भाजपकडे 25 जागा मागितल्या,15 जागा दिल्यात जिथं आमचे उमेदवार निवडून येऊ शकत नाहीत: नीलम गोऱ्हे
PMC Election पुणे : पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेचं जागावाटप चर्चेच्या अनेक फेऱ्यानंतर देखील पूर्ण झालेलं नाही. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलं आहे. विधानपरिषदेच्या उपसभापती आणि शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी पुण्यातील शिवसेना आणि भाजपच्या युती संदर्भात भाष्य केलं आहे. भाजपकडे 25 जागांची मागणी केली होती, मात्र त्यांच्याकडून 15 जागा दिल्या जात असल्याचं नीलम गोऱ्हे म्हणाल्या.
Neelam Gorhe : आमची युती अजूनही तुटलेली नाही..
नीलम गोऱ्हे यांनी पुणे महापालिकेसाठी भाजपसोबतची युती तुटली नसल्याचं म्हटलं आहे. यावेळी त्या म्हणाल्या की भाजपकडे पुणे महानगरपालिकेसाठी शिवसेनेनं 25 जागांची मागणी केली होती. मात्र, अद्यापही त्यांनी आम्हाला फक्त 15 जागा दिल्या आहेत. भाजपनं अशा जागा दिलेत जिथे आमची ताकद नाही किंबहुना आमचे उमेदवार निवडून येऊ शकत नाहीत, असं नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं.
भाजप बरोबर अनेक बैठका झाल्या मात्र ते जागा द्यायला तयार नाहीत. आता शिवसेनेचे वरिष्ठ नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून लवकरच निर्णय घेतील आणि 2 जानेवारीला चित्र स्पष्ट होईल, असं नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं.
पुणे महानगरपालिकेत मैत्रीपूर्वक लढत होते का शिवसेना आणि भाजपमध्ये ते वरिष्ठ नेते आणि कार्यकर्ते ठरवतील. अनेक शिवसैनिकांची गर्दी उमेदवारी साठी आमच्याकडे झाली होती. मात्र भाजप आम्हाला काहीही स्पष्ट करत नाही. आज मंत्री उदय सामंत देखील या ठिकाणी आले मात्र चर्चा झालेली नाही, असं नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं.
पुणे महापालिकेत युती आघाडी कागदावर
पुणे महापालिका निवडणुकीत सर्वच पक्ष रिंगणात उतरल्याचं चित्र आहे. भाजप आणि शिवसेनेच्या जागा वाटपाबाबत चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या. शिवसेनेकडून नीलम गोऱ्हे, विजय शिवतारे यांनी चर्चा केली. मात्र, भाजप आणि सेनेच्या युतीचं चित्र स्पष्ट होऊ शकलं नाही. अखेर शिवसेनेने त्यांच्या उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप केलं आहे.
पुणे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांच्यात आघाडी होणार असं सांगण्यात आलं मात्र, प्रत्यक्षात दोन्ही पक्ष किती जागा लढणार हे समोर आलं नाही.
दरम्यान, पुणे महापालिकेत 2017 च्या निवडणुकीत भाजपनं विजय मिळवला होता. पुणे महापालिकेच्या 165 वॉर्डसाठी निवडणूक होत आहे. पुण्यातील बहुरंगी लढतीत कोण बाजी मारणार हे पाहावं लागेल.
आणखी वाचा
Comments are closed.