मुंबईच्या वॉर्ड क्र. 95 मुळं अनिल परब- वरुण सरदेसाईंमध्ये मतभेद, मातोश्रीवर काय घडलं?

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष एकत्र आले आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यास कमी कालावधी राहिला असल्यानं सर्वच पक्षांकडून उमेदवार निश्चित करुन एबी फॉर्मचं वाटप केलं जात आहे. मुंबईतील वॉर्ड क्रमांक  95 च्या उमेदवारीवरुन ठाकरेंच्या शिवसेनेच्या दोन आमदारांमध्ये मतभेद झाल्याचं पाहायला मिळालं. अनिल परब आणि वरुण सरदेसाई यांच्यात मतभेद कशामुळं झाले? आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंनी प्रभाग क्रमांक 95 ची उमेदवारी हरी शास्त्री यांना देण्याचा निर्णय कसा घेतला हे समोर आलं आहे.

अनिल परब- वरुण सरदेसाईंमध्ये मतभेद

प्रभाग क्रमांक 95 ची जागा ही ठाकरेंच्या शिवसेनेची जागा असल्याने त्या ठिकाणी माजी नगरसेवक चंद्रशेखर वांयगणकर यांनाच उमेदवारी पुन्हा द्यावी असा आग्रह आमदार अनिल परब यांनी पक्षाकडे धरला होता. ही जागा एक प्रकारे पक्षाचा बालेकिल्ला असल्याने उमेदवार जिंकून येईल असा विश्वास अनिल परब यांनी दिला होता.

दुसरीकडे ही जागा श्रीकांत सरमळकर यांचे जावई हरी शास्त्री यांना द्यावी, अशी भूमिका वरुण सरदेसाई यांनी घेतली. हरी शास्त्री यांनी वरुण सरदेसाई यांच्यासाठी वांद्रे पूर्व मधून निवडून आणण्यासाठी आणि पक्षासाठी मोठं काम केलं असल्याचं वरुण सरदेसाई यांनी पक्षप्रमुखांना सांगितलं आणि ही जागा जिंकून येईल असा विश्वास दिला.

उद्धव ठाकरे यांनी अनिल परब आणि वरुण सरदेसाई यांचं ऐकल्यानंतर प्रभाग क्रमांक  95 मधून हरी शास्त्री यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. काल रात्रीच हरी शास्त्री यांना एबी फॉर्म देखील देण्यात आला.

उद्धव ठाकरे यांच्या हरी शास्त्री यांना उमेदवारी देण्याच्या निर्णयानंतर  माजी नगरसेवक चंद्रशेखर वांगणकर हे नाराज झाले. शिवाय आपल्या सांगण्यावरून  वांयगणकर यांना तिकीट न मिळाल्याने काहीसे अनिल परबही नाराज झाल्याची माहिती मिळाली.

दरम्यान, अनिल परब कालच्या प्रकारानंतर अनिल परब आज पुन्हा एकदा मातोश्रीवर आले असून एबी फॉर्म वाटपाच्या कामामध्ये लागले आहेत, तर वरूण सरदेसाई  हरी शास्त्री यांचा अर्ज भरण्यासाठी गेले. वरुण सरदेसाई यांच्या उपस्थितीत हरी शास्त्री यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

ठाकरेंच्या शिवसेनेकडून माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना अद्याप एबी फॉर्म मिळाला नसल्याची माहिती आहे. अद्याप किशोरी पेडणेकर एबी फॉर्मसाठी वेटिंगवर आहेत.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.