अशोक चव्हाणांनी 50 लाख घेऊन तिकीट दिलं, माजी नगरसेवकाचा आरोप; लातूरमध्येही निष्ठावंतांकडून बंड
नांदेड : राज्यातील महापालिका निवडणुकीतील (Election) तिकीट वाटपावरुन सर्वच राजकीय पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांची फरफट झाल्याचं पाहायला मिळत आहे. ऐनवेळी पक्षात आलेल्या उमेदवारांना कुठे उमेदवारी देण्यात आलीय तर कुठे आर्थिक परिस्थिती पाहूनच तिकीट दिलं गेल्याने निष्ठावंतांची नाराजी उघड होत आहे. भाजपमध्ये (BJP) मोठ्या प्रमाणात नाराजी पाहायला मिळत असून नांदेड आणि लातूरमधूनही भाजप समर्थक व निष्ठावंत कार्यकर्ते मनातील खदखद बोलून दाखवत आहेत. माजी मंत्री अशोक चव्हाण यांच्या एका निष्ठावंत कार्यकर्त्याने अशोक चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अशोक चव्हाण (अशोक चव्हाण) यांनी 50 लाख रुपये घेऊन पैसेवालांना तिकीट दिल्याचा गंभीर आरोप माजी नगरसेवक भानुसिंग रावत यांनी केला आहे.
महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पन्नास लाख रुपये घेतल्याचा घराघाती आरोप माजी नगरसेवक तथा चव्हाण यांचे विश्वास भानुसिंग रावत यांनी केला आहे. भानूसिंग रावत हे अशोक चव्हाण यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. विशेष म्हणजे सन 1980 पासून ते चव्हाण यांच्यासोबत राजकारणात सक्रीय होते. यंदाच्या महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 16 मधून त्यांनी आपल्या मुलासाठी भाजपकडून उमेदवारी मागितली होती. मात्र, ऐनवेळी पक्षाकडून त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यानंतर, भानुसिंग रावत यांनी अशोक चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले असून पैसे घेऊन तिकीट दिल्याने भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा पक्षाने बळी घेतला आहे, असेही माजी नगरसेवक रावत यांनी म्हटलं आहे.
लातूर शहर भाजपामध्ये तिकीट वाटपावरून तीव्र नाराजी उफाळून आली असून अनेक वर्षांपासून पक्षासाठी काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी उघडपणे बंडाचे निशाण फडकावले आहे. “आम्हीच खरे भाजपवाले” असा ठाम दावा करत, बाहेरच्या पक्षातून आलेल्या ‘आयाराम’ उमेदवारांना तिकीट देण्यात आल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. तर दुसरीकडे, जनसंघापासून पक्ष वाढवणारे जुने कार्यकर्ते तिकीटापासून वंचित राहिल्याने असंतोष अधिक तीव्र झाल्याचं दिसून येत आहे.लातूर महानगरपालिकेच्या 70 जागांसाठी झालेल्या तिकीट वाटपात निष्ठावंतांना डावलण्यात आल्याचा आरोप होत आहे. निवडणूक प्रचार प्रमुख आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या भूमिकेवरूनही कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. “पक्षासाठी रात्रंदिवस झटणाऱ्यांवर अन्याय झाला,” अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
भाजप निष्ठावंतांमुळे पक्षाची कोंडी
दरम्यान, या पार्श्वभूमीवर जनसंघापासून काम करणारे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित तसेच भाजपातील जुने, निष्ठावंत कार्यकर्ते लातूर येथील कल्पतरू मंगल कार्यालयात एकत्र आले. या बैठकीत एकमुखाने निर्णय घेण्यात आला की, आम्ही निवडणूक लढणार. “लातूरमध्ये भाजप जिवंत ठेवली, मोठी केली आणि वाढवली ती आम्हीच. आमच्या अधिकारांवर आणि हक्कांवर गदा येत असेल तर त्याविरोधात लढा देणार,” असा ठाम निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला. निष्ठावंतांच्या या आक्रमक भूमिकेमुळे लातूर भाजपातील अंतर्गत गोंधळ आणखी वाढण्याची शक्यता असून, आगामी निवडणुकीत याचे पडसाद उमटण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.
हेही वाचा
शिंदेंच्या शिवसेनेतही मोठी घराणेशाही; मुंबई महापालिकेसाठी अनेक आमदार-खासदारांच्या मुलांना उमेदवारी
आणखी वाचा
Comments are closed.