रशीद मामूंनी चंद्रकांत खैरेंच्या नाकावर टिच्चून छत्रपती संभाजीनगरध्ये उमेदवारी मिळवलीच
छत्रपती संभाजीनगर निवडणूक 2026: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसचे माजी महापौर अब्दुल रशिद खान उर्फ मामू (Former mayor Rashid Khan) यांना उमेदवारी देण्यावरून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेतील अंतर्गत कलह समोर आला होता. यानिमित्ताने पुन्हा एकदा चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) विरुद्ध अंबादास दानवे असा सुप्त संघर्ष रंगला होता. अंबादास दानवे यांच्या पुढाकाराने मुंबईतील शिवसेना भवनात (Shivsena Bhavan) रशीद मामू (Rashid Mamu) यांचा शिवसेनेत प्रवेश झाला होता. त्यावेळी भवन इमारतीच्या दारात चंद्रकांत खैरे यांनी रशीद मामू यांना फटकारले होते. मी तुला उमेदवारी मिळून देणार नाही. माझा तुला विरोध आहे, असे चंद्रकांत खैरे यांनी रशीद मामूंना सगळ्यांदेखत सुनावले होते. यावेळी रशीद मामू यांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, चंद्रकांत खैरे त्यांना बरेच काही बोलले होते. मात्र, आता याच चंद्रकांत खैरे यांच्या विरोधानंतरही अंबादास दानवे यांनी रशीद मामू यांना उमेदवारी मिळवून दिली आहे. रशीद मामू यांना उमेदवारी दिल्यावर पाहा मी काय करतो, असा इशारा चंद्रकांत खैरे यांनी दिला होता. त्यामुळे आता चंद्रकांत खैरे काय भूमिका घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. तसेच चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यातील या वादाचा फटका निवडणुकीत ठाकरे गटाला बसणार का, हेदेखील पाहावे लागेल.
काही दिवसांपूर्वीच अंबादास दानवे यांनी माजी महापौर राहिलेल्या अब्दुल रशिद खान उर्फ मामू यांचा पक्षप्रवेश घडवून आणला होता. विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईसह राज्यात मुस्लीम मतदारांची मतं मिळाली होती. त्यादृष्टीने छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे यांनी खेळलेली खेळी महत्त्वपूर्ण मानली जात होती. अंबादास दानवे यांनी रशीद मामू यांना शिवसेना भवनात नेऊन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्यांचा पक्षप्रवेश घडवून आणला होता. या पक्षप्रवेशानंतर रशीद मामू आणि चंद्रकांत खैरे शिवसेना भवनाबाहेर आमनेसामने आले होते. त्यावेळी रशीद मामू यांनी खैरेंची गळाभेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, खैरेंनी रशीद मामू यांना बाजूला सारुन सुनावले होते. तुम्ही जरी गळाभेट घेत असला तरी तुम्हाला तिकीट मिळणार नाही, असा सज्जड दम चंद्रकांत खैरे यांनी रशीद मामू यांना दिला होता. रशीद मामू यांच्या शिवसेनेतील प्रवेशामुळे पक्षाचे 50 हजार मतांचे नुकसान झाले आहे, असे चंद्रकांत खैरे यांनी म्हटले होते.
Chhatrapati Sambhajinagar Election 2026: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीत कोणत्या पक्षात काय घडले?
भाजप: महायुती तुटल्यावर तीनच तासांत भाजपने 96 उमेदवार दिले. 50 माजी नगरसेवक मैदानात असून इतर पक्षांतून आलेल्या १३ जणांना संधी दिली. ४६ नवे चेहरे तर १९ ठिकाणी भाजपला उमेदवार मिळाले नाहीत. सुमारे 30 उमेदवार हे 50 ते 70 वयातील आहेत. 35 ते 45 वयातील उर्वरित उमेदवारांची संख्या 40 च्या आसपास आहे.
शिवसेना: शिंदे सेनेने शेवटच्या दिवशी 99 इच्छुकांना उमेदवारी दिली. यात तीन माजी महापौर आणि 20हून अधिक माजी नगरसेवकांचा समावेश आहे. भाजपसोबत वाटाघाटीमध्ये त्यांना 37 जागा मिळत होत्या.
उद्धवसेना: राष्ट्रवादी (शरद पवार), काँग्रेससोबत आघाडीसाठी प्रयत्न केले. मात्र, फारसा प्रतिसाद न मिळाल्याने उद्धवसेनेने 99 शिलेदार रिंगणात उतरवले. उद्धवसेनेसाठी ही निवडणूक जीवन-मरणाची लढाई आहे. निवडणुकीदरम्यान उद्धवसेनेला उमेदवार मिळणार नाही, अशी टीका विरोधी पक्षांकडून केली जात होती.
काँग्रेस: काँग्रेसने 80 उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहेत. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीशी काँग्रेसची युती होणार होती; परंतु झाली नाही. काँग्रेसने राष्ट्रवादी (शरद पवार) ला काही जागा सोडल्या आहेत.
एमआयएम: एमआयएमने तब्बल 21 माजी नगरसेवकांचे तिकीट कापल्याने नाराजी पसरली. परिणामी, स्थानिक आणि वरिष्ठ नेत्यांच्याविरोधात संबंधितांनी दंड थोपटत नेत्यांचे फोटो पायदळी तुडविले. काहींनी नाराजांना एकत्र करीत स्वतंत्र पॅनल उभे केले.
राष्ट्रवादी (अजित पवार): या निवडणुकीत राष्ट्रवादी (अजित पवार) ने 81 उमेदवार दिले असून त्यात 22 मुस्लीम, 14 अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारांचा समावेश आहे. भाजप-शिंदेसेना महायुती तुटल्याने याचा आमच्या पक्षाला लाभ झाल्याचे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी (शरद पवार): राष्ट्रवादी (शरद पवार) ने 25 एबी फॉर्म देत सर्व जाती धर्माच्या उमेदवारांना संधी दिली. पक्षाची काँग्रेससह उद्धवसेनेशीही काही जागांवर युती आहे. मात्र, इतर काही जागांवर स्वतंत्र उमेदवार देत या निवडणुकीला पक्ष सामोरे जात आहे.
वंचित बहुजन आघाडी: ‘वंचित बहुजन आघाडी’ने स्वबळावर ७० जागांवर उमेदवार दिलेत. आघाडीस कालपर्यंत वंचित बहुजन आघाडी-काँग्रेसच्या 7 बैठका झाल्या. पण एकमत नाही. प्रभाग 24, 26 मधील जागेबाबत दोन्ही पक्षांचे सुर न जुळल्याने स्वतंत्रपणे निवडणूक लढत आहे.
बसप: बसपने 22 उमेदवार दिले. ‘एमआयएम’सोबत युतीचा विचार करण्यात आला होता. मात्र, बसपच्या मायावती यांनी महाराष्ट्र प्रदेश समितीचा प्रस्ताव फेटाळून लावल्याने त्यांना स्वबळावरच उतरावे लागले.
आणखी वाचा
छत्रपती संभाजीनगरसाठी ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांची संपूर्ण यादी, किती जागा लढणार?
आणखी वाचा
Comments are closed.