते राज्यात आमच्या नेत्यांकडे आहे, त्याचा वापर करून सोलापूरचा मोठा विकास आम्ही करू, असे सिद्धाराम म्हेत्रे यांनी यावेळी म्हटले.

भाजपने शिवेसेनेला देऊ केल्या फक्त 8 जागा

भाजपसोबत आमची बोलणी सुरु होती, पण सन्मानजनक चर्चा नव्हती. भाजपकडे आम्ही 42 जागा मागितल्या, पण त्यांनी केवळ 8 जागा देण्याचे सांगितलं. त्यानंतर, 30 जागा म्हणून आम्ही फेर-प्रस्ताव दिला होता. पण, त्यांचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे, काल रात्री आमची राष्ट्रवादीसोबत चर्चा झाली, त्यानंतर सन्मानजनक 50-50 टक्के वाटा आमच्यात ठरला आहे, असेही सिद्धाराम म्हेत्रे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा

महापालिकेसाठी ठाकरेंची जोरदार तयारी, प्रचारात आघाडी घेत ‘मुंबई मॉडेल’चं प्रकाशन; पुस्तकात नेमकं काय?

आणखी वाचा

Comments are closed.