मुंबई महापालिकेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून एबी फॉर्म वाटप,मातोश्रीवर मोठ्या घडामोडी सुरु
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेनं युती केली आहे. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष देखील ठाकरेंसोबत मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं असणार आहे. उद्धव ठाकरेंची शिवेसना आणि राज ठाकरेंची मनसे मुंबई महापालिकेच्या 227 जागांपैकी किती जागा लढणार हे स्पष्ट झालेलं नाही. मात्र, उमेदवार यादी जाहीर करण्यापूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेकडून एबी फॉर्म द्यायला सुरुवात झाली असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
Shivsena UBT : ठाकरेंच्या शिवसेनेकडून एबी फॉर्म वाटप
मातोश्रीवर ठाकरेंच्या शिवसेनेकडून मुंबई महापालिका निवडणुकीसाठी एबी फॉर्म द्यायला सुरुवात झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ज्या उमेदवारांचे नाव ठाकरेंच्या शिवसेनेकडून निश्चित झाला आहे, त्यातील काही उमेदवारांना मातोश्रीवर बोलावण्यात आलं आहे. काही जणांना आज रात्री आणि काही जणांना उद्या एबी फॉर्मचं वाटप करून अर्ज भरण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत, अशी माहिती आहे. उमेदवारांची यादी उद्या जाहीर केली जाईल मात्र त्याआधी एबी फॉर्म द्यायला मातोश्रीवर सुरुवात केली असल्याची माहिती आहे.
ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे मुंबई महापालिकेत किती जागा लढवणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं त्यांना आव्हान असेल. याशिवाय काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र लढतेय. अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेत उमेदवार जाहीर केले आहेत.
मलबारमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा आणि मनसेचा मेळावा
ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर मुंबईतील मलबार हिल विधानसभेत एकत्रित बैठक पार पडली आहे. या बैठकीला दोन्ही पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.दक्षिण मुंबईचे ठाकरे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत व मनसे नेत्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष काँग्रेससोबत न जाता ठाकरें बंधूंसोबत युती करणार आहे. ठाकरेंची शिवसेना आणि मनसेकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला केवळ 10 ते 12 जागाच देण्यात येणार असल्याची माहिती आहे.
मुंबई महापालिका निवडणूक कार्यक्रम
नामनिर्देशनपत्र स्वीकारणे: 23 डिसेंबर 2025 ते 30 डिसेंबर 2025
नामनिर्देशनपत्रांची छाननी: 31 डिसेंबर 2025
उमेदवारी माघारीची अंतिम मुदत : 02 जानेवारी 2026
निवडणूक चिन्ह वाटप : 03 जानेवारी 2026
अंतिम उमेदवारांची यादी- 03 जानेवारी 2026
मतदानाचा दिनांक : 15 जानेवारी 2026
मतमोजणीचा दिनांक : 16 जानेवारी 2026
आणखी वाचा
Comments are closed.