सोलापुरात प्रणिती शिंदेंना दे धक्का, उमेदवारी दिलेल्या उमेदवाराचाच MIM मध्ये प्रवेश; कारण समोर
सोलापूर : महापालिका निवडणुकांची (Election) रणधुमाळी सुरू असून जागावाटप आणि उमेदवारांच्या याद्या जाहीर होण्याचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे. काँग्रेसने याद्या जाहीर करण्यात आघाडी घेतली असून सोलापूर आणि कोल्हापुरात उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली होती. कोल्हापुरात 48 तर सोलापूरमध्ये (Solapur) 20 उमेदवारांची पहिली यादी काँग्रेसने जाहीर केली होती. मात्र, सोलापुरात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला असून जाहीर केलेल्या पहिल्या यादीतील उमेदवाराने थेट एमआयएम पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे, काँग्रेसच्या (Congress) इतर उमेदवारांच्या भुवया उंचावल्या असून इच्छुकांच्या मुलाखती घेताना अपमानास्पद वागणूक दिल्याचे फिरदोस पटेल यांनी म्हटलं आहे.
सोलापुरातील प्रभाग 16 च्या काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार माजी नगरसेविका फिरदोस पटेल यांनी आज एमआयएममध्ये प्रवेश केला. एमआयएमचे प्रदेश कार्याध्यक्ष फारुख शाब्दि आणि निरीक्षक अन्वर सादात यांच्या उपस्थितीत फिरदोस पटेल यांचा एमआयएममध्ये प्रवेश झाला. फिरदोस पटेल ह्या काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात, 2017 मध्ये सोलापूर महापालिकेत काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या. दरम्यान, सोलापुरात काँग्रेसने 20 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.
काँग्रेस पक्षाने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेताना अपमानस्पद वागणूक दिल्याचा दावा करत फिरदोस पटेल यांनी काँग्रेसला बाय केलं. फिरदोस पटेल ह्या एमआयएमचे शहर जिल्हाध्यक्ष शौकत पठाण यांच्या नातेवाईक आहेत. शौकत पठाण यांच्या मध्यस्तीने फिरदोस पटेल यांनी एमआयएममध्ये प्रवेश केल्याचं दिसून आलं. विशेष म्हणजे खासदार प्रणिती शिंदे यांच्या त्या निकटवर्ती मानल्या जात, त्यामुळेच काँग्रेसच्या पहिल्याच यादीत त्यांना संधी देण्यात आली होती. मात्र, उमेदवारी जाहीर झाल्याच्या दोन दिवसांतच त्यांनी एमआयएम पक्षात प्रवेश केल्याने अनेकांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे.
सोलापुरात काँग्रेस 45 जागा लढवणार
सोलापूर महापालिकेसाठी महाविकास आघाडीतील (MVA) काँग्रेस, ठाकरे गट, शरद पवार गट, माकप ह्या सर्व पक्षांच्या नेत्यांनी एकत्रित येऊन सोलापूर महापालिकेच्या जागावाटपाबाबत घोषणा केली. त्यामळे, सोलापुरात भाजप-शिवसेना युती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे. सोलापुरातील महापालिकेच्या 102 जागांसाठी हे जागावाटप निश्चित झालं असून 45 जागांसह काँग्रेस (Cogress) मोठा भाऊ ठरला आहे. काँग्रेस-45, शिवसेना उद्धव ठाकरे-30, राष्ट्रवादी शरद पवार गट-20 आणि माकप-7 असा हा फॉर्म्युला निश्चित केल्याचे शिवसेना शहर प्रमुख अजय दासरी यांनी सांगितले. तसेच, 4 तारखेला सोलापुरात प्रचाराचा नारळ फुटणार आहे.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.